सुधीर जोशी

गेल्या सप्ताहाची सुरुवातच निर्देशांकांच्या मोठय़ा घसरणीने झाली होती. भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांमध्ये ३ टक्क्यांपर्यंत पडझड झाली होती. देशातील सर्वात मोठय़ा बँक घोटाळय़ाचे वृत्त, वरच्या दिशेने गेलेला किरकोळ महागाईचा दर आणि रशिया – युक्रेनमधील युद्धाचे सावट बाजारावर पडले होते. पण दुसऱ्याच दिवशी रशियन सैन्य माघारी घेण्याच्या वृत्ताने बाजाराचे सर्व नुकसान भरून काढले. नंतरच्या दिवसात मात्र युद्धाच्या उलटसुलट वृत्तामुळे बाजाराने सावध भूमिका घेतल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहाची अखेर अध्र्या टक्क्यांच्या घसरणीने केली. 

सरकारने हरित हायड्रोजन धोरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये अनेक सवलतींची घोषणा केली. रिलायन्स इंडस्ट्रीजने नुकतीच हरित हायड्रोजनच्या प्रकल्पाची घोषणा केली होती. हे धोरण रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबर लार्सन अँड टुब्रो, थरमॅक्ससारख्या ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत प्रकल्प उभे करणाऱ्या कंपन्यांना तसेच इंडियन एनर्जी एक्सचेंज या ऊर्जा खरेदी-विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करणाऱ्या कंपनीला होईल. 

बालकृष्ण इंडस्ट्रीज लिमिटेड : मुख्यत: ‘ऑफ-हायवे’ टायर्सच्या व्यवसायात कार्यरत असणाऱ्या या कंपनीने डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीच्या विक्रीत ३५ टक्के वाढ होऊन ती दोन हजार कोटींवर गेली आणि नफा चार टक्क्यांनी वाढून ३३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने या वर्षांतील तिसरा अंतरिम लाभांश (प्रति समभाग ४ रुपये) व विशेष लाभांश (प्रति समभाग १२ रुपये) जाहीर केला. पायाभूत सुविधांच्या नव्या योजना व जागतिक औद्योगिक उलाढालीमधील वाढ कंपनीसाठी पूरक आहेत. तर वाढते खनिज तेलाचे दर कंपनीच्या नफा क्षमतेवर परिणाम करू शकतात. तरीदेखील अनेक वर्ष उत्तम कामगिरी करणाऱ्या या कंपनीच्या समभागातील सध्याची घसरण गुंतवणुकीची संधी आहे.

ग्रासिम इंडस्ट्रीज : कंपनीला डिसेंबर तिमाहीअखेर १,७४६ कोटींचा नफा झाला. गेल्या वर्षांच्या तुलनेत तो २६ टक्क्यांनी तर गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो २८ टक्क्यांनी अधिक आहे. जागतिक बाजारातील कपडय़ांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीच्या व्हिस्कोज धाग्यांच्या मागणीत ५५ टक्के वाढ झाली. कंपनीने गुजरातमध्ये व्हिस्कोजच्या वाढवलेल्या उत्पादन क्षमतेचा कंपनीला फायदा झाला. कंपनीच्या रासायनिक उत्पादनांच्या विक्रीतदेखील ८३ टक्के वाढ झाली आहे. कंपनीच्या वित्तीय व्यवसायातील उपकंपनी आदित्य बिर्ला कॅपिटलच्या मिळकतीत १३ टक्के तर सिमेंट व्यवसायातील उपकंपनी अल्ट्राटेक सिमेंटच्या मिळकतीत ६ टक्के वाढ झाली. कंपनीच्या समभागातील सध्याच्या भावात गुंतवणुकीची संधी आहे.

टाटा मोटर्स : जेएलआर या टाटा मोटर्सच्या युरोपमधील उप-कंपनीने एनव्हिडिया या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित ग्राफिकल चिप बनविणाऱ्या जगातील सर्वात मोठय़ा कंपनीबरोबर करार केला आहे. त्यामुळे कंपनीला नव्या पिढीसाठी आधुनिक सुखसोयीनींयुक्त व सुरक्षित वाहने बनविणे शक्य होईल. टाटा मोटर्सचा प्रवासी विद्युत वाहनांच्या क्षेत्रात जोरदार मुसंडी मारत आहे. कंपनीचा विद्युत वाहन विक्रीत भारतीय बाजारपेठेत सध्या ७५ टक्क्यांहून अधिक वाटा आहे आणि नवीन १० मॉडेल येत्या तीन ते चार वर्षांत येणार आहेत. कंपनीच्या भारतातील प्रवासी वाहन विक्रीत गेल्या दोन वर्षांत १३ टक्के वाढ झाली आहे. बाजारातील घसरणीत दीर्घ मुदतीसाठी कंपनीचे समभाग चांगला फायदा देऊ शकतील.

बाजारातील तीव्र चढ-उताराचा आणखी एक अनुभव सरल्या सप्ताहात आला. भारतातील कंपन्यांची कामगिरी चांगली असली तरी केवळ रशिया-युक्रेन दरम्यान युद्धाच्या उलटसुलट बातम्या आणि अमेरिकेतील व्याजदर वाढण्याची भीती बाजाराला आणखी काही काळ असेच दोलायमान ठेवेल. भारतात नजीकच्या काळात होऊ शकणारी इंधन दरवाढ, महागाई व परिणामी व्याजदर वाढ या बाबी सतत टांगत्या तलवारीसारख्या बाजारावर अंकुश ठेवतील. बाजारातील मोठे गुंतवणूकदार भविष्यातील मोठा नफा कमावू शकणाऱ्या कंपन्यांपेक्षा सध्या वाजवी नफा कमावणाऱ्या व किफायतशीर किमतीमध्ये मिळणाऱ्या कंपन्यांकडे आकर्षित होत आहेत. गुंतवणूकदारांनी जास्त जोखीम पत्करण्याचा हा काळ नाही. पण मोठय़ा घसरणीत नावाजलेले समभाग जमविण्याच्या संधी कायम येत राहतील.

या सप्ताहातील या घडामोडींवर लक्ष ठेवा

* सनोफी इंडिया, केएसबी लि., लिंडे इंडिया, व्हीआयपी इंडस्ट्रीज या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल व अंतरिम लाभांश जाहीर करतील.

* रेन इंडस्ट्रीज, सुप्रीम इंजिनीअरिंग या कंपन्या डिसेंबरअखेरच्या तिमाहीचे निकाल जाहीर करतील.

* सारेगामा इंडिया समभागांच्या विभाजनाची घोषणा करेल.

* टीसीएसकडून समभाग पुनर्खरेदीसाठी (बायबॅक) २३ फेब्रुवारी ‘रेकार्ड डेट’ म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sudhirjoshi23@gmail.com