नाशिक जिल्ह्य़ातील दिंडोरी येथे तयार होणाऱ्या पॉझ वाइन्स कंपनीच्या विविध उत्पादनांना देशातील विविध भागांसह परदेशातूनही मागणी येत असल्याची माहिती कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी दिली. कंपनीतर्फे त्यांच्या दिंडोरी येथील द्राक्षांच्या मळ्यामध्ये आजवरचा पहिलाच वाइन उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पाटील बोलत होते.
सुरुवातीच्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात जम बसवल्यानंतर येत्या वर्षांत कंपनी राजस्थान, आग्रा आणि दिल्लीत आपल्या उत्पादनांच्या वितरणावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. तसेच चीन, अमेरिका आणि लिबिया या देशांमधूनही कंपनीच्या उत्पादनांना मागणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील प्रार्थना उद्योग समुहाच्या माध्यमातून रिअल इस्टेटच्या व्यवसायात आपला ठसा उमटवल्यानंतर पाटील यांनी २००५ साली वाइन उद्योगात प्रवेश केला. दिंडोरी येथे आपल्या मालकीच्या १०० एकर जागेत परदेशांतून आणलेल्या खास वाइनसाठीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. स्पेनमधून टेंम्प्रानिलो या जातीची द्राक्षे कंपनीने प्रथमच भारतात आणून त्याची वाइन बनवली. २००५ साली द्राक्ष बागा घेतल्यानंतर २००९ साली प्रथमच कंपनीची वाइन बाजारात आली आणि आज दिंडोरी, बारामती आणि कर्नाटकमधील विजापूर येथे कंपनीच्या वाइनरीजमध्ये वर्षांला ६०,००० लिटरची गाळप क्षमता आहे. कंपनीच्या प्युरो व्हाइट आणि रेड, प्रिमियम पोर्ट, इंडियन क्लासिक, शिराझ, कॅबरनेट सॉविनॉन, झिनफांडेल, टेंम्प्रानिलो, मरलॉ, इंडियन नेक्टर, शेनिन ब्लाँ यांसारख्या रेड आणि व्हाइट वाइन्स ग्राहकांच्या खास पसंतीस उतरल्या आहेत. उत्तम प्रतीच्या वाइन निर्मितीसाठी द्राक्षांच्या दर्जेदार उत्पादनाकडे विशेष लक्ष द्यावे लागते आणि त्यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे कंपनीचे प्रमुख वाइन मेकर राजेश रसाळ यांनी सांगितले.
नव्या प्रदेशांत आणि देशांत आपल्या उत्पादनांचा खप वाढवण्यासाठी ग्राहकांमध्ये वाइनविषयी जागृती करण्यावर भर देत असल्याचे कंपनीचे सरव्यवस्थापक रणजीत सुर्वे यांनी सांगितले. देशाच्या विविध राज्यांत वेगवेगळ्या कर आकारणी पद्धती आणि कठोर कायदे हे या क्षेत्रातील अडथळे असून ते सरकारने दूर करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाटील यांनी द्राक्ष उत्पादकांना व वाइन कंपन्यांना फायदा होण्यासाठी अधिकाधिक प्रमाणावर पीक विमा करण्यावर भर दिला.
सर्व उत्पन्नगटांसाठी आणि वेगवेगळ्या रुचीच्या ग्राहकांसाठी आपण दर्जेदार उत्पादने तयार करतो आणि देशात केवळ पॉझ वाइन्सच्या बाटल्यांवरच वाइनमधील पोषणविषयक घटकांची नोंद केलेली असते, असेही पाटील यांनी सांगितले. देशात अल्कोहोलचे प्रमाण जास्त असलेल्या मद्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. त्याऐवजी योग्य प्रमाणात घेतल्यास वाइन हा तुलनेने आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो, असे ते म्हणाले.
येत्या वर्षांत कंपनी राजस्थान, आग्रा आणि दिल्लीत आपल्या उत्पादनांच्या वितरणावर भर देणार आहे. चीन, अमेरिका आणि लिबिया या देशांमधूनही कंपनीच्या उत्पादनांना मागणी आहे.
– राजेश पाटील, संस्थापक, पॉझ वाईन्स.