नवी दिल्ली : वाढती महागाई, पुरवठा साखळीतील व्यत्यय, भू-राजकीय तणावामुळे अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यास अडचणी असल्याने चालू आर्थिक वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग ७.५ टक्क्यांवर मर्यादित राहील, असा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालातून मंगळवारी व्यक्त करण्यात आला. बँकेकडून दुसऱ्यांदा अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या अनुमानात बदल करण्यात आला आहे. यापूर्वी तिने अर्थव्यवस्था ८.७ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. एप्रिलमध्ये त्या अंदाजात सुधारणा करून ८ टक्क्यांच्या आणि आता त्यात आणखी सुधारणा करत तो ७.५ टक्क्यांपर्यंत तिने खाली आणला आहे.