22 September 2020

News Flash

‘करोना-टाळेबंदी बँक-ग्राहक नात्यांत नव्याने समीपता साधणारी!’

ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या संवादाने त्यांचे बँकेशी नाते अधिकच घट्ट बनले.

चालू वर्षांत मार्च ते ऑगस्ट हे सहा महिने कर्जदारांना त्यांचे मासिक हप्त्यांची फेड लांबणीवर टाकण्याची मुभा रिझव्‍‌र्ह बँकेने करोना आजार साथीमुळे उद्भवलेली स्थिती पाहता दिली. देशभरातील खासगी, सार्वजनिक, सहकारी बँकांकडून ही सुविधा त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचविली. तथापि या सुविधेच्या आडून फसवणूक तसेच करोना टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना ऑनलाइन गैरव्यवहाराच्या प्रकरणांचा तडाखाही बसला. याचा वेध घेताना, खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्र बँकेचे उत्पादने, पर्यायी वाहिन्या आणि ग्राहक अनुभव विभागाचे अध्यक्ष पुनीत कपूर यांच्याशी झालेली ही बातचीत..

*  कोटक महिंद्र बँकेच्या किती ग्राहकांनी ही सुविधा स्वीकारली?

– खातेनिहाय आणि ३० एप्रिल २०२० रोजी केल्या गेलेल्या मूल्यांकनानुसार, कोटक महिंद्र बँकेच्या २६ टक्के ग्राहकांनी कर्ज हप्ते लांबणीवर टाकण्याच्या सुविधेचा लाभ घेतला.

* करोना काळात अनेक प्रकारच्या ऑनलाइन सायबर घोटाळ्यांचा सुळसुळाट दिसून आला, तुमचा अनुभव कसा आहे?

– अनेक ग्राहक घरात बंदिस्त आणि घरूनच बँकेचे तसेच खरेदीचे व्यवहार करीत असल्याने, ऑनलाइन व्यवहार वाढले आणि बरोबरीने सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाणही वाढलेले दिसले. मुख्यत: केवायसी, पुन्हा केवायसी आणि ईएमआयना स्थगिती वगैरेशी संलग्न फसवणुकीचे प्रकार गेल्या काही महिन्यांत बोकाळलेले दिसून आले. यूपीआय-प्रणालीशी संलग्न घोटाळेही उघडकीस आले. घोटाळ्यांचा हा सुकाळ पाहता, सुरक्षित बँकिंग व्यवहाराच्या पद्धती ग्राहकांना समजावून देणे आणि ते फसवणुकीला बळी पडणार नाहीत याची काळजी घेणारी पावलेही आमच्यासह अनेक बँकांकडून टाकली गेली.

* अशा फसवणुकीच्या प्रकारांना ग्राहक बळी ठरण्याचे कारण काय?

– बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून खातेदारांना फसवे ई-मेल संदेश अथवा मोबाइल फोनवर संशयास्पद दुवे पाठवून त्यांना लक्ष्य करण्यात आले. जर केवायसी प्रक्रिया योग्य तो तपशील भरून ताबडतोब पूर्ण न केली गेल्यास त्यांचे बँक खाते बंद केले जाईल, असे बजावणारा संदेश आल्यावर ग्राहकांना भीती वाटणे स्वाभाविकच. करोना टाळेबंदीसारख्या संकटकाळात नवी आफत नको म्हणून अनेक ग्राहकांनी घोटाळेबाजांच्या सूचनांचे पालन करून, फसव्या दुव्यांवर टिचकी मारून त्यांना हवी ती माहिती दिल्याचे कैक प्रकार आढळून आले आहेत.

* तुमच्या बँकेबाबत अशा फसवणूक झालेल्या ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या नुकसानीला सामोरे जावे आणि त्या नुकसानीची भरपाई कशी आणि कोणी केली?

– जवळपास सर्वच बँका आणि देयक कंपन्यांबाबत असे आर्थिक फसवणुकीचे प्रकार टाळेबंदीच्या काळात घडलेले दिसले आहेत. कमी-अधिक फरकाने ते कोटक महिंद्र बँकेच्या ग्राहकांबाबतही घडले. मात्र करोना-टाळेबंदीच बँक-ग्राहक नात्यांत नव्याने समीपता साधणारीही ठरली आहे. नुकसानभरपाईचे म्हणाल तर, रिझव्‍‌र्ह बँकेने जुलै २०१७ मध्ये अधिसूचनेद्वारे, फसवणुकीचे स्वरूप आणि अनधिकृत व्यवहाराच्या प्रकारानुरूप भरपाई आणि उत्तरदायित्व निश्चित केलेले आहे. एटीएम स्किमिंग प्रकरण असो, अनधिकृत ई-व्यापार व्यवहारात बँकेकडून ग्राहकांना झालेल्या नुकसानीची पूर्ण भरपाई केली जाते.

फसवणुकीचा प्रकार आणि अनधिकृत व्यवहारांची माहिती नंतरच्या तीन कामकाज दिवसांच्या आत ग्राहकाने बँकेला कळविल्यास आणि ग्राहकांनी स्वत: काही हयगय केली नसल्यास पूर्ण नुकसानभरपाई तो मिळवू शकेल. मात्र तीनपेक्षा अधिक दिवस लोटल्यावर, म्हणजे घटनेच्या चार ते सात कामकाज दिवसांदरम्यान तक्रार नोंदविली गेल्यास ग्राहकाला नुकसानीचा काही भार सोसावा लागेल. पोलीस, सायबर गुन्हे तपास या तक्रारीनंतरच सुरू होईल.

* इंटरनेट बँकिंग घोटाळ्यांपासून संरक्षणाच्या पद्धती आणि काळजी कशी घेतली जावी?

– वर म्हटल्याप्रमाणे, करोनाकाळच ग्राहकांशी समीपतेच्या नव-अध्यायाचा काळ आमच्यासाठी ठरला. डिजिटल बँकिंग हा सर्वात सोयीस्कर पर्याय असण्याबरोबरच, ग्राहकांची सदैव साथ करणारा आणि सर्वात सुरक्षित बँक-सोबतीही आहे. केवळ काही गोष्टींची खबरदारी आणि दक्षता ग्राहकांकडून घेतली जायला हवी. सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कोणत्याही आमिष-मोहाला बळी पडून अथवा धमकीला घाबरून बँक खात्याविषयी गोपनीय माहिती इंटरनेटवरून सामायिक केली जाणार नाही, याची काळजी बँक ग्राहकानेच घ्यायची आहे. गोपनीय राखावयाची माहिती म्हणजे नेट बँकिंगचा आयडी/पासवर्ड, क्रेडिट वा डेबिट कार्डाचा सीव्हीव्ही, अथवा कार्डविषयक अन्य कोणताही तपशील, ओटीपी, पिन ही माहिती बँकेकडून केव्हाही विचारली जात नाही, हे सर्वच खातेदारांनी लक्षात घ्यायला हवे. ही माहिती विचारणारा भामटाच आहे आणि विशिष्ट दुव्यावर जाण्यास सांगणारा सापळ्यात फसवू पाहणाराच आहे, अशी खातेदारांनी पक्की खूणगाठ बांधून घ्यावी. करोनाकाळात अशा प्रकारच्या जागृतीचे संदेश देण्यासह, खातेदारांना ‘एसएमएस अलर्ट’ आणि ‘ई-मेल अलर्ट’ या सेवा क्रियान्वित करण्यास सांगण्यात आले. ग्राहकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या या संवादाने त्यांचे बँकेशी नाते अधिकच घट्ट बनले.

– व्यापार प्रतिनिधी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 1:04 am

Web Title: kotak mahindra bank puneet kapoor interview zws 70
Next Stories
1 थेंबे थेंबे तळे साचे  : मुलांसाठी गुंतवणूक 
2 बंदा रुपया :  उद्योगाचा बहर तंत्र-मैत्रीतून
3 माझा पोर्टफोलियो :  देशाच्या आत्मनिर्भरतेची अस्सल शिलेदार!
Just Now!
X