बाजारात तेजीवाले आणि मंदीवाले यांची सारख्याच बळाबळाने जोरदार रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातून दोन्ही बाजूच्या आधारपातळ्यांमध्ये निफ्टी निर्देशांकाचे हेलकावे गेले काही आठवडे सुरू आहेत. तथापि सरलेल्या आठवडय़ात तेजीवाल्यांनी या स्थितीवर मिळविलेल्या पुरत्या नियंत्रणाने साऱ्यांनाच आश्चर्यचकित केले आहे. निफ्टी निर्देशांक त्यामुळे आता ५९०० च्या वेशीवर येऊन ठेपला आहे.
गेल्या आठवडय़ातील या उत्साही उसळीला बळ देणारे अनेक घटक व पैलू आहेत. एक तर मूडीज् या पतमानांकन संस्थेने भारताला ‘स्थिर’ मानांकन बहाल केले. ज्याचा मंगळवारी बाजार खुला होताच सकारात्मक परिणाम दिसला. पुढे गोल्डमन सॅक्स या जागतिक वित्तसंस्थेने भारतीय समभागांबाबत भरवसा दाखविणारा अहवाल दिला. इतकेच काय चलनफुगवटय़ाची स्थिती ताळ्यावर येऊन अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्याचा कयास बांधताना निफ्टी निर्देशांक २०१३ अखेपर्यंत ६,६०० वर जाईल असा आशावाद तिने व्यक्त केला आहे. दिवाळखोरीत गेलेल्या ग्रीसला तारणाऱ्या बेल-आऊटची बातमी त्याच दरम्यान येऊन धडकली. देशांतर्गत संसदेत सुरू असलेला गदारोळ शमून, किराणा व्यापारात विदेशी गुंतवणुकीच्या मुद्दय़ावर संसदेत मतदानाला सामोरे जाण्याचीही यूपीए सरकारने तयारी दर्शविली. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून सलग चार दिवसांत निफ्टीने २०० हून अधिक अंशांची कमाई केली, तर ‘सेन्सेक्स’ या अन्य निर्देशांकाने १९,००० या महत्त्वाच्या पातळीपुढे मजल मारली.
सकारात्मक घडामोडी आणि त्यावरील उत्साही पडसाद यातून निफ्टी निर्देशांकाने तांत्रिक आलेखावरही कलाटणीचे वळण घेतले आहे.  ऐतिहासिकदृष्टय़ा ‘फिबोनाची रिट्रेसमेंट’ची ७६.६ टक्के पातळी ही नेहमीच मोठा उलटफेर दर्शवीत असते. जर आपण नोव्हेंबर २०१० मधील ६,३३८पासून डिसेंबर २०११ मधील ४,५३१ पर्यंतच्या निसरडा प्रवाहाला (रिट्रेसमेंट) पाहिल्यास, त्याची ७६.४ टक्के पातळी ही ५९२० ठरते. शुक्रवारचे डेरिव्हेटिव्हज्चे व्यवहार पाहिले तर ६,००० या स्ट्राइक  प्राइसवर सर्वाधिक निफ्टी कॉलचे व्यवहार एकवटलेले दिसून आले. निफ्टीचे पुट/कॉल गुणोत्तरही १.३४ या पातळीवर आहेत याचा अर्थ निर्देशांकाला आणखी चढीला बराच वाव आहे. यापूर्वी एप्रिल २०११ मध्ये निफ्टीने ५,९४४ हा जवळपास सारखाच कळस दाखविला आहे. त्यामुळे ५,९२० ते ६,००० हा निफ्टी निर्देशांकाचा प्रवास बाजारासाठी अग्निपरीक्षेचा असेल असा निष्कर्ष काढता येईल. जर निर्देशांक ही ‘लक्ष्मण रेषा’ पार करण्यात यशस्वी ठरला तर, तेजीला उधाण येऊन निफ्टीकडून नवीन उच्चांक दाखविला जाणे अटळ दिसते. अन्यथा निफ्टी निर्देशांकाला पुन्हा एकदा दुरुस्तीचे वळण मिळून त्याची ५,५०० या लक्ष्याप्रती घसरण दिसेल. व्यक्तिगत मत विचाराल तर, जेव्हा सर्व बाजूने तेजीच्या वार्ताना ऊत येतो तेव्हाच नेमका तो चकवा असल्याचे बाजाराकडून दर्शविले जाते. सद्यस्थिती चकव्याचीच असू शकेल.     

सप्ताहासाठी शिफारस
*    भेल : (सद्य दर २३४.३५ रु.)     
    खरेदी: रु. २३६ वर; लक्ष्य: रु.२४४-२५१
*  देना बँक :  (सद्य दर १११.१० रु.)     
    खरेदी: रु. ११२ वर; लक्ष्य: रु. ११६
*    एबीबी : (सद्य दर ७१३.४० रु.)
    खरेदी: रु. ७१७ वर;  लक्ष्य: रु. ७३७

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या आठवडय़ातील खरेदी शिफारशीप्रमाणे भेल आणि एचसीएल टेकने दिलेले इष्टांक गाठून अनुक्रमे २३६ आणि ६६०.९० असे उच्चांक दाखविले, त्या उलट विक्रीसाठी दिलेल्या भावापर्यंत रिलायन्स इन्फ्राने घसरण न दाखविल्याने त्यात व्यवहार होऊ शकला नाही.