विद्याधर अनास्कर

अत्यंत हट्टाने गव्हर्नरपदी ब्रिटिश व्यक्तीच असावी अशी योजना ब्रिटिशांनी केली. अशा तऱ्हेने गव्हर्नरपदी आलेले ओसबर्न स्मिथ यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. पहिल्याच गव्हर्नरांवर भ्रष्टाचार, गरव्यवहार, अनतिक वर्तन, गटबाजी असे गंभीर आरोप झाले. म्हणजे सुरुवातीलाच ब्रिटिशांनी रिझव्‍‌र्ह बँकेची पत घालवली. मात्र डेप्युटी गव्हर्नर पदावर वर्णी लागलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी गरजेनुसार रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णय प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावत मिळालेल्या संधीचे सोने केले. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्यपूर्व काळातच रिझव्‍‌र्ह बँकेच्या भारतीयीकरणात महत्त्वाचे योगदानही दिले.

मणिलाल नानावटी यांच्यासारखे भारतीय अधिकारी आपल्या हुशारीने, कार्यतत्परतेने रिझव्‍‌र्ह बँकेचा नावलौकिक वाढवत असताना गव्हर्नरपदी असलेल्या ओसबर्न स्मिथ यांची कारकीर्द मात्र वादग्रस्त ठरत होती. ब्रिटिशांनी रिझव्‍‌र्ह बँकेवर आपले नियंत्रण राहावे म्हणून अत्यंत हट्टाने गव्हर्नरपदी ब्रिटिश व्यक्तीच असावी अशी योजना केली होती. तरी पहिल्याच गव्हर्नरांवर भ्रष्टाचार, गरव्यवहार, अनतिक वर्तन, गटबाजी इ. गंभीर आरोप झाले. तसेच त्यांचे सहकारी डेप्युटी गव्हर्नर जेम्स टेलर व तत्कालीन वित्त सचिव जेम्स ग्रिग व अंडर सेक्रेटरी फिंडलेटर स्टीवर्ट यांच्याशी त्यांचे नुसते टोकाचे नव्हते तर हाडाचे वैर होते. या पाश्र्वभूमीवर डेप्युटी गव्हर्नर या पदावर वर्णी लागलेल्या भारतीय अधिकाऱ्यांनी गरजेनुसार रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्णय प्रक्रियेत मोलाची भूमिका बजावत मिळालेल्या संधीचे सोने केले व स्वातंत्र्यपूर्व काळातच रिझव्‍‌र्ह बँकेचे पूर्णत: भारतीयकरण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ओसबर्न यांनी गव्हर्नरपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काही महिन्यांतच म्हणजे डिसेंबरमध्ये वित्त सदस्य जेम्स ग्रिग यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. डेप्युटी गव्हर्नर टेलर यांना लिहिलेल्या पत्रामध्ये रिझव्‍‌र्ह बँकेच्या शेअर्समध्ये सतत होणाऱ्या अनियमित चढ-उतारामागे ओसबर्न यांचा हात असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्याकडील माहितीच्या आधारे अफवा पसरवून त्याआधारे शेअर बाजारात कृत्रिम चढ-उतार घडवून आणत शेअर्सच्या खरेदी-विक्रीतून भरपूर पसे कमावल्याचा गंभीर आरोप ओसबर्न यांच्यावर केला गेला. वित्त सदस्यांच्या या गंभीर आरोपाला कलकत्ता स्टॉक अ‍ॅण्ड शेअर्स ब्रोकर फर्मचे सीनियर पार्टनर वॉल्टर क्रॅडॉक यांनी पुष्टी दिल्याने सुरुवातीलाच रिझव्‍‌र्ह बँकेची विश्वासार्हताच धोक्यात आली होती. ओसबर्न यांच्या सूचनेनुसार अफवा पसरविण्याचे काम अत्यंत बेमालूमपणे जसे शेअर बाजारातील त्यांचे धनाढय़ मित्र करत होते, तसेच ‘इंडियन फायनान्स’ या साप्ताहिकाचे संपादक सी. एस. रंगास्वामी यांचादेखील त्यामध्ये हात असल्याचे निष्पन्न झाले. किंबहुना, ओसबर्न यांच्या गरव्यवहारात रंगास्वामी हे भागीदार असल्याचेही आरोप केले गेले.

ज्यावेळी दक्षिणेकडील बँकांवर आíथक संकट आले, त्यावेळी अडचणीतील बँकांना रिझव्‍‌र्ह बँकेकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन वजा लालूच आपल्या जाहीर भाषणात रंगास्वामी यांनी केल्याची तक्रार त्रावणकोर राज्याचे तत्कालीन दिवाण (मुख्यमंत्री) रामास्वामी अय्यर यांनी वित्त सदस्य ग्रिग यांच्याकडे केली. त्रावणकोर राज्यातील अडचणीत असलेल्या बँकांना रंगास्वामी यांच्या मध्यस्थीने रिझव्‍‌र्ह बँकेकडून बिल-डिस्काऊंटिंग सवलतही दिली गेली. या अनावश्यक मध्यस्थीवर तीव्र आक्षेप नोंदवत वित्त सदस्य ग्रिग यांनी ओसबर्न यांना पत्र लिहून रंगास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली. रंगास्वामी व ओसबर्न यांची मत्री जगजाहीर असल्याने त्यावेळी रिझव्‍‌र्ह बँकेवर सर्व स्तरांतून प्रचंड टीका झाली. अशा अत्यंत अडचणीच्या व नाजूक प्रसंगानंतर तत्कालीन भारतीय डेप्युटी गव्हर्नर मणिलाल नानावटी यांनी स्वत: त्रावणकोर येथे जाऊन नायब दिवाण यांची भेट घेत परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळत रिझव्‍‌र्ह बँकेविरुद्धचा क्षोभ शमविण्यात यश मिळविले. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक स्वत: नायब दिवाणांनी केल्याचे आपण मागील लेखात वाचले असेलच. यामुळे साहजिकच डेप्युटी गव्हर्नर मणिलाल नानावटी यांचे भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेतील महत्त्व वाढले व त्याचा लाभ पुढे रिझव्‍‌र्ह बँकेचे भारतीयीकरण लवकर होण्यात झाला.

ओसबर्न यांच्या गरव्यवहारांबद्दल सीबीआयच्या कलकत्ता शाखेनेदेखील आपल्या २९ डिसेंबर १९३५च्या अहवालात ओसबर्न यांचे नाव न घेता रिझव्‍‌र्ह बँकेचे काही अधिकारी शेअर बाजारातील काही धनाढय़ व्यक्तींच्या साहाय्याने (बद्रिदास गोएंका आणि मणिराम बांगुर) अफवांच्या युक्त्यांद्वारे भरपूर नफा कमावत असल्याचे व तो नफा ओसबर्न स्मिथ व त्यांचे मित्र संपादक रंगास्वामी यांच्यापर्यंत जात असल्याचे नमूद केले होते. परंतु इतका पुरावा असूनही वित्त सदस्य ग्रिग यांनी सीबीआयच्या कलकत्ता शाखेला या प्रकरणात खोलात जाऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या नाहीत. यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अशाप्रकारे एखाद्या उच्चपदस्थ ब्रिटिश अधिकाऱ्याची जाहीर चौकशी म्हणजे जसे ब्रिटिश राजवटीच्या प्रतिमेला धक्का पोहचविणे होते, तसेच नुकत्याच स्थापन झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ देण्यासारखेच होते.

या सर्व घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर रिझव्‍‌र्ह बँकेच्या सुरुवातीच्या काळातच वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडल्याने बँकेचे कामकाज ठप्प होण्याची वेळ आली होती. सीनियर डेप्युटी गव्हर्नर जेम्स टेलर व वित्त सदस्य जेम्स ग्रिग हे जसे ओसबर्न यांचे विरोधक होते, तसेच ते जुने स्नेहीदेखील होते. ब्रिटिश सिव्हिल सíव्हसेसच्या १९१३ मध्ये झालेल्या परीक्षेत ग्रिग प्रथम, तर जेम्स टेलर दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे त्या दोघांची घट्ट मत्री हीदेखील ओसबर्न यांच्या विरोधातील धार प्रखर करण्यास कारणीभूत होती, परंतु ओसबर्न यांच्यावर बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर मोंटाग्यू नॉर्मन यांचा वरदहस्त असल्याने व नॉर्मन यांचे वजन ब्रिटिश दरबारी असल्याने या संदर्भात निर्णय होण्यास उशीर लागत होता. त्याचा फटका साहजिकच रिझव्‍‌र्ह बँकेच्या कामकाजावर होत होता. डेप्युटी गव्हर्नर जेम्स टेलर आणि ओसबर्न यांच्यामधील वाद इतका विकोपाला गेला होता की, ते एकमेकांसमोर येण्याचेही टाळत होते. १९३५ मध्ये लंडन येथील रिझव्‍‌र्ह बँकेच्या कार्यालयाच्या पाहणीसाठी गेलेले ओसबर्न तेथे पाच महिने राहिले. ते भारतात परतल्याबरोबर लगेचच जेम्स टेलर सहा महिन्यांच्या दीर्घ रजेवर गेले. जेम्स टेलर परत रुजू होतात ना होतात तोच ओसबर्न पुनश्च पाच महिन्यांसाठी इंग्लंडला गेले. अशाप्रकारे एकमेकांना असहकार्य करण्यासाठी रजेचे अस्त्र वापरणाऱ्या या जबाबदार अधिकाऱ्यांना भारतीय डेप्युटी गव्हर्नर नानावटी यांनी एकही दिवस रजा न घेता आपले कर्तव्य चोख बजावत कर्तव्याचा परिपाठच घालून दिला. निर्णयाची सूत्रे स्वत:कडे आलेल्या नानावटी यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बँक ऑफ इंग्लंडचा आग्रह असतानाही बँक रेट कमी करण्याचे नाकारत आपल्या कणखरपणाचे दर्शन घडवत रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायतत्ता अबाधित राखली. अशाप्रकारे आपले कर्तव्य सिद्ध करण्याची ही सुवर्ण संधी समजूनच नानावटी यांनी भारतीयत्वाचा ठसा रिझव्‍‌र्ह बँकेवर उमटविला.

ओसबर्न यांच्यावर केवळ भ्रष्टाचार, गोपनीयतेचा भंग वगरे आरोप झाले नाहीत तर त्यांच्यावर विवाहबाह्य़ संबंधाचाही आरोप झाला व तेथेच त्यांची गच्छंती अटळ ठरली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या कलकत्ता शाखेतील एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या पत्नीबरोबर त्यांचे नाव जोडले गेले. त्या महिलेला घेऊन रिझव्‍‌र्ह बँकेच्या खर्चाने इंग्लंड प्रवासही त्यांनी केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. या आरोपानंतर मात्र मोंटाग्यू नॉर्मन यांनी मध्यस्थी करून ओसबर्न यांना राजीनामा देण्यास प्रवृत्त केले. ओसबर्न यांनी १ नोव्हेंबर १९३६ रोजी आपला राजीनामा गव्हर्नर जनरल यांच्याकडे सादर केला. परंतु त्यांना आठ महिन्यांच्या दीर्घ रजेवर पाठविण्यात आले व १ जुल १९३७ रोजी त्यांचा राजीनामा स्वीकारल्याचे जाहीर करण्यात आले. त्यांनी राजीनामा देऊन अवघड परिस्थितीतून ब्रिटिश सरकारची सुटका केली म्हणून की काय पण त्यांना ५०,००० रुपयांची ग्रॅच्युइटीदेखील देण्यात आली. अशाप्रकारे साडेतीन वर्षांची मुदत असताना केवळ १८ महिन्यांतच राजीनामा द्यावा लागलेल्या ओसबर्न यांचा प्रदीर्घ रजेचा व परदेश प्रवासाचा कालावधी पाहता त्यांनी गव्हर्नर म्हणून प्रत्यक्षात किती दिवस काम केले हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. ओसबर्न यांच्या राजीनाम्याचे पडसाद बँकेच्या वार्षकि सभेतही उमटले. अनेक सभासदांना प्रभारी गव्हर्नर असलेल्या जेम्स टेलर यांना ओसबर्न यांच्या राजीनाम्यामागील खरी कारणे विशद करण्याची मागणी केली (श्री. भरुचा) तर काही सदस्यांनी ओसबर्न यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. (श्री. कपाडिया आणि श्री. शामदासनी)

अशाप्रकारे बँकेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या अत्यंत वादग्रस्त व स्फोटक परिस्थितीचे खापर इतिहासात ओसबर्न व जेम्स टेलर यांच्यातील भांडणावर फोडण्यात येत असले तरी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे मोंटाग्यू नॉर्मन, (बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर), जेम्स ग्रिग (वित्त सदस्य) व िफडलेटर स्टीवर्ट (सीनियर अंडर सेक्रेटरी) यांची दखल इतिहासाने घेतली नसल्याचे दिसून येते. हा सर्व प्रकार पाहता सुरुवातीलाच ब्रिटिशांनी रिझव्‍‌र्ह बँकेची पत घालवली, मात्र भारतीयांनी ती राखली असेच म्हणावे लागेल.

* लेखक बँकिंग विषयातील तज्ज्ञ आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष

ई-मेल : v_anaskar@yahoo.com