वसंत कुलकर्णी

परताव्याच्या कोष्टकात यूटीआय इक्विटी फंड अग्रस्थानी जरी नसला तरी मागील एका वर्षांत कामगिरीत सर्वोत्तम सुधारणेचा लाभार्थी असणारा हा फंड आहे. मल्टीकॅप फंड गटात १२ डिसेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार त्याचा वार्षिक परतावा १२.२८ टक्के आहे. डिसेंबर २०१८ मध्ये मल्टीकॅप फंड गटाच्या कोष्टकात तळच्या एक चर्तुथांश (क्वार्टाइल) हिश्श्यात गणना झालेल्या या फंडाने वर्षभरात वरच्या एक चर्तुथांश फंडात झेप घेतली आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये ७,९२० कोटी रुपये असलेली मालमत्त्ता वर्षभरानंतर १० हजार कोटींच्या उंबरठय़ावर (नोव्हेंबर २०१९ अखेर मालमत्ता ९,९१२ कोटी रुपये) आहे.

मल्टीकॅप फंड गटात ज्या मोजक्या फंडाच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ झाली, त्यामध्ये यूटीआय इक्विटी फंडाचा समावेश आहे. फंडाच्या गुंतवणुकीत रिलायन्स इंडस्ट्रीज नसून देखील या फंडाने गुंतवणूकदारांच्या पदरात घसघशीत परतावा टाकला हे या फंडाचे वेगळेपण. सक्रिय निधी व्यवस्थापन असल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला वगळून बाजारातील प्रवाहांविरूद्ध प्रवास करीत या फंडाने चमकदार कामगिरी करून दाखविली असल्याने या फंडाची दखल घेतली आहे. ‘निफ्टी ५०० टीआरआय’ हा फंडाचा मानदंड असून फंडाच्या गुंतवणुकीत मानदंडाच्या तुलनेत निधी व्यवस्थापकांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, यांच्यात कमी गुंतवणूक केली आहे तर, बजाज फायनान्स, इन्फोएज, एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक, अ‍ॅस्ट्रल पॉलिटेक्निक आणि श्री सीमेंट यांना प्राधान्य देत निर्देशांकातील त्यांच्या प्रमाणापेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

फंड घराण्याने जानेवारी २०१६ पासून अजय त्यागी यांची यूटीआय ब्लूचिप फ्लेक्झीकॅपचे निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. ‘सेबी’प्रणीत प्रमाणीकरणानंतर हा फंड अन्य फंडामध्ये विलीन करत या फंडाचा समावेश मल्टीकॅप गटात केला गेली. पुढील महिन्यांत अजय त्यागी यांच्या नेमणुकीला तीन वर्षे पूर्ण होत आहेत. यूटीआय इक्विटी फंडाचा मल्टीकॅप गटात समावेश झाल्यानंतर फंडाच्या गुंतवणुकीत लार्ज-कॅप समभागांचे प्राबल्य दिसून आले आहे. सध्या फंडाच्या गुंतवणुकीत ६७.०७ टक्के लार्ज कॅप, २८.६४ टक्के मिडकॅप, तर १.८६ टक्के स्मॉलकॅप आहेत. फ्रँकलिन इंडिया इक्विटी, कोटक स्टँडर्ड मल्टीकॅप किंवा डीएसपी इक्विटी, मोतीलाल ओसवाल मल्टीकॅप आणि एचडीएफसी इक्विटी यांच्यापेक्षा अधिक साहसी गुंतवणूक असलेला फंड आहे.

निधी व्यवस्थापक बदलानंतर या फंडाने गुंतवणुकीच्या रणनितीत बदल केल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. फंडाने पूर्णपणे ऊर्जा, आणि अंशत: व्यापार चक्राशी निगडीत समभागांशी फारकत घेतले आहेत. या गटातील अन्य फंड मानदंडापेक्षा खराब कामगिरी करीत असताना हा फंड मागील सहा तिमाहीत मानदंडापेक्षा सरस कामगिरी असल्याने क्रिसिलने या फंडाचा समावेश वरच्या एक चार्तुथांश फंडात केला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत आजही बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक असली तरी यूटीआय इक्विटीने एचडीएफसी बँक, कोटक मिहद्र, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि बजाज फायनान्सची समभाग गुंतवणुकीसाठी निवड केली आहे. व्यापार चक्राच्या संबंधित समभागांचा समावेश विशिष्ट दृष्टिकोनातून केल्याने अ‍ॅस्ट्रल पॉलिटेक्निक, ग्राइंडवेल नॉर्टन आणि शेफ्लर इंडिया सारख्या औद्योगिक व उत्पादनाच्या समभागांची मात्रा राखून ठेवली. यापैकी अनेक समभागांनी गत वर्षीपेक्षा चांगली कमाई केल्याने फंडाच्या कामगिरीत आपला वाटा चोख उचलला आहे. अर्थव्यवस्था अद्याप सुधारणेच्या पहिल्या टप्प्यावरच (संचयाच्या टप्प्यावर) असल्याने, या समभागांची कामगिरी पूर्ण ताकदीने झालेली नाही. मागील तीन वर्षांत मासिक कामगिरी ७८ टक्के निर्देशांकाच्या चलत सरासरी परताव्यापेक्षा अधिक चांगली झाली आहे. फंड गटातील वर उल्लेख केलेल्या अन्य दिग्गज फंडांना यूटीआय इक्विटी फंडाने लीलया मागे टाकले आहे. बाजाराने उत्सर्जनाच्या दृश्यमानतेवर समभागांचे मूल्यांकनास अधिक महत्त्व देण्यास सुरुवात केली, नेमके त्याच वेळी यूटीआय इक्विटी फंडाच्या रणनीतीतही बदल झाला आहे. गुणवत्ता आणि मूल्यांकनाच्या व्यूहरचनापेक्षा फंडाची कामगिरी टिकवून ठेवण्यात निधी व्यवस्थापक अजय त्यागी यशस्वी झाल्याचे दिसते. निवडणुकांनंतरच्या वर्षांच्या तेजीत या फंडाने बाजी मारल्याचे दिसून आले आहे. मध्यम जोखीम स्वीकारणाऱ्या गुंतवणूकदारांना तीन ते पाच वर्षांसाठी या फंडाची निवड आपल्या त्यांच्या जोखीमांकाला साजेशी असल्यास करता येईल. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या निवडीत मालमत्ता किती महत्वाची हा मुद्दा विश्लेषकांमध्ये कायम वादाचा विषय ठरला आहे. फंड निवडताना मालमत्तेचा विचार करण्यापेक्षा व्यापार चक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यात फंडाची सातत्यपूर्ण कामगिरी आणि वेगवेगळ्या मालमत्तांमध्ये निधी व्यवस्थापकाची चांगला परतावा देण्याची क्षमता यावर विसंबून फंडाची निवड करणे अधिक चांगले. फंडाचा आकार, फंडाची लोकप्रियता नक्कीच प्रतिबिंबित करते.

अजय त्यागी यांची निधी व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली तेव्हा फंडाची मालमत्ता जानेवारी २०१६ मध्ये ४,६४६ कोटी रुपये होती. यूटीआय म्युच्युअल फंडाचा दहा हजार कोटींचा टप्पा गाठणारा हा पहिला फंड ठरला. ही गोष्ट गुंतवणूकदार आणि फंड वितरकांचा निधी व्यवस्थापकांवरील विश्वास दर्शविते. नव्या वर्षांत फंड जरी दहा हजारी टप्पा गाठणारा पहिला फंड ठरला तरी या फंडाची शिफारस मागील तीन वर्षांत ‘अर्थ वृत्तान्त’मध्ये तीन वेळा करण्यात आलीहेही लक्षात घ्यावयास हवे. फंड विश्लेषण आणि संशोधन पद्धतीवर विश्वासाचा मोहोर उमटविणारी ही बाब निश्चितच समाधान देणारी आहे.

shreeyachebaba@gmail.com