ऑक्टोबरमध्ये  देशांतर्गत विक्रीत वाढ निर्यात मात्र यथातथाच
इंधन दरवाढ आणि रुपयाच्या अवमूल्यनाचा फटका गेल्या अनेक महिन्यांपासून सहन करणाऱ्या भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांना यंदाचा दसरा तुलनेने चांगला गेला आहे. या कालावधीत अनेक कंपन्यांच्या प्रवासी वाहनांची विक्री वधारली आहे. हीच स्थिती दुचाकी निर्मात्या कंपन्यांचीही आहे. सूट-सवलतींच्या जोरावरील ही प्रगती आता दिवाळीतही कायम राहते काय हे मात्र महिन्याभरानंतरच स्पष्ट होईल. ऑक्टोबरमध्ये मारुती, ह्युंदाईची देशांतर्गत विक्री किरकोळ वाढली आहे. दोन्ही कंपन्यांनी निर्यातीत मात्र अनुक्रमे लक्षणीय वाढ व घसरण अनुभवली आहे. होन्डा, जनरल मोटर्स, फोर्ड, टोयोटा, किर्लोस्कर यांनी वाढ नोंदविली आहे. तर टाटा मोटर्स आणि महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्रला यंदा अनुक्रमे २८ व ५ टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे. दुचाकीमध्ये हीरो मोटोकॉर्प, होन्डा मोटारसायकल, इंडिया यामाहा, टीव्हीएस, सुझुकी यांनी वाढ राखली आहे.