मुंबई : जागतिक पातळीवर आलेल्या समभाग विक्रीच्या लाटेमुळे सप्ताहातील सलग दुसऱ्या सत्रात भांडवली बाजारात निराशेचे वातावरण कायम दिसून आले. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये मंगळवारच्या सत्रात ५०८ अंशांची घसरण झाली. सायंकाळी उशिराने जाहीर होणाऱ्या आणि रिझव्र्ह बँकेच्या सहनशील पातळीच्या बाहेर राहणे अंदाजले गेलेल्या किरकोळ महागाई दराच्या आकडेवारीबाबत गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा दिसून आला.
मंगळवारच्या सत्रात दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने ५०८.६२ अंश गमावत ५३,८८६.६१ अंशांची पातळी गाठली. सत्रात घसरण अधिक व्यापक होत ती ५७०.२६ अंशांपर्यंत रुंदावली होती. परिणामी सेन्सेक्सने सत्रात ५३,८२४.९७ अंशांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये १५७.७० अंशांची घसरण झाली आणि तो १६,०५८.३० पातळीवर स्थिरावला.
जागतिक पातळीवर प्रमुख देशांच्या महागाई दराची भीतीदायी आकडेवारी जाहीर होत असून पुन्हा एकदा मध्यवर्ती बँकाकडून व्याज दरवाढीचे संकेत दिले जात आहेत. महागाईचा वाढता दवाब आणि अमेरिकेतील रोजगाराच्या कमी होत जाणाऱ्या संधीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हकडून आक्रमकपणे व्याज दरवाढ होण्याची शक्यता आहे. देशांतर्गत पातळीवरदेखील महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळालेला नाही. तर दुसरीकडे चीनमधील विषाणू संसर्ग पुन्हा वाढल्याने खनिज तेलाचा मागणीमध्ये घट होण्याची शक्यता आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सव्र्हिसेसचे संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले आहे.
सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, नेस्ले इंडिया, एचसीएल, हिंदुस्तान युनिलिव्हर, मिहद्र आणि कोटक मिहद्र बँकेच्या समभागात सर्वाधिक घसरण झाली. दुसरीकडे एनटीपीसी, एअरटेल आणि बजाज फायनान्सचे समभाग तेजीसह स्थिरावले.
रुपयाची नीचांकी वाटचाल कायम
मुंबई : रिझव्र्ह बँकेकडून डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश येताना दिसत नाही. रुपयाची नीचांकी वाटचाल कायम असून मंगळवारच्या सत्रात, त्याच्या मूल्यात आणखी १५ पैशांची घसरण होत ते ७९.६० या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर गडगडले. रुपया उत्तरोत्तर प्रति डॉलर ८० च्या अभूतपूर्व स्तरानजीक कलंडत चालला आहे.
जागतिक पातळीवर इतर चलनांच्या तुलनेत डॉलरला वाढती मागणी आणि देशांतर्गत पातळीवर भांडवली बाजारातील घसरणीने रुपयातील पडझड वाढली आहे. आंतरबँक परकीय चलन बाजारात मंगळवारच्या सत्रात रुपयाने ७९.५५ या नीचांकापासून व्यवहारास सुरुवात केली. दिवसभरातील सत्रात घसरण अधिक वाढत तो १५ पैशांच्या घसरणीसह ७९.६० सार्वकालिक नीचांकी पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात रुपयाने ७९.५३ रुपयांची उच्चांकी तर ७९.६६ रुपयांचा तळ गाठला होता. तर सोमवारच्या सत्रात २२ पैशांची तूट दर्शवत रुपयाने ७९.४८ ही नीचांकी पातळी गाठली होती.
सेन्सेक्स : ५३,८८६.६१
३. ५०८.६२
निफ्टी : १६,०५८.३०
३. १५७.७०