देशातील बँकिंग अग्रणी स्टेट बँकेच्या समभागाचे नियोजित १:१० विभाजन गुरुवारपासून अमलात आले आणि समभागाने बाजारात झालेल्या व्यवहारात २.०५ टक्क्य़ांनी उसळून दिवसअखेर २९७.१० रुपयांचा भाव गाठला. स्टेट बँकेपाठोपाठ, देशातील अन्य बडय़ा बँका जसे आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या समभागांचे विभाजन प्रस्तावित करण्यात आले आहे.
स्टेट बँकेच्या समभागाचे १:१० विभाजन म्हणजे, गुंतवणूकदारांकडे बुधवापर्यंत बँकेचा एक समभाग असेल तर त्या एका समभागाचे १० समभाग त्यांच्या डिमॅट खात्यात येतील.
स्टेट बँकेच्या समभागाचा बुधवारचा बंद भाव २९१४.४० रुपये होता, समभागाचे विभाजन झाल्यानंतर, गुरुवारी २९४.७५ रुपये या स्तरावरून या समभागात व्यवहार सुरू झाला. याचा अर्थ समभागाचे मूल्य एकदशांशाने कमी झाले आणि अनेक गुंतवणूकदारांच्या दृष्टीने हा भाव परवडणारा व आकर्षक ठरला असेल. समभाग विभाजनाच्या निर्णयामागे अनेक कंपन्यांचा हेतू हा समभागामध्ये गुंतवणूकदारांचा सहभाग व्यापक करावा, असाच असतो. शिवाय व्यवहारयोग्य समभागांची संख्या दसपटीने वाढेल. त्यामुळे हा समभाग तुलनेने तरल बनेल आणि प्रसंगी त्या परिणामी उलाढालीचे प्रमाणही वाढेल.
पण काही हजारात असलेला भाव परवडण्याजोगा झाला म्हणजे विभाजित झालेल्या समभागातील गुंतवणूक ही फायदा देणारीच ठरेल, असा ठाम निष्कर्ष काढता येणार नाही. अर्थात स्टेट बँकेसारख्या ‘ब्लूचीप’ समभागासाठी याचे उत्तर होकारार्थी असले तरी अलीकडचा तपशील संमिश्र चित्र पुढे आणतो. शेजारच्या चौकटीत विभाजनानंतर सकारात्मक व नकारात्मक परतावा देणारे सर्व समभाग हे नामांकित व भक्कम आर्थिक पाया असलेल्या कंपन्यांचे असून, विभाजनानंतरच्या एका वर्षांत त्यांच्या परताव्याचे प्रमाण दमदार १५४.७४ टक्के तर काहींबाबतीत ते उणे ७० टक्क्यांपर्यंत नकारात्मक राहिले आहे. निष्कर्षांप्रत म्हणता येईल की, विभाजन झाल्याने महागडा वाटणारा समभाग आवाक्यात आल्याचे भासले तरी तो फायदा देणाराच ठरेल, असे म्हणता येणार नाही.e07e08