भांडवली बाजारात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांनी ऐतिहासिक शिखर सर करणे ही गुंतवणूकदारांना मोहात पाडणारी बाब असली, तरी अशा महागडय़ा बाजारात नव्याने गुंतवणूक ही नेहमीच जोखमीची असते. अशा समयी गुंतवणूक करायची झाल्यास, समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंड हे उपयुक्त साधन आहे, त्यातही डायनॅमिक इक्विटी फंड  एक चांगला पर्याय ठरले आहेत.

डायनॅमिक इक्विटी फंड ही म्युच्युअल फंडाची अशी श्रेणी आहे, जी नावाप्रमाणे आपल्या गुंतवणूक भांडाराचे गतिमान् व्यवस्थापन सातत्याने करीत असतात, जेणेकरून बाजारातील वादळी चढ-उतारांपासून गुंतवणूकदारांचे संरक्षण केले जाईल. अर्थात बाजार जेव्हा घसरणीला असतो, तेव्हा या फंडातून अधिकाधिक गुंतवणूक केली जाते आणि चढय़ा बाजारात गुंतवणुकीची मात्रा कमी केली जाते. फंड्स इंडियाच्या म्युच्युअल फंड संशोधनाच्या प्रमुख विद्या बाला यांच्या मते, प्रचंड लवचीकता हे डायनॅमिक इक्विटी फंडांचे मुख्य वैशिष्टय़ असून, त्यापायी प्रसंगी १०० टक्क्यांपर्यंत विशिष्ट मालमत्ता वर्गातही त्यांची गुंतवणूक जाऊ शकते.

बाजाराच्या पातळीनुरूप डायनॅमिक इक्विटी फंडांमधून गुंतवणुकीचा कल बदलत असल्याने, डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांच्या तुलनेत या फंडाकडून अस्थिरता अधिक उत्तमरीत्या हाताळली जाते, असे इन्व्हेस्को म्युच्युअल फंडांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी ताहेर बादशहा यांनी स्पष्ट केले. डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांना कोणत्याही बाजारस्थितीत संपूर्ण गुंतलेले राहणे अपरिहार्य असते. त्याउलट डायनॅमिक इक्विटी फंडांना समभाग गुंतवणूक कमी करून, रोखसदृश गुंतवणूक वाढविण्याची लवचीकता बाजारातील आकस्मिक घसरणीत गुंतवणुकीच्या संरक्षणाचे काम करते.

उदाहरण म्हणून १० वर्षांची उमदी कामगिरी राहिलेल्या इन्व्हेस्को इंडियाच्या डायनॅमिक इक्विटी फंडांकडे पाहता येईल. या फंडाने वेगवेगळ्या बाजारस्थितीत निरंतर जोखीमसंतुलित चांगला परतावा दिला आहे, तर मंदावलेल्या बाजारात गुंतवणूकदारांना आवश्यक ते संरक्षणही बहाल केले आहे. या फंडात जर गुंतवणूकदाराने दरमहा १० हजार रुपयांची एसआयपी केली असल्यास, पाच वर्षांत १४.१९ टक्के सरासरी वार्षिक दराने, सात वर्षांत १३.५७ टक्के दराने परतावा गुंतवणूकदारांनी मिळविला आहे. याच कालावधीत या फंडांचा संदर्भ निर्देशांक अर्थात एस अॅण्ड पी बीएसई १०० निर्देशांकाचा परतावा अनुक्रमे १२.३६ टक्के आणि ११.१९ टक्के इतका राहिला आहे.

विद्यमान बाजारस्थितीत डायनॅमिक इक्विटी फंडांची गुंतवणूक रणनीती खासच उपयोगी असल्याचा विश्लेषकांचा दावा आहे. फंडातून चांगल्या १५ ते ३० समभागांत गुंतवणूक केली जाते. हे समभाग लार्ज कॅप असल्याने ही गुंतवणूक तरलही असते आणि संलग्न भागभांडाराला स्थिरता तसेच जोखीमसंतुलित लवचीकताही प्रदान करणारी ठरते.

 

जीएसटीपश्चात व्हॅल्यू फंड१६चा चार क्षेत्रांवर गुंतवणूक भर

मुंबई : वस्तू व सेवा कर प्रणालीच्या (जीएसटी) अंमलबजावणीने अर्थव्यवस्थेवरील परिणामकारकता महिनाभरात दृश्यरूपात पुढे आलेली नसली तरी अर्थव्यवस्थेला असंघटित ते संघटित असे वळण लावणारे हे महत्त्वाचे संक्रमण निश्चितच ठरले आहे. या स्थितीत माहिती-तंत्रज्ञान, औषधी, बँकिंग आणि पायाभूत सुविधा यांसारख्या लाभार्थी क्षेत्रांवर गुंतवणुकीचा कल ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल व्हॅल्यू फंड – सिरीज १६’च्या निधी व्यवस्थापकांनी स्पष्ट केला आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या या मुदत बंद (क्लोज्ड एंडेड) साडेतीन वर्षे मुदतीच्या समभागसंलग्न फंडाचे व्यवस्थापन एस. नरेनसारखे चतुरस्र निधी व्यवस्थापक करीत असून, इहाब दलवाई हे त्यांचे साहाय्यक आहेत. विशेषत: या चारही उद्योगक्षेत्रातील कंपन्यांचे मूल्यांकन आकर्षक पातळीवर असणे ही जमेची बाजू असून, सद्य:स्थितीत विरोधाभासी ठरणारे हे पाऊल फायद्याचेही ठरेल, असा त्यांचा होरा आहे.

माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा आगामी वृद्धी ही १० टक्के पातळीखाली राहण्याचे संकेत असले तरी भारतीय तसेच जागतिक अवकाशात त्यांचे स्पर्धात्मक मूल्य कायम राहणार आहे. अमेरिकेच्या औषध नियामकांकडून (एफडीए) कारवायांनी त्रस्त औषधी क्षेत्राची देशांतर्गत बाजारपेठ ही १२ ते १४ टक्के दराने निरंतर वाढत असल्याकडे दुर्लक्षिता येणार नाही, असे नरेन यांनी स्पष्ट केले.

सरकारचा भर हा पायाभूत सोयीसुविधांच्या विकासावर स्पष्टपणे दिसत आहे. याच क्षेत्रात मोडणाऱ्या ऊर्जा, खाणकाम, दूरसंचार, बांधकाम आणि वाहतूक आदी बुडित कर्जापायी अरिष्टग्रस्त क्षेत्रांना उभारी मिळणे अपरिहार्य आहे. संकटग्रस्त असल्याने या क्षेत्रातील समभाग अत्यंत आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध असल्याचे एस. नरेन यांचे म्हणणे आहे. याच कारणाने रखडलेल्या विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये अडकलेला बँकांचा थकीत वित्तपुरवठा मोकळा होईल. शिवाय नवीन कायद्यान्वये दिवाळखोरीची प्रक्रिया करून बुडीत कर्जाच्या वसुलीचा मिळालेला अधिकार बँकांच्या पथ्यावर पडेल, असे त्यांचे विश्लेषण आहे. त्यामुळे सद्य बाजार तेजीत काही पिछाडीवर राहिलेल्या; परंतु भविष्यातील संकेत पाहता आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध समभागांमध्ये गुंतवणुकीचे धोरण अनुसरत असल्याचे त्यांनी सांगितले.