यश बिर्ला समूहाच्या मुंबईसह नवी दिल्लीतील विविध २० हून अधिक मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी छापे टाकले. समूहातील पाच कंपन्यांनी कर चुकविल्याबद्दल ही कारवाई केल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी उशिरा सांगितले. संबंधित कंपन्यांच्या अनेक आर्थिक व्यवहार तपासले जात असून याबाबत दोन ते तीन दिवसांनंतरच अधिक चित्र स्पष्ट होईल, असेही तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत विभागाच्या प्रवक्त्याने कोणतीही माहिती दिली नसल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. १५० वर्षे जुन्या यश बिर्ला समूहाची वार्षिक उलाढाल ३,००० कोटी रुपयांची असून समूह वाहन, अभियांत्रिकी, स्टील पाइप, मशिन टूल्स, विद्युत उपकरणे आदी निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. आरोग्य, जीवनशैली, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रांतही कार्यरत आहे.