News Flash

फंडाचा ‘फंडा’… : तेजीला सामोरे जाताना

केवळ व्याजदर नीचांकी आहेत म्हणून समभाग गुंतवणुकीसारख्या आर्थिक जोखमीच्या-मालमत्तेत गुंतवणूक करणे चुकीचे आहे.

फंडाचा ‘फंडा’… : तेजीला सामोरे जाताना

|| भालचंद्र जोशी
|थोर अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूक मार्गदर्शक बेंजामीन ग्रॅहम, यांच्या ‘इन द शॉर्ट रन द मार्केट इज व्होटिंग मशीन, बट इन द लाँग रन इट इज वेईंग मशीन’ या वाक्याची आठवण व्हावी अशी परिस्थिती आहे. वैश्विक मंदीदरम्यान १९२९ ते १९३३ दरम्यानच्या बाजाराच्या वर्तनावर बेंजामीन ग्रॅहम यांनी केलेले हे भाष्य आहे. बाजार नेहमीच भावनेवर स्वार असतो. येथे एका निश्चित किमतीवर घेणारे किंवा विकणारे असतात. काहींना तो समभाग वेगाने घसरेल असे वाटते, तर काहींना तोच समभाग सध्याच्या किमतीत अतिशय आकर्षक मूल्यांकनावर आहे असा विश्वास असतो. संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या मानसिकतेचा अंदाज बांधणे अतिशय कठीण असते. या पार्श्वभूमीवर मला जगातील आणि विशेषत: भारतातील गुंतवणूकदारांच्या आर्थिक वर्तनासंबंधी दोन गोष्टींची वाचकांना आठवण करून द्यावीशी वाटते. पहिले आर्थिक वर्तन ‘टीना’ (देअर इज नो अल्टरनेटिव्ह). जगभरात व्याजदर कमी असल्याने समभाग गुंतवणुकीला पर्याय नाही. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून कोट्यवधी डॉलर्सच्या ‘बाँड-बाइंग प्रोग्रॅम’ची घोषणा होत असल्याने बचतकर्ते रोखे गुंतवणुकीपासून दूर जात आहेत. साहजिकच अभूतपूर्व सट्टेबाजीचा उत्साह वाढला आहे.

केवळ व्याजदर नीचांकी आहेत म्हणून समभाग गुंतवणुकीसारख्या आर्थिक जोखमीच्या-मालमत्तेत गुंतवणूक करणे चुकीचे आहे. जोखीम आणि परताव्याचा इष्टतम समतोल साधणारा पोर्टफोलिओ तयार करणे ज्यात समभाग मौल्यवान धातू, रोखे, डॉलर निर्देशित गुंतवणूक इत्यादी संभाव्य अस्थिरता कमी करते. अनेकदा केवळ समाधानकारक परतावा मिळत नाही म्हणून आदर्श पोर्टफोलिओला छेद देणारे मालमत्ता विभाजन केलेले दिसते. सेवानिवृत्तीनंतर स्मॉल कॅपची मात्रा कमी करीत जाणे अपेक्षित असताना ‘म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयोमान’ असलेले गुंतवणूकदार केवळ अधिक परतावा मिळविण्यासाठी स्मॉल कॅप फंडांचा गुंतवणुकीत सळसळत्या उत्साहाने समावेश करताना नक्कीच दिसत आहेत.

दुसरे आर्थिक वर्तन ‘फोमो’ (फिअर ऑफ मिसिंग आऊट). जगभरात बाजाराशी संबधित गुंतवणूकदार सध्या ‘फोमो’ (गहाळ होण्याची भीती) या दोषाला बळी पडताना दिसत आहेत. भारतसुद्धा या रोगाला अपवाद नाही. भारतात ज्या वेगाने डिमॅट खाती उघडली जात आहेत ते पाहता ही खाती उघडणारे सर्व हौशे गुंतवणूकदार किंवा ज्यांनी कधी बाजारात गुंतवणूक केली नाही असे नवशे ‘फोमो’चे बळी ठरत असल्याचा संकेत मिळत आहे.

‘फोमो’चा दुसरा परिणाम असा की, कर्ज घेऊन बाजारात गुंतवणूक करणे. वॉरेन बफे यांचे एक सुंदर वाक्य आहे – श्रीमंत होण्यासाठी (संपत्ती कमावण्यासाठी) कर्ज घेण्याची आवश्यकता नाही. बहुतेक लोक घर खरेदीसाठी कर्ज घेतात. कारण रोख रक्कम मोजून घर खरेदी करणे फारच कमी लोकांना शक्य असते. राहते घर हे मालमता म्हणून गणले जात नाही. ती गरज असते. सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे आर्थिक बाजारपेठांमध्ये आपण आपल्या स्वत:च्या पैशांपैकी केवळ १ लाखावर २ लाख किमतीचे शेअर्स खरेदी करू शकतो. बाजाराच्या भाषेत याला ‘मार्जिन फंडिंग’ असे म्हणतात. वैश्विक मंदीसारख्या तीव्र मंदीत हे लाख रुपयेसुद्धा गमावले जातील. म्हणून तेजीच्या लाटेवर स्वार होताना उन्मादापेक्षा जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. विवेकी वागण्यामुळे आपली संपत्ती संथपणे परंतु निश्चितपणे वाढत जाईल.

बेंजामीन ग्रॅहम यांनी मतदान यंत्र आणि वजनकाटा ही गुंतवणूकदारांच्या टोकाच्या मानसिकतेची प्रतीके म्हणून वापरली आहेत. मतदार मतदान हे विवेकापेक्षा भावनेने करतात, तर वजनकाटा व्यक्तीसापेक्ष वजन बदलत नाही. या दोन रूपकांवरून असे सूचित केले आहे की, अल्पकालीन किमतीवर भावनेचा काबू असतो; परंतु दीर्घकालीन बाजारभाव भावनेपेक्षा आर्थिक परिणामानुसार ठरत असतात. बाजाराचे मूल्यांकन टोकाचे असताना जुन्या गोष्टी नव्याने आठवण्याची गरज आहे.

लेखक व्हाइट ओक कॅपिटल  मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी

bhalchandra.joshi@whiteoakindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2021 12:03 am

Web Title: economist investment guide benjamin graham in the short run the market is a voting machine there is no alternative akp 94
Next Stories
1 रपेट बाजाराची : नवे सिद्धांत
2 बाजाराचा तंत्र-कल : तीनशे अंशांच्या परिघात निफ्टीची परिक्रमा
3 तरुणांना खुणावतोय… विम्याचा विस्तार आणि संस्थात्मक प्रसार
Just Now!
X