बिगर बँकिंग वित्तीय क्षेत्रातील आघाडीच्या श्रीराम समूहातील उपकंपनी ‘श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’ने मार्च २०१५ अखेर ६५० कोटी रुपयांचे घरांसाठी कर्ज वितरीत करण्याचे उद्दिष्ट राखले आहे. या कालावधीत ही कंपनी तिच्या शाखांची संख्येतही २५ इतकी भर घालणार आहे.
गृहवित्त क्षेत्रात २०११ मध्ये सुरुवात करणाऱ्या श्रीराम हाऊसिंग फायनान्सने मार्च २०१४ अखेर ४०० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. तर कंपनीच्या सध्याच्या शाखांची संख्या ४९ आहे. श्रीराममध्ये ३ हजारांहून अधिक मनुष्यबळ आहे.
श्रीराम हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुजन सिन्हा यांनी याबाबत सांगितले की, माफक दरातील घरांसाठी वित्तीय पुरवठा करण्यात समूह आघाडीवर असून सध्या आमचे ९० टक्के कर्जदार ग्राहक याच प्रकारातील आहेत. सरासरी १० लाख रुपयांच्या १० वर्षे कालावधीच्या कर्जासाठी कंपनी १४ ते १५ टक्क्यांपर्यंत व्याजदर आकारते. स्थापनेच्या सुरुवातीला ८० टक्क्यांपर्यंतचे अस्तित्व दक्षिण भारतात असणाऱ्या समूहाने आता गृहवित्तबाबत देशातील अन्य भागांतही विस्तार करण्याचे ध्येय राखले आहे.

व्याजदरात लक्षणीय तफावत
गृह कर्जासाठी सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याजदर वार्षिक १० टक्क्यांच्या जवळपास आहे. तुलनेत बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचे दर १५ टक्क्यांच्याही वर जातात. ही तफावत कमी करावयाची असेल तर रिझव्‍‌र्ह बँक व केंद्र सरकारने बिगर बँकिंग वित्त क्षेत्राला प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणे गरजेचे आहे. २०२२ पर्यंत सर्वासाठी घर हे सरकारचे उद्दिष्ट लक्षात घेता देशात ९ कोटी घरांची निकड असून यामार्फत ३ लाख कोटी रुपयांच्या वित्तपुरवठय़ाची गरज निर्माण होणार आहे. माफक दरातील घरांची निर्मिती निमशहरी, ग्रामीण भागात होण्यासाठी विकासकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.
’   सुजन सिन्हा, मुख्याधिकारी, श्रीराम हाऊसिंग फायनान्स