जूया आधुनिक जगात आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. विशेष प्रशिक्षण असलेल्या तंत्रज्ञांची मागणी वाढत आहे. त्यामुळे व्यवसाय—स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. व्यावसायिकांसाठी प्राप्तिकर कायद्यात काय तरतुदी आहेत याचा आढावा घेऊ या.
प्राप्तिकर कायद्याप्रमाणे धंदा आणि व्यवसाय हे दोन्ही वेगळे आहेत. या दोन्हीसाठी काही तरतुदी वेगळ्या आहेत. त्यामुळे धंदा म्हणजे काय आणि व्यवसाय म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. धंदा या संज्ञेमध्ये व्यापार, उद्योग आणि निर्मिती (मॅन्युफॅक्चरिंग) यांचा समावेश होतो. व्यवसायाची स्पष्ट व्याख्या प्राप्तिकर कायद्यात नाही. न्यायालयाने या संबंधी दिलेल्या निकालांनुसार व्यवसायामध्ये बौद्धिक कौशल्य, विशेष ज्ञान याचा वापर करून दिलेल्या सेवांचा व्यवसायात समावेश होतो. उदा. डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए., वकील, वास्तू—विशारद वगैरे.
लेखे कोणी ठेवावे :
लेखे (अकाऊंट्स) कोणते ठेवावे यासाठी प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी तीन प्रकारात विभागल्या आहेत :
* जे ठरावीक व्यवसाय करतात, यामध्ये डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए., वकील, वास्तू—विशारद, चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, अंतर्गत सजावटकार वगैरेंचा समावेश होतो.
* वरील ठरावीक व्यवसायांव्यतिरिक्त ज्या मध्ये शिक्षक, सल्लागार, वगैरे आणि
* जे धंदा करतात यामध्ये व्यापार, उद्योग, निर्मिती यांचा समावेश होतो.
जे ठरावीक व्यवसाय करतात (डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए., वकील वगैरे) त्यांच्या व्यवसायातील एकूण प्राप्ती (उलाढाल) मागील तीन वर्षांमधील कोणत्याही वर्षांत १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यावसायिकाने व्यवसाय या वर्षी सुरू केल्यास या वर्षीची एकूण प्राप्ती १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे.
उदाहरणार्थ, समजा करदाता व्यवसायाने डॉक्टर आहे त्याची आर्थिक वर्ष २०१५—१६ सालची एकूण प्राप्ती ३ लाख रुपये आहे आणि २०१६—१७ सालची एकूण प्राप्ती १ लाख रुपये आहे. त्याला २०१६—१७ सालासाठी लेखे ठेवणे बंधनकारक आहे. कारण मागील तीन वर्षांंपैकी एका वर्षांत (म्हणजे २०१५—१६ या वर्षांत) एकूण प्राप्ती १,५०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे.
या ठरावीक व्यवसायांव्यतिरिक्त व्यवसाय किंवा धंदा करणाऱ्या व्यक्तींसाठी लेखे ठेवणे बंधनकारक आहे ज्यांच्या धंदा किंवा व्यवसायातील उत्पन्न मागील तीन वर्षांंमधील कोणत्याही वर्षांत १,२०,००० रुपये किंवा एकूण प्राप्ती किंवा उलाढाल मागील तीन वर्षांमधील कोणत्याही वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीने धंदा किंवा व्यवसाय या वर्षी सुरु केल्यास या वर्षीचे उत्पन्न १,२०,००० रुपये किंवा एकूण उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा असेल तर लेखे ठेवणे बंधनकारक आहे.
उदाहरणार्थ : करदाता व्यवसायाने विमा सल्लागार आहे त्याची आर्थिक वर्ष २०१६—१७ सालची उलाढाल ८ लाख रुपये आहे आणि उत्पन्न ४ लाख रुपये (खर्च वजा जाता) आहे. जरी उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा कमी असली तरी उत्पन्न १,२०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे लेखे ठेवणे बंधनकारक आहे.
मागील अर्थसंकल्पात झालेल्या सुधारणेनुसार १ एप्रिल २०१७ (करनिर्धारण वर्ष २०१८—१९) पासून वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब यांच्यासाठी वरील १,२०,००० रुपये उत्पन्नाची मर्यादा वाढवून २,५०,००० रुपये इतकी करण्यात आली आहे आणि एकूण प्राप्ती किंवा उलाढालीची मर्यादा १० लाख रुपयांवरून वाढवून २५ लाख रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच ज्या वैयक्तिक करदाते किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यांच्या धंदा किंवा व्यवसायातील, उत्पन्न, मागील तीन वर्षांपैकी कोणत्याही वर्षांत २,५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल आणि एकूण प्राप्ती किंवा उलाढाल २५ लाख रुपयांपेक्षा कमी असेल त्यांना लेखे ठेवणे बंधनकारक नाही.
लेखे न ठेवल्यास :
ज्या व्यक्तीला लेखे ठेवणे बंधनकारक आहे त्या व्यक्तीने लेखे न ठेवल्यास प्राप्तिकर कायद्यात २५,००० रुपये इतक्या दंडाची तरतूद आहे.
लेखे कोणते ठेवावे :
यामध्ये कॅश बुक, जर्नल (जर व्यापारी पद्धतीने लेखे असतील तर), लेजर, अनुक्रमांक असलेल्या बिलाच्या किंवा रिसिट्सच्या कार्बन कॉपी (२५ रुपयांच्या पेक्षा जास्त रकमेच्या), खर्चाच्या मूळ पावत्या आणि बिले, आणि बिल किंवा पावत्या नसल्यास व्हाऊचर (५० रुपयांपेक्षा कमी असेल तर) यांचा समावेश आहे.
वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांसाठी औषधांची साठा—वही ठेवावी लागते. या शिवाय ‘फॉर्म ३ सी’ प्रमाणे माहिती ठेवणे गरजेचे आहे. वैद्यकीय व्यवसायामध्ये कोणत्याही प्रकारच्या औषध प्रणालीचा व्यवसाय करणारे म्हणजेच चिकित्सक, शल्यविशारद, दंतचिकित्सक, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलोजिस्ट, वैद्य, हकीम यांचा समावेश होतो. या फॉर्ममधील माहिती खालील प्रमाणे ठेवावी.
लेखे कोठे आणि किती वर्ष जपून ठेवावे :
हे लेखे मुख्य व्यवसायाच्या ठिकाणी ठेवणे गरजेचे असते. व्यवसाय जर एकापेक्षा जास्त ठिकाणाहून केला जात असेल तर अशा ठिकाणी सुद्धा लेखे ठेवता येतात. हे लेखे आणि माहिती आपल्याला सहा वर्षांंपर्यंत जपून ठेवावी लागते.
लेखा परीक्षण (ऑडिट) :
ज्या व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल आर्थिक वर्ष २०१६—१७ साठी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा धंदा करणाऱ्या करदात्याची उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना त्यांच्या लेख्यांचे परीक्षण हे सनदी लेखाकाराकडून (सीए) करून घेणे गरजेचे आहे. असे परीक्षण करून न घेतल्यास दीड लाख रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.
अनुमानावर आधारित कर :
कर रचनेत सुलभता यावी यासाठी अनुमानित कराच्या तरतुदी मागील काही वर्षांंपासून वाहतूकदार, धंदा करणारे यांनाच लागू होत्या. या सुलभतेचा फायदा व्यवसायिकांनाही व्हावा या साठी न्यायमूर्ती इश्व्र समितीच्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६—१७ पासून ठरावीक व्यावसायिकांसाठी (निवासी करदाते) अनुमानित कराच्या तरतुदी लागू करण्यात आल्या. १ एप्रिल २०१६ पासून ४४ एडीए हे कलम सुरू करण्यात आले. या कलमानुसार ज्या ठरावीक व्यावसायिकाची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशांचे उत्पन्न (नफा) उलाढालीच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दाखविल्यास हे उत्पन्न ‘धंदा—व्यवसायातील उत्पन्न’ म्हणून गणले जाईल. हे दाखविताना सर्व खर्च आणि घसारा विचारात घेतला असे समजण्यात येईल. जर करदात्याने एकूण प्राप्ती किंवा उलाढालीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी उत्पन्न (नफा) दाखविल्यास त्याला लेखे ठेवणे बंधनकारक आहे आणि शिवाय ‘कलम ४४ एबी’नुसार लेख्यांचे लेखापरीक्षण सुद्धा करून घ्यावे लागेल, जरी त्यांच्या व्यवसायाची एकूण प्राप्ती किंवा उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी असली तरी.
थोडक्यात ठरावीक व्यवसाय (डॉक्टर, इंजिनीयर, सी.ए., वकील, वास्तू—विशारद, चित्रपट सृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ, अंतर्गत सजावटकार वगैरें) करणाऱ्या करदात्यांची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती ५० लाख रुपयांपेक्षा कमी असेल आणि उत्पन्न (नफा) ५० टक्कय़ांपेक्षा जास्त असेल तर त्याला लेखे ठेवणे बंधनकारक नाही आणि लेखापरीक्षण सुद्धा बंधनकारक नाही. आणि उत्पन्न (नफा) ५० टक्कय़ांपेक्षा कमी दाखविले असेल तर त्याला लेखे ठेवणे बंधनकारक आहे आणि शिवाय लेखापरीक्षण सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळे ठरावीक व्यवसाय करणाऱ्यांनी जागरूक राहावे आणि एकूण उत्पन्न किंवा उलाढालीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी दाखविल्यास लेखापरीक्षण करून त्यानुसार विवरणपत्र दाखल करावे.
उदाहरणार्थ, एका वास्तू—विशारदाची आर्थिक वर्ष २०१६—१७ मध्ये एकूण प्राप्ती २२ लाख रुपये आहे आणि त्याने ९ लाख रुपये खर्च (पगार, प्रवास वगैरे) आणि ३ लाख रुपयांचा घसारा असे मिळून १२ लाख रुपयांचा एकूण खर्च दाखवून ‘धंदा—व्यवसायातील’ उत्पन्न १० लाख रुपये दाखविले (म्हणजेच उलाढालीच्या ५० टक्कय़ांपेक्षा कमी) तर त्याला लेखापरीक्षण करणे बंधनकारक असेल.
ज्या ठरावीक व्यवसाय करणाऱ्या करदात्याची उलाढाल किंवा एकूण प्राप्ती आर्थिक वर्ष २०१६—१७ सालासाठी ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांनी ५० टक्कय़ांइतके उत्पन्न (नफा) दाखवून प्राप्तिकर कायद्यातील अनेक तरतुदींपासून सुटका करून घेता येईल.
प्राप्तिकर विवरणपत्र :
व्यावसायिकांसाठी विवरण पत्र भरण्याची मुदत ही ३१ जुलैपर्यंत असते. परंतु ज्या व्यावसायिकांना लेखापरीक्षण बंधनकारक आहे त्यांच्यासाठी ही मुदत ३० सप्टेंबर असते.
उत्पन्न आणि खर्च :
प्राप्तिकर कायद्यानुसार व्यवसाय किंवा धंद्यातून झालेला नफा हा करपात्र उत्पन्न म्हणून गणला जातो. हा नफा कसा गणला जातो त्यासाठी कोणते उत्पन्न दाखवावे, खर्चाची किती व कशी वजावट घेता येते या बद्दलच्या तरतुदी प्राप्तिकर कायदा ‘कलम २८’ ते ‘कलम ४४ डीबी’मध्ये दर्शविण्यात आल्या आहेत. व्यावसायिकांसाठी लागू असणाऱ्या काही ठळक तरतुदी खालीलप्रमाणे :
* व्यवसायातून मिळालेले उत्पन्न: जसे वकिलाने अशिलाकडून घेतलेली फी किंवा वैद्याने रुग्णाकडून घेतलेली फी वगैरे. हे उत्पन्न कोणतेही खर्च वजा न जाता दाखवावे लागते.
* व्यावसायिकाला वस्तूरूपाने मिळालेल्या भेटी (व्यावसायिक क्षमतेमध्ये) या सुद्धा व्यवसायापासून मिळालेले उत्पन्न म्हणून गणल्या जातात.
* व्यावसायिकाला व्यवसायाच्या अनुषंगाने मिळणारे भाडे उत्पन्न हे सुद्धा उत्पन्न म्हणून गणले जाते.
* व्यवसाय करण्यासाठी जो खर्च होतो त्याची वजावट उत्पन्नातून मिळते. या खर्चामध्ये पगार, प्रवास भाडे, व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेचे भाडे, कागद छपाई, घसारा इत्यादींचा समावेश होतो.
कर आणि त्या संबंधी नियोजनाविषयक आपले काही प्रश्न असतील तर त्याचे समाधान करून घेण्यासाठी प्रश्न पाठवा : pravin3966@ rediffmail.com