scorecardresearch

जाहल्या काही चुका.. : घरोघरी तिरंगा, घरोघरी ‘एसआयपी’

राजकीय सुधारणा आधी की, सामाजिक सुधारणा आधी हा वाद एकोणिसाव्या शतकात गाजला होता.

जाहल्या काही चुका.. : घरोघरी तिरंगा, घरोघरी ‘एसआयपी’

वसंत कुळकर्णी
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करीत आहोत. आता स्वराज्य आले आहे, मात्र आपले आर्थिक स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर आर्थसाक्षर होणे गरजेचे आहे. आर्थिक कुप्रथांच्या उच्चाटनाने ते साधले जाईल.

राजकीय सुधारणा आधी की, सामाजिक सुधारणा आधी हा वाद एकोणिसाव्या शतकात गाजला होता. आजही या वादाकडे पाहणे आवश्यक आहे. ब्रिटिश सत्तेमुळे देशाचे वाटोळे झाले आहे, त्यांना आधी बाहेर काढले पाहिजे, असे टिळक अनुयायांचे म्हणणे होते. तर आपल्याच समाजातील जातीभेद आणि कुप्रथांमुळे देशाला ही स्थिती प्राप्त झाली आहे. ब्रिटिशांच्या मदतीने त्या कुप्रथांचे उच्चाटन करून एकसंध समाज निर्माण करणे आवश्यक आहे, असे गोपाळराव आगरकर यांच्या अनुयायांचे म्हणणे होते. आजच्या दिवशी राजकीय सुधारणा आधी की आर्थिक सुधारणा आधी याचा विचार होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक कुप्रथा होत्या तशा आज आर्थिक कुप्रथांचे उच्चाटन होणे आवश्यक आहे.

भारतातील व्यापारी आणि व्यावसायिकांचा एक मोठा वर्ग करपात्र उत्पन्न पाच साडेपाच लाखांदरम्यान असल्याचे दाखवतो. कर चोरी करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून उत्पन्न कमी दाखवणे किंवा खर्च वाढवणे यांसारख्या युक्त्या करून करदायित्व कमी करण्याचा हा मार्ग आहे. कराचा बोजा कमी करण्याचा हा बेकायदेशीर प्रयत्न आहे. कमी नफा दाखवून कर चोरीही केली जाते. यात संबंधित कागदपत्रे लपवणे, व्यवहारांचे लेखे न ठेवणे, उत्पन्न लपवणे, नसलेल्या कर परताव्याचा (इनपुट टॅक्स क्रेडिटचा) वापर करणे किंवा वैयक्तिक खर्च व्यावसायिक खर्च म्हणून सादर करणे, यासारख्या अनुचित पद्धतींचा समावेश आहे. उत्पादनाच्या अनिश्चिततेमुळे कृषी-उत्पन्न कर मुक्त आहे. परंतु बहुतेक श्रीमंत जमीन मालक कृषी उत्पादन विकून लाखो कमावतात, पण कर देत नाहीत. व्यापारीदेखील हे करतात, ते सर्व शेतजमिनीचा एक छोटा तुकडा घेतात, ते त्यांच्या जमिनीवर लहान पिके घेतात किंवा काहीही करत नाहीत. परंतु कर भरताना त्यांची कमाई कृषी उत्पन्न म्हणून घोषित करण्यात येते.

भारत हा एकमेव देश असू शकतो जिथे प्रत्येक वस्तूवर कर आकारला जातो. जीवनावश्यक अन्नधान्यापासून ते विलासी जीवनशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या उपकरणापर्यंत प्रत्येक वस्तूंवर कर-आकारणी होते. ज्यांचे उत्पन्न प्राप्तिकराच्या कक्षेत येत नाही तेसुद्धा वर्षभरात किमान ५० हजारांचा कर सरकारला देतात. एक लिटर इंधनावर ६० रुपयांपेक्षा जास्त कर सरकार वसूल करते. कराच्या अतिरेकामुळे सामान्य माणसाचा कल करचोरीकडे आहे. करचोरीपेक्षा योग्य कर नियोजन करायला हवे. हेसुद्धा अर्थ निरक्षरतेचे लक्षण आहे.

जगाच्या लोकसंख्येचा २१ टक्के हिस्सा असलेला भारत अर्थसाक्षरतेच्या क्रमवारीत ७१ व्या क्रमांकावर आहे म्हणजेच वर्तमान शिक्षण पद्धतीत अर्थसाक्षरता विषयाचा समावेश करणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात मूलभूत अर्थसाक्षरता अभ्यासक्रमाचा समावेश मागील वर्षी झाला. समष्टी अर्थशास्त्रीय बदलाच्या संबंधांचा अभ्यास करण्यासाठी सरकारकडे तज्ज्ञ विश्लेषक सतात. आजही भारतात चढे व्याजदर चांगले असा मानणारा एक वर्ग आहे. त्यांच्या मते, व्याजदर कमी करून सामान्यांच्या बचतीवर मिळणाऱ्या सरकार उत्पन्नात कपात करीत आहे. हे अन्यायकारक आहे असे या बचतकर्त्यांचे मानणे आहे. परंतु चढय़ा व्याजदरामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय उत्पादने स्पर्धेत मागे पडतात. याकडे हा वर्ग सोयीस्कर दुर्लक्ष करतो. व्याजदर हे जागतिक बदलांशी निगडित असतात. भारतीय चलनाचे मूल्य हे मागणी पुरवठय़ासोबत स्थानिक महागाई आणि अर्थव्यवस्थेतील व्याजदरावर ठरत असते हे समजावून घ्यायला अर्थसाक्षर होणे आवश्यक आहे, अशी अर्थनिरक्षर कुटुंब व्याजदर कपातीला संकट आणि चढय़ा व्याजदरांना संधी समजत असतात. आज भारतात अशी कुटुंबे आहेत जी अभिमानाने ‘मी फक्त मुदत ठेवींमध्ये माझ्या बचतीची गुंतवणूक करतो,’ अशा लोकांनी अर्थसाक्षर होणे आवश्यक आहे.

मुदत ठेवींना अर्थनिरक्षर प्राधान्य देतात. कारण मुदत ठेवी गुंतवणुकीवर निश्चित व खात्रीशीर परतावा देतात. भले त्या महागाई दरापेक्षा कमी परतावा देणारे असतात. मात्र मुदतीअंती तुम्हाला मिळणारा परतावा (व्याज) हे किती मिळेल हे तुम्हाला माहीत असते. त्यामुळे, त्यावर विश्वास ठेवणे सोपे जाते. दूरच्या आर्थिक उद्दिष्टासाठी तुम्हाला तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशावर हमी हवी असल्याने भारतामध्ये मुदत ठेव हे सर्वमान्य गुंतवणूक साधन आहे. ‘सेबी’च्या सर्वेक्षणानुसार, ९५ टक्के भारतीय कुटुंबे बँकेच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. कारण ती बाजाराशी जोडलेली साधने नाहीत आणि ५ टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूकदार म्युच्युअल फंड किंवा बाजार जोखमीशी संबंधित साधनांमध्ये गुंतवणूक करण्याची तयारी दाखवतात.
अस्थिर परतावा असलेल्या कोणत्याही गुंतवणूक साधनांचा वापर टाळण्याकडे बहुसंख्य गुंतवणूकदारांचा कल असतो. मात्र बाजार जोखमीशी निगडित परताव्याचा दर हा खात्रीशीर परताव्यापेक्षा अधिक असतो, हे माहीत नसणे हेसुद्धा मोठय़ा प्रमाणावर अर्थनिरक्षरतेचे द्योतक आहे.

शालेय अभ्यासक्रमात संपत्ती निर्मितीचे महत्त्व बिंबवले जात नाही. वेगवेळय़ा गुंतवणूक साधनांचा वापर करून विविध माध्यमांतून संपत्ती निर्माण करायला हवी हे शालेय अभ्यासक्रमातून शिकवायला हवे. आर्थिक उत्पादनांमध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करता, तेव्हा तुमचा परतावा खात्रीशीर परताव्यापेक्षा अधिक असतो. जो तुम्हाला तुमचे स्वप्नातील घर, तुमच्या मुलाचे शिक्षण आणि दीर्घ मुदतीनंतर साध्य करायची आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ठरतो. यासाठी संपत्ती निर्माण करण्याचे महत्त्व शालेय वयात बिंबवणे आवश्यक आहे. संपत्ती निर्मितीत खात्रीशीर परताव्याच्या लोभाने रोकड तरलतेकडे दुर्लक्ष करणे हेसुद्धा अर्थनिरक्षरतेचे लक्षण आहे.

आपल्या पाच वर्षे किंवा त्यापुढील आर्थिक उद्दिष्टांसाठी बचत करत असताना ‘एसआयपी’सारख्या सुलभ साधनांचा वापर करून बाजार जोखिमेशी मैत्री करायला शिकणे हे अर्थसाक्षर होण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असेल. ‘एसआयपी’चे फायदे ‘लोकसत्ता – अर्थवृत्तान्त’च्या वाचकांना नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती करणे हे आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. म्हणूनच घरोघरी तिरंग्यासोबत ‘एसआयपी’ची पताका फडकायला हवी.
shreeyachebaba@gmail. Com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sip elixir freedom independence financial freedom gopal rao agarkar amy