करदात्यांमधील अनेक गैरसमजांपैकी एक असा की, ‘फॉर्म १६’ हा सर्व पगारदारांना मिळालाच पाहिजे आणि त्याशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरता येत नाही. फॉर्म १६ हा ज्यांचा उद्गम कर (टीडीएस) कापला जातो त्यांना देणे बंधनकारक आहे..
* प्रश्न: माझ्या वडिलांनी २००० सालात एक घर विकत घेतले होते. ते त्यांनी २०१६ मध्ये विकले. हे पैसे त्यांनी मला कर्जाऊ दिले. या पैशातून आणि शिवाय बँकेतून गृहकर्ज घेऊन मी माझ्या नावाने नवीन घर विकत घेतले. माझ्या वडिलांना भांडवली नफ्यावर सवलत मिळेल का?
– प्रवीण पाटील, ईमेलद्वारे
उत्तर : एक घर विकून त्यावर होणाऱ्या दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा दुसऱ्या घरात ठरावीक वेळेत गुंतविला तर ‘कलम ५४’प्रमाणे हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा करपात्र नसतो. आपल्या व्यवहारामध्ये नवीन घर हे तुम्ही विकत घेतल्यामुळे या कलमानुसार नवीन घरामध्ये झालेली गुंतवणूक, जी आपल्या नावाने झाली आहे, याचा फायदा वडिलांना घेता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या घराच्या विक्रीवर झालेल्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागेल.
* प्रश्न: माझी मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. कॉलेजने आमच्याकडून ‘डेव्हलपमेंट फी’ घेतली आहे. या डेव्हलपमेंट फीची उत्पन्नातून वजावट मिळू शकेल का?
– अनिल माने, ईमेलद्वारे
उत्तर : ‘कलम ८० सी’नुसार फक्त पूर्ण वेळ शिक्षणासाठी भरलेल्या शिक्षण शुल्काची वजावट मिळते. ‘डेव्हलपमेंट फी’ची वजावट या कलमाप्रमाणे मिळू शकत नाही.
* प्रश्न: माझे उत्पन्न २०१५-१६ या आर्थिक वर्षांत १० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मी नोव्हेंबर २०१५ मध्ये दहा लाख रुपये भविष्य निर्वाह निधीमधून कर्ज काढून बँकेत मुदत ठेवीमध्ये गुंतविले आहेत. त्यावर मला ९ टक्के या दराने पाच महिन्यांचे व्याज मिळाले आहे. मी काम करीत असलेल्या आस्थापनेतर्फे पूर्णपणे प्राप्तिकर कापला (टीडीएस) आहे. तरी उपरोक्त व्याजावर किती प्राप्तिकर भरावा लागेल?
– दिलीप शेजवळ, ईमेलद्वारे
उत्तर : आपले उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला या मुदत ठेवींच्या व्याजाच्या रकमेवर ३० टक्के इतका कर भरावा लागेल. जर बँकेने यावर १० टक्के उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर बाकीचा कर आपल्याला भरावा लागेल.
* प्रश्न: माझ्या नावाने शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपनीचे शेअर्स आहेत. काही कंपन्यांचे शेअर्स माझ्या पत्नीच्या नावाने हस्तांतरित करावयाचे आहेत. हे हस्तांतरण शेअर बाजारातील दलालामार्फत केले जाणार नाही. या व्यवहारावर मला किंवा पत्नीला कर भरावा लागेल का? हे शेअर्स माझ्या पत्नीने नंतर विकले तर किती कर भरावा लागेल?
– प्रशांत काळे, नाशिक
उत्तर : नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी या करमुक्त असल्यामुळे या शेअरच्या भेटीवर पत्नीला कर भरावा लागणार नाही. परंतु पत्नीने हे शेअर्स विकले तर त्यावर कर भरावा लागेल. हा कर किती आणि कोणी भरावयाचा यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत :
(१) यावरील कर हा भांडवली नफा अल्प मुदतीचा आहे की दीर्घ मुदतीचा आहे यावर अवलंबून आहे. ही मुदत ठरवताना पत्नीला ज्या दिवशी शेअर्स भेट मिळाले ही तारीख महत्त्वाची नसून आपण हे शेअर्स कधी विकत घेतले ही आहे. आपण विकत घेतलेल्या तारखेपासून हे शेअर्स पत्नीने एक वर्षांच्या आत विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा अल्प मुदतीचा असेल आणि एक वर्षांनंतर विकले तर त्यावर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. उदा. आपण २०१३ मध्ये घेतलेले शेअर्स पत्नीला मार्च २०१६ मध्ये भेट दिले आणि ते तिने एप्रिल २०१६ मध्ये शेअर बाजारामार्फत विकले तर शेअर्सचा धारण कालावधी हा २०१३ पासून गणावा लागतो जरी हे शेअर्स एप्रिल २०१६ मध्ये पत्नीच्या नावाने असले तरी. यामुळे या शेअर्सवर होणारा नफा हा दीर्घ मुदतीचा असेल आणि त्यावर कर भरावा लागणार नाही.
(२) दुसरी गोष्ट अशी आहे की, हे शेअर्स आपण कोणत्याही मोबदल्याशिवाय हस्तांतरित केले आहेत. त्यामुळे या शेअर्सवर मिळणारे उत्पन्न आपल्यालाच करपात्र आहे. पत्नीला यावर कर भरावा लागणार नाही. उदा. आपण भेट दिलेल्या शेअर्सवर पत्नीला अल्प मुदतीचा भांडवली नफा झाला तर हा नफा आपल्या उत्पन्नात गणला जाईल आणि त्यावर आपल्याला कर भरावा लागेल.
* प्रश्न: मी २००५ मध्ये ४,६०,००० रुपयांना एक घर विकत घेतले होते ते मी मार्च २०१२ मध्ये १५,००,००० रुपयांना विकले. त्याच वर्षी मी ३५,००,००० रुपयांना दुसरे घर विकत घेतले. परंतु आर्थिक वर्ष २०११-१२ वर्षीचे विवरणपत्र भरताना मी हा व्यवहार दाखविला नाही. आता आर्थिक वर्ष २०११-१२ सालचे सुधारित विवरणपत्र दाखल करू शकतो का?
– जालिन्दर सांगळे, ईमेलद्वारे
उत्तर : सुधारित विवरणपत्र हे (एक) कर निर्धारण वर्ष संपल्यानंतर एक वर्षांच्या आत किंवा (२) करनिर्धारण वर्ष पूर्ण होण्यापूर्वी (या दोन्हींपैकी जे आधी होईल ते) दाखल करता येते. आर्थिक वर्ष २०११-१२ म्हणजेच करनिर्धारण वर्ष २०१२-१३ सालचे सुधारित विवरणपत्र भरण्याची मुदत ३१ मार्च २०१४ रोजी संपते. त्यामुळे आपण या वर्षीचे सुधारित विवरणपत्र आता दाखल करू शकत नाही.
* प्रश्न: मी एका खासगी कंपनीत काम करते. माझ्या वेतनातून गृहकर्जाच्या वजावटी ‘कलम ८० सी’ प्रमाणे वजावटी केल्यानंतर माझ्या वार्षिक उत्पन्नावर कर लागू होत नाही. त्यामुळे मला माझ्या कंपनीकडून ‘फॉर्म १६’ मिळाला नाही. कंपनीकडे विचारणा केली असता असे कळले की मला कर लागू होत नसल्यामुळे ‘फॉर्म १६’ मिळणार नाही. या फॉर्मशिवाय मी माझे विवरणपत्र कसे भरावे?
– सरस्वती बोरगावकर, ईमेलद्वारे
उत्तर : जर वेतनातून उद्गम कर कापला नसेल तर हा फॉर्म देणे कंपनीला बंधनकारक नाही. आपण कंपनीकडे पगाराचे प्रमाणपत्र मागावे आणि त्याआधारे विवरणपत्र दाखल करावे. प्राप्तिकर कायदा ‘कलम २०३’नुसार जर मालकाने वेतनावर उद्गम कर (टीडीएस) कापला असेल तर ‘फॉर्म १६’ देणे बंधनकारक आहे. हा फॉर्म वेळेवर न दिल्यास मालकाला दंड भरावा लागतो. उद्गम कर कापला असून जर ‘फॉर्म १६’ कंपनीने दिला नसल्यास संबंधित प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे तक्रार करावी. ‘फॉर्म १६’ मिळाला नसला तरी आपल्या माहितीच्या आधारे विवरणपत्र वेळेवर दाखल करावे. जर कंपनीने उद्गम कर भरला नसेल तर त्या कराचा लाभ आपल्याला मिळणार नाही.
* प्रश्न: मी एका कंपनीत नोकरी करतो, माझे वार्षिक उपन्न ८ लाख रुपये इतके आहे. माझ्या नावाने ५ एकर शेतजमीन आहे आणि माझ्या पत्नीची २.५ एकर शेतजमीन आहे. शेतीत फार नफा मिळत नाही. हे शेतीतून मिळालेले उत्पन्न विवरण पत्रात दाखवावे लागते का? माझ्या पत्नीचे इतर उत्पन्न नाही. तिला विवरण पत्र भरणे गरजेचे आहे का?
– देवानंद, चंद्रपूर
उत्तर : जर शेतीतून मिळणारे उत्पन्न ५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि या शेतीच्या उत्पन्नाच्या व्यतिरिक्त उत्पन्न २,५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर शेतीचे उत्पन्न विवरण पत्रात दाखवावे लागते. शेतीतून मिळणारे उत्पन्न हे करमुक्त आहे. परंतु आपल्याला दुसरे करपात्र उत्पन्न असल्यामुळे खालील दोन रकमेच्या फरकाएवढा कर भरावा लागतो (अ) शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि बिगर शेती उत्पन्न विचारात घेऊन देय कर, आणि (ब) किमान करपात्र उत्पन्न (सध्या २,५०,००० रुपये) अधिक शेतीतून मिळणारे उत्पन्न यावर येणारा कर.
आपले शेतीचे उत्पन्न ५,००० रुपयांच्या पेक्षा कमी असेल तर ‘फॉर्म १’ हे विवरण पत्र दाखल करता येईल. यामध्ये हे शेतीचे करपात्र उत्पन्न दाखवावे लागेल. परंतु या शेतीच्या उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही. आपले शेतीचे उत्पन्न ५,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर ‘फॉर्म २’ हे विवरणपत्र भरावे लागेल आणि वर सांगितल्याप्रमाणे कर भरावा लागेल. आपल्या पत्नीला शेतीच्या व्यतिरिक्त इतर उत्पन्न नसल्यामुळे त्यांना कर भरावा लागणार नाही आणि विवरणपत्रदेखील दाखल करणे बंधनकारक नाही.
* प्रश्न: मी एक घर पुणे येथे विकत घेत आहे. या घराचा मालक अनिवासी भारतीय आहे. या मालकाने घराचे पैसे देताना मला उद्गम कर (टीडीएस) न कापण्याची विनंती केली आहे, कारण तो दुसरे घर विकत घेणार आहे. या विक्रीवर त्याला कर भरावा लागणार नाही, ही विनंती स्वीकारून मला उद्गम कर न कापता पैसे देता येतील का?
– अनीता परब, मुंबई
उत्तर : अनिवासी भारतीयांना पैसे देताना कलम १९५ नुसार उद्गम कर (टीडीएस) कापणे हे सर्वानाच बंधनकारक आहे. जर अनिवासी भारतीयांना घर विक्रीवर कर भरावा लागणार नसेल तर (दुसऱ्या घरामध्ये गुंतवणूक किंवा रोख्यांमध्ये गुंतवणूक करून कर वाचविला असेल तर, वगैरे) उद्गम कर न कापण्याची सूचना संबंधित प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून कलम १९७ नुसार मिळवावी लागते. अशी सूचना प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून प्राप्त झाली असेल तरच आपण उद्गम कर न कापता पैसे देऊ शकता.
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.

* प्रश्न: मी ज्येष्ठ नागरिक आहे. माझ्या हौसिंग सोसायटीच्या इमारतीची, ज्यात माझे घर आहे, त्याची पुनर्बाधणी होत आहे. बिल्डर सोसायटीच्या सर्व सभासदांना नवीन इमारत पूर्ण होईपर्यंत घरभाडे देणार आहे. याशिवाय भाडय़ाच्या घरासाठी दलालीसुद्धा देणार आहे. हे घर भाडे आणि दलाली करपात्र आहे का? जर मी माझ्या दुसऱ्या घरात (माझ्या आणि पत्नीच्या नावे असलेल्या) राहावयास गेलो किंवा भाडय़ाच्या घरात राहावयास गेलो तर माझ्या कर-दायित्वावर काही परिणाम होईल का?
– अनिल साळी, ईमेलद्वारे
उत्तर : इमारत पुनर्बाधणी करताना बिल्डरने दिलेले भाडे हे करपात्र आहे. हे ‘इतर उत्पन्न’ म्हणून समजले जाते. परंतु जर या काळात राहण्यासाठी दुसरे घर भाडय़ाने घेतले असेल तर ते उत्पन्न बिल्डरकडून मिळणाऱ्या भाडय़ाच्या उत्पन्नातून वजा होते आणि बाकी रक्कम करपात्र म्हणून समजली जाते. जर आपण आपल्या स्वत:च्या दुसऱ्या घरात राहावयास गेलात तर बिल्डरकडून मिळणारे संपूर्ण उत्पन्न करपात्र असेल. उदाहरणाने हे समजून घेऊ.
                                                              उदाहरण १                  उदाहरण २            उदाहरण ३
बिल्डरकडून मिळालेले भाडे                       २०,०००                      २०,०००                २०,०००
घेतलेल्या घरावर भरलेले भाडे                         ०                           १५,०००                २२,०००
करपात्र उत्पन्न                                           २०,०००                     ५,०००                      ०
तसेच बिल्डरने भाडय़ाचे घर घेण्यासाठी दलाली दिलेली असेल तर त्याची करपात्रतासुद्धा वरीलप्रमाणेच ठरवता येते. म्हणजेच आपण घर भाडय़ाने घेण्यासाठी जर दलाली दिली असेल तर ती बिल्डरकडून मिळालेल्या दलालीच्या रकमेतून वजा होईल आणि बाकी रकमेवर कर भरावा लागेल.