अर्थसाक्षरतेचे मानसशास्त्र  भाग

आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन हे सारे पाल्य बहुतांशी पालकांकडून बघूनच शिकतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव मिळेल अशी संधी आणि वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वास हा अनुभवातूनच येत असतो.

मागील भागात आपण बालपणी आर्थिक व्यक्तिमत्वावर झालेले परिणाम आणि ते बदलण्यासाठी करावयाचे उपाय याविषयी पहिले होते. या भागात आपण याचा उत्तरार्ध पालक म्हणून पाल्याच्या बालपणी आर्थिक व्यक्तिमत्वासंबंधी घ्यावयाच्या काळज्या पाहणार आहोत.

पालक आपल्या पाल्याला नेहमी चांगले शिक्षण मिळावे म्हणून प्रयत्न करत असतात. त्याच्या सामान्य व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न करत असतात. पण त्याच्या आर्थिक सवयी,आर्थिक वर्तन आणि आर्थिक व्यक्तिमत्वाविषयी बहुतांश तेवढे लक्ष दिले जात नाही. वास्तविक पाहता आर्थिक बाबी तेवढय़ाच महत्वाच्या असतात. त्याच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या असतात. कारण आर्थिक बाबी आणि मुलभूत गरजा या संलग्न गोष्टी आहेत. काही पालक आपल्या पाल्याला आर्थिक बाबी शिकवत नाहीत त्याची वेगवेगळी कारणे असतात.

प्रत्येक पालक  आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतांची पर्वा न करता त्याला शिक्षण देतातच. तसेच स्वत:च्या आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता पालकाने पाल्याला लहानपणीपासूनच आर्थिक  बाबींचे त्याच्या वयानुरूप शिक्षण दिले पाहिजे. पाल्य हे अनुकरणप्रिय असतात. घरातला लहानगे नेहमी इतरांचे अनुकरण करीत असतात. त्यामुळे ज्या आर्थिक सवयी मूल्य त्यांना शिकवायची असतात त्या सवयी जर पालकांना स्वत:लाच नसतील तर त्यांची पाल्याकडून अपेक्षा कशी करता येईल? कारण आर्थिक विचार, आर्थिक मूल्य, आर्थिक वर्तन आणि आर्थिक दृष्टिकोन पाल्य बहुतांशी पालकांकडून, त्यांच्याकडे  बघून शिकतात. कोणत्याही गोष्टींचा आत्मविश्वस हा अनुभवातूनच येत असतो. त्यामुळे आर्थिक बाबतीत पाल्याला पालकांनी संधी आणि वातावरण उपलब्ध करून दिले पाहिजे. ज्यामधून त्यांना आर्थिक बाबींसंबंधी तत्वं, मूल्यं आणि सवयी शिकविता येतील. एक अनुभव हा शंभर उपदेशांपेक्षा श्रेष्ठ असतो. काही अनुभव स्वत: घ्यायचे असतात तर काही गोष्टी दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकायच्या असतात. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पाल्याला अनुभव मिळेल असे वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकाचे काम आहे.

पदवीपर्यंत  शिक्षण घेण्यासाठी साधारण १५ ते १७  वर्षे जातात. पण पैशाचे शिक्षण त्याला तोवर दिले जात नाही. ते मात्र त्याला त्यानंतर दिले जाते. त्यातही गम्मत अशी की पाल्य ज्या विषयात पदवी घेईल त्याच क्षेत्रात जाईल याची शाश्वती देता येत नाही. परंतु आर्थिक ज्ञान हे अविभाज्य ज्ञान आहे जे सर्वाकडे असणे गरजेचे आहे.

पुढील काही उपाय जे पालकांनी पाल्याच्या आर्थिक व्यक्तिमत्व विकासासाठी करावेत-

मुलांना पैशांविषयी शिक्षण व त्याविषयी संकल्पना समजावणे जसे १) कमावणे (earning) २) खर्च करणे (spending), ३) बचत करणे (saving) ४) उसने देणे घेणे (borrowing) आणि ५) वाटणे  (sharing) या गोष्टी शिकविता येऊ शकतात.

जेव्हा मुलं/मुली शब्दोच्चार, वाक्य बोलायला शिकतात तेव्हा त्यांना पहिल्या तीन बाबी शिकविता येऊ शकतात. किंबहुना सर्वच पालकांनी समजावून द्यायला हव्यात. पण पैसे उसने देणे/घेणे (borrowing) आणि वाटणे (sharing) यासाठी मुल थोडं मोठं होण गरजेचे असते. कारण त्यासाठी आकडेमोड, गणित यायला हवे आणि आर्थिक बाबी दुसऱ्यांच्या दृष्टीकोनातून पाहता यायला पाहिजेत त्यासाठी साधारण १२ वर्षे वय अपेक्षित आहे. इथे सर्वसाधारण आर्थिक संकल्पना मांडल्या आहेत जसे,

१) कमावणे (earning) म्हणजे पाल्यांना मिळणारा पैसा, जसे पालकांनी खर्चासाठी पॉकेट मनी म्हणून दिलेले पैसे, पाल्याने खर्चासाठी मागितलेले पैसे, काही समारंभासाठी मिळालेली भेट ( सण, यात्रा, जत्रा किंवा वाढदिवस) किंवा कमावलेले पैसे (बक्षीस).

२) खर्च करणे (spending) म्हणजे पाल्य पैशांचा वापर कशा प्रकारे करतात. जसे चॉकलेट, खेळणी, वही, पेन इत्यादी खरेदी करणे.

३) बचत करणे (saving) म्हणजे भविष्यातील वापरासाठी पैसे बाजूला काढून ठेवणे जसे पिग्गी बँक / पैसे साठवण्याचा डब्बा.

४) उसणे देणे/घेणे (borrowing) कोणाकडून पैसे घेणे की जे नंतर परत करावे लागतील जसे मित्राकडून पैसे उसणे घेणे किंवा त्याला उसणे देणे.

५) वाटणे (sharing) म्हणजे सामाजिक कार्यासाठी वगैरे देणगी देणे.

या संकल्पनांची ओळख करून देणे, त्यांना संधी देणे आणि कौटुंबिक आर्थिक चर्चा करताना पाल्यांना सहभागी करून घेणे. त्यामध्ये त्यांना मत मांडण्याला संधी देणं. कारण याच गोष्टींमधून त्यांच्या आर्थिक वर्तनाची रंगीत तालीम होत असते. त्याचबरोबर पाल्यांचे पैशांसंबंधी विचार, मूल्य आणि वर्तन कळण्यास मदत होते .

पुढील भागात आर्थिक बाबी व  मुलांच्या विकासाच्या अवस्था आणि त्याची वैशिष्टय़े आणि पालकांसाठी काही उपक्रम पाहू. आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवा.

मुलांना आर्थिक बाबी शिकविण्याची पुढे केली जाणारी वेगवेगळी फोल कारणे..

* काहीना वाटते लहानांसाठी तो विषय नाही.

* काहीना वाटते लहानपण हे खेळण्या-बागडण्याचे वय असते, त्यांना एवढय़ा लवकर आर्थिक ज्ञानाची गरजा नसते.

* काहीना वेळच नसतो.

* काहींना वाटते आपल्याकडे पुरेसे पैसे नाहीत त्यामुळे ते दुर्लक्ष करतात.

* काहीना वाटते लहान मुलं निष्पाप असतात ते आपल्या महत्वाच्या आर्थिक बाबी दुसऱ्यांना सांगतील.

* लहान वयात आर्थिक ज्ञानाची गरजच काय, तो मोठय़ांचा विषय आहे अशी मानसिकता.

kiranslalsangi@gmail.com

लेखक पुणेस्थित समुपदेशक आहेत.