केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सत्तास्थापनेची ‘शंभरी’ होत असतानाच चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील वाढत्या सकल राष्ट्रीय उत्पादनापाठोपाठ चालू खात्यातील तूटही सावरल्याचे गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त स्वागत केले. सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी नोंद करण्यास भाग पाडणाऱ्या भांडवली बाजारातील सेन्सेक्स यामुळे मंगळवारी २७ हजार पार झाला तर निफ्टीने ८,१०० नजीक जाणे पसंत केले.
शेअर बाजार अस्तित्वात आल्यापासून प्रथमच २७ हजारांचा आकडा पार करणाऱ्या सेन्सेक्सने व्यवहारात २७,०८२.८५ पर्यंत मजल मारली. तर दिवसअखेर तो २७,०१९.३९ या सर्वोच्च स्तरावर विसावला. सोमवारच्या तुलनेत मुंबई निर्देशांकांमध्ये १५१.८४ अंश भर पडली. तर सलग आठव्या व्यवहारात तेजी नोंदविणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी मंगळवारी प्रथमच ८,१०० पार झाला. व्यवहारअखेर त्यात ५५.३५ अंश वाढ होऊन निर्देशांक ८,०८३.०५ वर पोहोचला. उल्लेखनीय म्हणजे  मिड व स्मॉल कॅपही अनुक्रमे ०.८४ व ०.९१ टक्के वाढ नोंदविते झाले.
२०१४-१५ च्या एप्रिल ते जून या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादनाने ५.७ टक्के वाढ नोंदविली आहे. तर देशाने चालू खात्यातील तूटही सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १.७ टक्के अशी राखली आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत ही तूट ४.८ टक्के होती. भाजपप्रणीत आघाडी सरकारच्या स्थापनेच्या कालावधीत हे सारे घडून आल्याची भावना गुंतवणूकदारांची झाली असून गेल्या दोन दिवसांपासून त्याची प्रतिक्रिया भांडवली बाजारातही उमटत आहे. सोमवारीही सेन्सेक्स २६,९०० च्या विक्रमावर पोहोचला होता, तर निफ्टीने इतिहासात प्रथमच ८,००० चा पल्ला ओलांडला होता. सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकाची शिखर सर कायम राहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३२३ समभाग वार्षिक उच्चांकावर
सर्वोच्च टप्प्यावरील मुंबई शेअर बाजारातील ३२३ कंपन्यांचे समभाग मूल्य वर्षांच्या उच्चांकाला झेपावले. यामध्ये एसीसी, भारती एअरटेल, सिप्ला, डॉ. रेड्डीज् लॅबोरेटरीज, आयसीआयसीआय बँक, हीरो मोटोकॉर्प, इंडियन ऑइल, ल्युपिन फार्मा, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, मारुती सुझुकी, टेक महिंद्रा यांचा समावेश राहिला.  प्रमुख निर्देशांकांनी सलग तिसऱ्या सत्रात विक्रमी नोंद केली आहे. सोमवारीही वार्षिक उच्चांकावर पोहोचणाऱ्या कंपनी समभागांची संख्या २७५ होती. तर या दिवशी बाजारात विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी ५५४.१४ कोटी रुपयांची खरेदी केली होती.

२६ ते २७ हजार विक्रमी ४० सत्रांत
गेल्या ४० व्यवहारांमध्ये सेन्सेक्स एक हजाराने वधारला आहे. ७ जुलै रोजी मुंबई निर्देशांक २६ हजारांवर होता. जवळपास सव्वा महिन्यांनंतर सेन्सेक्स २७ हजारापल्याड पोहोचला आहे. तर निफ्टीने ७,००० ते ८,००० हा प्रवास ७८ दिवसांत पार पाडला आहे.

Web Title: Sensex up nearly 100 points set to cross 27000 mark
First published on: 03-09-2014 at 01:08 IST