भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकारने उचललेल्या पावलांनी मोहित होऊन अमेरिकेच्या एक्झिम बँकेने येथील पायाभूत सेवा क्षेत्रातील विशेषत: खासगी ऊर्जा प्रकल्पांना अर्थसहाय्य देण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे.
अमेरिकेच्या एक्झिम बँकेचे (एक्सपोर्ट-इम्पोर्ट) अध्यक्ष फ्रेड पी. होशबर्ग हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री केरी यांच्यासह दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान त्यांनी अनेक खासगी प्रकल्प, कंपनी प्रमुखांच्या भेटी घेतल्या. यावेळी करण्यात आलेल्या कराराबाबत काहीही सांगण्यास नकार देतानाच आगामी कालावधीत ऊर्जा, खनिकर्म तसेच तेलरसायन प्रकल्पांना वित्तपुरवठय़ासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे होशबर्ग यांनी मुंबई सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर खासगी क्षेत्राला वित्तपुरवठा करण्यात एक्झिम बँक आघाडीवर आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या २०१४ पर्यंत निर्यात दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाला आकार देणारे होशबर्ग हे तेथील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा भारताला भेट दिली आहे. एक्झिम बँकेने भारतातील विविध प्रकल्प, कंपन्यांसाठी ८.५ अब्ज डॉलपर्यंतचे वित्त सहकार्य केले आहे.आपला सध्याचा दौरा व जानेवारीतील भारत भेट या दरम्यान देशातील अर्थव्यवस्थेचे चित्र मोठय़ा प्रमाणात पालटले असून, ऊर्जा कंपन्यांना विदेशातून कोळसा आयात करण्यास येथील केंद्र सरकारने दिलेल्या परवानगीने बँकेच्या आशाही उंचावल्याचे होशबर्ग यांनी सांगितले. भारतात चालू खात्यातील तूट, महागाई ही आव्हाने असून देशाचा प्रवास तूर्त बिकट वाटत असला, तरी दीर्घ कालावधी एकूणच चांगला आहे, असेही ते म्हणाले.
भारत हा एक तरुण लोकशाहीप्रधान देश असून, आपल्याला येथील आगामी निवडणुका तसेच येणारे नवे सरकार याबद्दल उत्सुकता असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.