मुंबई : परदेशी गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने सलग सहाव्या सत्रात निर्देशांकाची घोडदौड कायम आहे. याचबरोबर जागतिक पातळीवरील सकारात्मक संकेतामुळे बँकिंग आणि वित्त कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीची लाट आल्याने शुक्रवारी सेन्सेक्सने ५६,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी गाठली.

सप्ताहअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- सेन्सेक्सने ३९०.२८ अंशांची कमाई करत ५६,०७२.२३ अंशांवर दिवसाच्या व्यवहारांना निरोप दिला. दिवसभरात सेन्सेक्सने ५०४.१ अंशांची भर घालत ५६,१८६.०५ या सत्रातील उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीमध्ये ११४.२० अंशांची वाढ झाली आणि तो १६,७१९.४५ पातळीवर स्थिरावला.

वाढलेला परकीय गुंतवणुकीचा ओघ आणि कंपन्यांची तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरी यामुळे गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावल्याने समभागांची चौफेर खरेदी सुरू राहिली. बँकांनी सरलेल्या तिमाहीत चांगली कामगिरी केल्याने त्याचे प्रतिबिंब त्यांच्या नफ्यात उमटले आहे. दुसरीकडे युरोपीय मध्यवर्ती बँकेने महागाई नियंत्रणासाठी  पावले टाकत ११ वर्षांनंतर प्रथमच व्याजदरात वाढ गुरुवारी केली. हा मोठय़ा व्याजदर वाढीचा धक्का पचवून गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीला प्राधान्य दिले, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समध्ये अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टायटन, कोटक बँक आणि हिंदूस्थान युनिलिव्हर या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. दुसरीकडे इन्फोसिस, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, विप्रो आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली.

‘एफआयआय’कडून जोरदार खरेदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सरलेला संपूर्ण आठवडाभर समभाग खरेदीचा सपाटा लावला आहे. गुरुवारच्या सत्रात त्यांनी १,७९९.३२ कोटी मूल्याचे समभाग खरेदी केले.