अभ्यास वर्ग लेख – २५ वा
मागील काही अभ्यास वर्गामधून आपण अनेक डावपेचांचा अभ्यास करताना बांधिलकीचा (ओपन इंटरेस्ट – open interest) उल्लेख केला. ही संकल्पना नेमकी काय ते पाहू. त्याचबरोबर माप (volume), पुट कॉल रेशो संकल्पनांचाही अभ्यास करू या. विकल्प खरेदी व विक्री करणारे ट्रेडर्स यांना या तिन्ही संकल्पना माहित असणे आवश्यक आहे.अनेक लोकांना असे वाटते की, विकल्पामध्ये तरलता मोजण्याचे महत्वाचे व एकमेव साधन म्हणजे केवळ बांधिलकी (ओपन इंटरेस्ट ) होय. परंतु हा एक मोठा गरसमज आहे.आपणास माहित आहे की प्रत्येक शेअर जो फ्युचर्स व विकल्पामध्ये ट्रेड होतो. त्या शेअर्सचे अनेक स्ट्राईकची विकल्प साखळी खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असते, त्या प्रत्येक स्ट्राईकमध्ये जे करार बांधील (ओपन इंटरेस्ट) आहेत त्याच्या एकंदर संख्येला त्या स्ट्राईकची बांधिलकी (ओपन इंटरेस्ट) म्हणतात. प्रत्येक व्यक्ती जेव्हा विकल्प विकत घेतो म्हणजे विकत घेणाऱ्याचा व्यवहार उघड (open) होतो व तो व्यवहार कालांतराने विकण्यासाठी म्हणजे व्यवहार बंद करण्यासाठी असतो व जो विकतो म्हणजे विकणाऱ्याचा व्यवहार उघड (open) होतो, तोही कालांतराने विकण्यासाठी म्हणजे व्यवहार बंद करण्यासाठी. या दोघांचेही व्यवहार पूर्ततेसाठीच असतात, परंतु ते व्यवहार जोवर पुरे होत नाहीत तो पर्यंत ते ओपन इंटरेस्ट ठरतात.अशा या ओपन इंटरेस्ट व्यवहारांची एकूण बेरीज म्हणजे त्या त्या स्ट्राईकचा ओपन इंटरेस्ट होय. याचाच अर्थ असा की नवीन व्यवहार उघडल्यामुळे बांधिलकी (ओपन इंटरेस्ट) वाढतो व एकदा खुले व्यवहार बंद (squre off) केल्याने बांधिलकी (ओपन इंटरेस्ट) कमी होतो.आपणास हे ही लक्षात आले असेल की विकल्प साखळी बाजाराला उपलब्ध करताना (नवीन महिन्याच्या पहिल्या दिवशी) ओपन इंटरेस्ट शून्य किंवा अत्यल्प असेल व जसा जसा कालावधी जाईल तसा तसा ओपन इंटरेस्ट वाढेल. म्हणजे केवळ ओपन इंटरेस्ट कमी आहे, यावरून तरलता न समजता ती स्ट्राईकच्या कोणत्या कालावधीमध्ये आहे हे सुद्धा लक्षात घेणे महत्वाचे आहे.विकल्प साखळीच्या कोणत्याही स्ट्राईकच्या झालेल्या एकंदर व्यवहारास माप (व्हॉल्यूम-Volume) म्हणतात. व जे व्यवहार उघडलेले आहेत व अजून बंद झाले नाहीत म्हणजे बाजारात अजूनही बंद होण्यासाठी उपलब्ध आहेत त्यांना ओपन इंटरेस्ट म्हणतात, या दोघामधला फरक वाचकांना लक्षात आला असेल.
दोहोतला फरक अनेक विकल्प खरेदी विक्री करणाऱ्यांना माहित नसल्याने गोंधळ उडतो. एकेकाळी तरलता मोजण्याचे एकमेव साधन केवळ माप (व्हॉल्यूम) आहे असे अनेकांना वाटायचे. परंतु जेव्हा ओपन इंटरेस्टची अतिरिक्त संकल्पना उदयास आली तेव्हापासून तरलता मोजण्याचे एकमेव साधन केवळ बांधिलकी (ओपन इंटरेस्ट) आहे असे लोकांना वाटत आहे. दोन्हीही गरसमजातून निर्माण झालेल्या धारणा आहेत, हे सांगावेसे वाटते.नवीन करार बाजारात उपलब्ध होताना ओपन इंटरेस्ट शून्य असतो व जो कोणी प्रथमत: पर्याय विकत घेतो तो बाजारातल्या मोठय़ा मंडळीकडून विकत घेतो, कारण आपणास माहित आहे की विकणाऱ्यास मार्जिनच्या स्वरूपात जास्त पसे ठेवावे लागतात व मर्यादित फायदा व अमर्यादित तोटा असा पर्याय तो विकत असतो. नंतर प्रत्येक दिवसागणिक ओपन इंटरेस्ट वाढत असतो, त्यामुळे केवळ ओपन इंटरेस्टवरून तरलता मोजणे हे धोकादायक आहे. म्हणजे या संकल्पना फार उपयुक्त जरी असल्या तरी त्या संकल्पना तरलता मोजण्याचे एकमेव साधन नाहीत. या चुकीच्या समजुतींवर विसंबून अनेकजण नाहक तोटा करून घेतात.मग तरलता मोजण्याची योग्य पद्धत काय?मूळात विकल्पाच्या खरेदी-विक्रीसाठी तरलता समजून घेणे महत्वाचे का, हे आधी समजून घेऊ.त्यासाठी वरील दोन्ही संकल्पाच्या सोबत खालील मुद्दे लक्षात घ्यावे.
१) एखाद्या स्ट्राईकच्या विकल्पात खरेदी-विक्रीचे व्यवहार सहजपणे होत आहेत काय?
२) त्या स्ट्राईकवर खरेदी करणाऱ्याचा खरेदी भाव व विक्री करणाऱ्याचा विक्री भाव यामध्ये फरक किती आहे?
व्यवहार सहजपणे होण्यासाठी खरेदी करणारे व विक्री करणारे जास्त संख्येने असले पाहिजेत व दोहोंच्या बोली (बीड ऑफर) किमतीत अत्यल्प म्हणजेच कमी फरक असला पाहिजे. अशावेळी त्या करारांना अति तरल करार समजण्यात येते. त्यामध्ये व्यवहार तात्काळ व सहज होत असतात.या उलट ज्या करारामध्ये तरलता नसते किंवा कमी असते ते व्यवहार सहज होत नाहीत व त्याच्या खरेदीदार व विक्रेत्याच्या भावामध्ये खूप फरक असतो अशा करारांना कमी तरल (Highly Liquid) म्हणतात. सर्वसामान्यांनी अशा करारांमध्ये खरेदी विक्री करू नये. हे बडय़ा ट्रेडर्सनी रचलेले सापळे असतात, हे लक्षात घ्यावे. चुकून घेतल्यास तुम्हाला पुढे विकताना खरेदीदार मिळत नाही व त्या विकल्पांची किंमत शून्य होऊन जाते. किवा तोटय़ामध्ये व्यवहार बंद करावा लागतो. खरे तर केवळ विकल्पामधेच नव्हे तर कोणत्याही खरेदी-विक्रीमध्ये सहज व्यवहार होणाऱ्या म्हणजे उत्तम तरलता असणाऱ्या करारामध्येच व्यवहार करावा. त्याचवेळी हेही लक्षात घ्यावे की, शेअर्समध्ये माप (व्हॉल्यूम) खूप जास्त असते व त्या एकाच शेअर्सचे विकल्प खूप असल्याने एक-एका विकल्पांमध्ये ओपन इंटरेस्ट कमी असतो थोडक्यात किती ओपन इंटरेस्ट असेल तर अति तरल करार आहे हे साकल्याने समजून घेऊन व्यवहार करावा.साधारणपणे एटीएम विकल्पांच्या पर्यायामध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम व ओपन इंटरेस्ट असतो व त्यानंतर जसे जसे पर्याय ओटीएम किंवा आयटीएम होतात म्हणजे प्रथम जरा ओटीएम, आयटीएम नंतर डीप ओटीएम, आयटीएम होतात तसेतसे त्यांच्यामध्ये तरलता कमी कमी होत असते. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक ट्रेडर्स हेजिंगच्या संकल्पनेचा वापर करतात. ते डेल्टा नष्ट करण्यासाठी एटीएम कॉल किंवा पुटचा वापर करतात. जसे प्रोटेक्टिव्ह पुट्स किंवा मॅरिड पुट्स. तसेच जर मोठय़ा प्रमाणात शेअर्सच्या किमतीमध्ये चढ-उतार होण्याची शक्यता असल्यास काही ट्रेडर्स एटीएम कॉल किवा पुट खरेदी करून स्ट्रॅडल हा डावपेच वापरतात
उदारणार्थ : निफ्टी किवा बँक निफ्टीचे किंवा काही शेअर्सचे एटीएम किवा जरासे आयटीएम, ओटीएम कॉल्स व पुट हे अति तरल असतात त्यामुळे त्यामध्ये व्यवहार करावा.पुढील अभ्यास वर्गामध्ये आपण पुट कॉल रेशो व इतर संकल्पना समजून घेऊ.कृपया वाचकांनी लेखकाचा हा सल्ला आहे असे समजू नये. योग्य प्रशिक्षकाकडून ज्ञान घेऊनच व्यवहार करावे असे सुचवावे असे वाटते.
info@primetechnicals.com
(कृपया वाचकांनी लेखकाने दिलेला सल्ला/शिफारस आहे असे समजू नये. योग्य सल्लागाराकडून माहिती घेऊनच व्यवहार करावेत.)