scorecardresearch

बाजाराचा तंत्र-कल :  अखेर बाजार सावरला!

निफ्टी निर्देशांकाने जेव्हापासून १७,२०० चा स्तर तोडला तेव्हापासून बाजार मंदीच्या गर्तेत सापडलेला आहे.

आशीष ठाकूर ashishthakur1966@gmail.com

या स्तंभातील २ मेच्या लेखातील ‘सावर रे’ या लेखात निफ्टी निर्देशांकाने १६,००० चा स्तर राखण्याची नितांत गरज आहे असे नमूद केले होते. आता तरी सावर रे! अशा ती आर्त साद सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी प्रत्यक्षात आली. या पार्श्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

निफ्टी निर्देशांकाने जेव्हापासून १७,२०० चा स्तर तोडला तेव्हापासून बाजार मंदीच्या गर्तेत सापडलेला आहे. तेव्हापासून मामुली अशी क्षणिक तेजी आणि हादरा देणारी मंदी असे सूत्र विकसित झाले आहे. निफ्टी निर्देशांकांने १७,२०० चा स्तर तोडल्यापासून बाजारावर मंदीवाल्यांचे प्राबल्य प्रस्थापित झाले आहे. तेव्हापासून प्रत्येक लेखात एका वाक्याची सतत पुनरावृत्ती असायची ते वाक्य म्हणजे – ‘निफ्टी निर्देशांकाने १७,२००, १६,८०० चे स्तर राखणे नितांत गरजेचे आहे.’ अर्थातच यातील ‘नितांत’ हा शब्द अधोरेखित असायचा. निफ्टी निर्देशांकाने उपरोक्त स्तर, त्या त्या वेळेला राखण्याची ‘नितांत’ गरजेचे असायचे तो स्तर तोडल्याबरोबर नितांत शब्दाचे पर्यवसान ‘तेजीच्या अंतात’  होऊन हजार अंशांची घसरण ठरलेली. निफ्टी निर्देशांक १७,२०० वरून १६,२०० व १६,८०० वरून १५,८०० गडगडल्याचे आपण पाहिलेच आहे. 

आता चालू असलेल्या तेजीला निफ्टी निर्देशांकावर १५,८०० स्तराचा भरभक्कम आधार असेल. येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकाने हा स्तर सातत्याने राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य हे १६,३५० व द्वितीय लक्ष्य १६,६५० ते १६,८०० असे  असेल. 

आता चालू असलेल्या तेजीचे स्वरूप हे शाश्वत आहे की क्षणिक ते जाणून घेऊ या.

लेखात वर उल्लेख केल्याप्रमाणे निफ्टी निर्देशांकाने जेव्हापासून १७,२०० चा स्तर तोडला आहे तेव्हापासून बाजार मंदीच्या गर्तेत सापडलेला आहे. या मंदीच्या विळख्याचा परीघ हा १५,८०० ते १६,८०० असा हजार अंशांचा आहे. या हजार अंशांमध्ये निफ्टी निर्देशांकाने जूनच्या अखेपर्यंत पायाभरणी केली आणि त्याने १६,८०० चा भरभक्कम अडथळा पार केल्यास, निफ्टी निर्देशांकावर तेजी अवतरू शकेल. ही तेजीदेखील हजार अंशांचा फेर धरेल आणि निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे १७,८०० ते १८,६०० असेल. ही नाण्याची एक (तेजीची) बाजू झाली.

आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा (मंदीचा) विचार करता, १६,६५० ते १६,८०० चा स्तर पार करण्यास निफ्टी निर्देशांक वारंवार अपयशी ठरत असल्यास, ही पहिली धोक्याची घंटा असणार आहे. या घसरणीत १५,८०० चा स्तरदेखील निफ्टी निर्देशांक राखण्यात अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांक १४,८०० ते १४,६२५ पर्यंत खाली घसरू शकतो.

शुक्रवारचा बंद भाव :

सेन्सेक्स : ५४,३२६.३९ 

निफ्टी :  १६,२६६.१५

निकालपूर्व विश्लेषण

भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, २३ मे      

२० मेचा बंद भाव – २३४.९५ रु. 

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर -२२८ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून २२८ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य २५५ रुपये, द्वितीय लक्ष्य २७५ रुपये.

ब) निराशादायक निकाल: २२८ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत २१० रुपयांपर्यंत घसरण

स्टील आथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : सोमवार, २३ मे

२० मेचा बंद भाव – ८३ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर- ८७ रु.

अ) उत्कृष्ट निकाल: समभागाकडून  ८७ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे

लक्ष्य ९३ रुपये, द्वितीय लक्ष्य ११० रुपये.

ब) निराशादायक निकाल: ८७ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ७८ रुपयांपर्यंत घसरण

बाटा इंडिया लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल : बुधवार, २५ मे    

२० मेचा बंद भाव – १,७५२.९५ रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – १,६५० रु.

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,६५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,८५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,९५० रुपये

ब) निराशादायक निकाल : १,६५० रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत १,५०० रुपयांपर्यंत घसरण

हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड

तिमाही वित्तीय निकाल :  गुरुवार, २६ मे

२० मेचा बंद भाव – ४२९.१० रु.

निकालोत्तर महत्त्वाचा केंद्रिबदू स्तर – ४२२ रु. 

अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ४२५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ४५० रुपये, द्वितीय लक्ष्य ४९० रुपये.

ब) निराशादायक निकाल : ४२५ रुपयांचा केंद्रिबदू स्तर तोडत ३९० रुपयांपर्यंत घसरण

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’, इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Stock market prediction for next week stock market analysis for next week zws

ताज्या बातम्या