झाडं, पानं, फुलं, फळं, पक्षी, प्राणी, कीटक या सगळ्या जीवजंतूंशी आपण आश्र्च्र्यकारकरीत्या जोडले गेलो आहोत. हे ‘जीवो जीवस्य जीवनम्’ सांगणारं आश्र्च्र्यकारक सृष्टीभांडार समजून घेण्यासाठी आसमंत खुणावतोय. गरज आहे नवीन वर्षांत दृढ संकल्पाची आणि तो नेटाने पार पाडायची!

नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर जेवायला जायचा प्लान सुरू असताना अचानक कुणीतरी फिरंगीपानी नावाचं हॉटेल सुचवलं. कसलं विचित्र नाव ठेवलंय अशी चर्चा सुरू असताना कुणीतरी म्हणालं की तिकडे फिरंगी येतात म्हणून तसं नाव दिलं असेल. ऐकल्यावर मजा वाटली  आणि हॉटेलच्या नावाचं स्पेलिंग पाहिल्यावर लक्षात आलं की दुसरं तिसरं काही नसून हे चक्क नेहमीच्या पाहण्यातल्या फुलाचं नाव आहे आहे. प्लूमेरिया गटातल्या प्लूमेरिया रुब्रा अशा वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखल्या जाणाऱ्या लाल चाफ्याचं इंग्रजी नाव आहे फ्रँगिपनी! अमेरिकेच्या उष्ण कटिबंधातून कधीतरी आपल्याकडे येऊन आपलाच होऊन गेलेला चाफा भारतीय नाही ह्यवर विश्वास बसणं थोडंसं कठीण आहे. चार्ल्स प्लूमिअर या फ्रेंच वनस्पती शास्त्रज्ञाने  मध्य अमेरिकेतल्या वनस्पतींचा अभ्यास करून दीर्घ नोंदी करून ठेवण्याचं काम केलं होतं. त्याच्या सन्मानार्थ चाफ्याच्या प्रजातीचं नाव प्लूमेरिया असं करण्यात आलं. या नावातलं  रुब्रा म्हणजे लाल.  जगभर अ‍ॅपोसायनेसी कुळातल्या ह्य प्रजातीच्या अनेक जाती सापडतात. आपल्या मंदिरांजवळ लावलेला, पांढऱ्या रंगात चिमूटभर हळदीची छटा मिरवणारा चाफा आणि हा लालचाफा भाईभाईच असतात.

एकूणच चाफ्याचं झाड माहीत नसलेली व्यक्ती विरळाच असेल असं मला वाटतं. साधारण सात-आठ मीटर्सची उंची गाठणारं हे झाड कधीच घट्ट वृक्ष म्हणून ओळखलं जात नाही. मला आठवतंय, लहानपणी अंगणातल्या चाफ्यावर चढायचे माझे अनेक प्रयत्न ह्य झाडाच्या कमकुवत ठिसूळ लाकडाने हाणून पाडले होते. ह्य ठिसूळ लाकडाच्या फांद्या खडबडीत दिसतात याचं साधं कारण म्हणजे नियमित गळून जाणारी याची मोठी पानं गळून पडताना स्वत:च्या अस्तित्वाचा एक खळगा  त्या फांदीवर सोडून जातात. ही पानं कायम हिरवीगार तर दिसतातच, पण मोठय़ा आकारामुळे विरळ फांद्यांना भरगच्च भासवतात. बहुतांश झाडांनी हेमंतात अंगीकारायला सुरू केलेलं पानगळव्रत हेही झाडं स्वीकारतं आणि ह्य हिरव्या पानांचा सर्वसंगपरित्याग करून वसंतापर्यंत अगदी बोडकं होऊन बसतं.

वसंतात पालवणारं लाल चाफ्याचं झाड उन्हाळ्यात फुलांनी भरायला सुरुवात होते नि पावसाळ्यात मंद मधुर वासाच्या फुलांनी जणू फुलण्याचा कळस गाठलेला असतो. ही लाल, पांढरी आणि गुलाबी छटेची लालूस फुलं फांद्यांच्या टोकांना घोसात येतात. जणू काही निगुतीने वळून व्यवस्थित देठाला जोडलेल्या पाच पाकळ्या फुलताना हे फूल इतकं सुंदर दिसतं की बास रे बास. पावसाळ्यानंतर कधीतरी या झाडाला जोडशेंगांसारखी काळी फळं येतात. ही फळं खाण्यास योग्य नसतात.  याच जोडीला, संपूर्ण झाडात असलेला दुधट पिवळसर रंगाचा चीक विषारी असल्याने किडामुंग्या त्याच्याकडे फिरकत नाहीत. झाडाची गंमत अशी आहे की, तुटक्या फांद्यामधूनही झाड लागतं, जगतं आणि तगतं. माझ्या लहानपणी हा लालचाफा पांढऱ्या चाफ्याएवढा रुळला नव्हता. पण हल्ली अनेक ठिकाणी हा फुललेला दिसून येतो. या लालचाफ्याच्या जोडीला आपल्याला माहीत असलेला पांढरा चाफा म्हणजेच प्लूमेरिया ओब्ट्युसा, अर्थात खुरचाफा. तो आपल्याला परिचित असतो तो देवळांजवळ पाहून. प्लूमेरिया कुटुंबातला पांढरा चाफा आपल्याकडे मंदिरांजवळ लावला जातो, मात्र तिकडे परदेशात हा चक्क दफनभूमीत लावला जात असल्याने डेड मॅन्स ट्री म्हणून ओळखला जातो. अलीकडे आधुनिक औषधांमध्ये चाफ्याचा वापर बराच केला जातो. या पांढऱ्या चाफ्यालासुद्धा लाल चाफ्याप्रमाणेच जोडशेंगा येतात आणि हासुद्धा फांद्यांमधून जगतो. काय गंमत आहे ना? हॉटेलच्या नावातलं फिरंगी म्हणजे काय हे शोधताना हा फिरंगी,  फ्रँगिपनी अर्थात चाफ्याचं झाड भेटल्याचं समाधान मला मिळालं.

तर गोष्ट सुरू होती सेलिब्रेशनची. ह्य गप्पा मारताना निघालेली दुसरी टूम म्हणजे समुद्रकिनारी, सुरूच्या बनात बसून जेवणखाण करायची. बहुतांश समुद्रकिनारी मुबलक प्रमाणात लावली गेलेली सुरू ऊर्फ कॅश्युरिना ही झाडं कायम माझ्या कुतूहलाचा विषय आहेत. ऑस्ट्रेलियाच्या द्वीपखंडातलं हे जंगली झाड, ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत आपल्याकडे आणून रुजवलं. बीफ-वुड ट्री, ऑस्ट्रेलियन ओक किंवा ऑस्ट्रेलियन पाइन अशा इंग्रजी नावांनी ओळखलं जाणारं सुरू कॅश्युरिना इक्किसेटिफोलिया या वनस्पतीशास्त्रीय नावाने ओळखलं जातं. याच्या फांद्या कॅसोवेरी  नावाच्या कोंबडीसदृश दिसणाऱ्या पक्ष्याच्या पिसाऱ्यासारख्या दिसतात म्हणून कॅश्युरिना  हे प्रजाती नाम ठेवलं गेलं. कॅश्युअ‍ॅरिनेसी कुळातल्या  कॅश्युरिना प्रजातीच्या जवळपास साठहून जास्त जाती जगभर आढळतात.

सुरू हा शब्द उच्चारला की आपल्या नजरेसमोर लग्गेच सुरूचं बन येतं. साधारण पंचवीस ते तीस मीटर्सची उंची सहज गाठणारं हे झाड आपल्या झिपरट फांद्या आवरून सावरून उंच होत जातं. गंमत अशी आहे की कायम सदाहरित असणाऱ्या ह्य झाडाच्या फांद्यांना पानंच नसतात. पाइन वृक्षासारख्या दहा ते पंधरा सेंमी लांबीच्या हिरव्या डहाळ्या असतात. या डहाळ्या दरवर्षी गळून पडतात आणि नवीन येत राहतात. अगदी सहजपणे या डहाळ्यांवर एकमेकांना जोडणारे कांडे आणि पेरं दिसून येतात. मला आठवतंय लहानपणी, ह्य पेरांना तोडून पुन्हा जोडायचा जादूचा खेळ आम्ही करायचो. जवळून ही पेरं नीट पाहिली तर त्यावर लहानशी बदामट रंगाची  सहा-सात वर्तुळं दिसून येतात. पानांची प्रकाशसंश्लेषण क्रिया आपण शाळेत शिकलेली असतो, जी इथे जवळून पाहायला मिळतें. या डहाळ्यांमुळे बाष्पोश्वसनाचा (ट्रॅन्सिपिरेशन) वेग कमी होतो आणि झाड अगदी कोरडय़ा उष्ण हवेतही छान वाढतं.

अशीच गंमत सुरूच्या फुलांचीदेखील असते. या झाडाबद्दलचा साधारण गरसमज म्हणजे सुरूला फुलं येतच नाहीत. पण हे चूक आहे.   या झाडाला अगदी बारीक अशी साधीशी फुलं येतात. वाऱ्यामार्फत परागकण क्रिया होते आणि पुढे ती लहानसर कोनासारखी फळं बनतात. ह्य फळातल्या बिया इतक्या हलक्या असतात की साधारण शंभर बियांचे वजन एखादा ग्राम भरते. या बियांमधूनच नवीन झाडं जन्माला येतात. दुर्दैवाने या फिरंगी झाडाला स्थानिक पक्षी, किडे आणि गुरं आपलं समजत नसल्याने यांचा उपयोग नसतोच. निव्वळ जळाऊ लाकूड आणि  नायट्रोजन क्षारांचा अभाव असलेल्या जमिनीत ही झाडं उत्तम वाढतात आणि जमिनीला धरून ठेवतात एवढाच ह्य झाडाचा उपयोग होतो. या जमीन धरून ठेवण्याच्या गुणधर्मामुळेच, सामाजिक वनीकरणाने समुद्रकिनारी व अनेक पडीक जागांमध्ये या झाडांची बेसुमार लागवड केली आहे. अशा वेळी नजरेला सुखावणारी हिरवळ महत्त्वाची की स्थानिक वनसंपदेवर होणारे दूरगामी दुष्परिणाम महत्त्वाचे असे प्रश्न अनुत्तरित राहतात. हे सगळं पाहून, अलीकडच्या काळात आपण बहुतांश पाश्चिमात्य गोष्टींचं अंधानुकरण करत चाललो आहोत असं प्रकर्षांने जाणवतं.  आता हेच पाहा ना, आपलं नवीन वर्ष सुरु होतं ते गुढी पाडव्याला, पण आपण मात्र ह्य ग्रेगोरिअन नवीन वर्ष साजरं करण्याच्या कल्पनेने इतके झपाटलेले असतो की बास रे बास.

अगदी आत्ता सुरू झालं म्हणताना २०१६ संपलंसुद्धा. निसर्गाचं संपलं नसलं तरी कॅलेंडरचं वर्ष संपलंय.  एक जानेवारीला सुरू झालेला आसमंताचा हा प्रवास वर्तुळाच्या त्याच ठिकाणी येऊन पोहोचला आहे. इंडियन प्री िवटर, अर्थात आपल्या हेमंत ऋतूचे ठसे जागोजागी दिसायला लागले असताना येऊ घातलेल्या ग्रेगरियन वर्षांच्या  खुणाही परिसर मिरवायला लागलेला दिसतोय. दिवाळीत सुरू झालेला सुट्टय़ांचा मौसम नाताळच्या सुट्टय़ांमध्ये जोमात सुरू आहे. पर्यटनासाठी आपल्याला स्थलांतर घडवणारा निसर्ग, स्थलांतर करून आपल्या ऋतुचक्रात येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला सज्ज झालाय. जानेवारीत निसर्गलयीत सुरू केलेल्या ह्य प्रवासात स्थलांतरित पक्षी, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये फुलणारी, फळणारी आणि आनंद देणारी झाडं, कुठे प्राणी तर कुठे किडय़ामकोडय़ांच्या भेटीगाठी घेत असताना बघता बघता वर्ष झालं. वर्ष संपत आलं की बहुतांश लोक आगामी वर्षांसाठी नवीन संकल्प बनवतात. वर्षअखेरीस जुन्या झालेल्या संकल्पांचा लेखाजोखा मांडायची आणि नवीन संकल्प करायची हीच वेळ असते. हा लेखाजोखा मांडताना, हे संकल्प आठवताना विचार केला तर हळूच जाणवतं की ह्य संकल्पयादीत क्वचितच निसर्ग किंवा पर्यावरणाला आपण विचारात घेतलेलं असतं.

वर्ष संपत आलं की करायचंय, बघायचंय म्हणताना अनेक गोष्टी राहून गेल्याची चुटपुट आपल्याला प्रकर्षांने जाणवत रहाते. मीसुद्धा या गोष्टीला अपवाद नाहीये. माझी २०१७ ची संकल्प यादी फार मोठी नाहीये. पाव शतकापूर्वी शालेय जीवनाबरोबरच मागे पडलेल्या शास्त्र विषयाचं शस्त्र मी घासूनपुसून साफ करायचं ठरवलं आहे. तेव्हा काचेच्या बाटल्या नि त्यातल्या फॉम्र्यालीनच्या द्रावणात बुडवून ठेवलेली प्राण्यांची मृत शरीरं दुरूनच, बोर्डाचे मार्क्‍स पदरात पाडण्यापुरती अभ्यासली होती. आता आनंदाचे मार्क्‍स पदरात पाडून घ्यायला, निसर्गाच्या रसरशीत जीवनरसात नाहून निघणारे जिवंत नमुने पाहायला मी न चुकता बाहेर पडणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना, किचकट वाटणारी ती शास्त्रीय नावं अगदी दमछाक करायची. हजारो किलोमीटर्सच्या दूर प्रांतातून आलेली ती चित्रविचित्र नावं आठवताना आता मी दमणार नाही की लाजणार नाही. कारण स्थानिक भाषेतूनही मला ज्ञान मिळेल याची खात्री आहेच. जीवशास्त्रात शिकलेल्या निसर्गसाखळ्या जणू विस्मृतीत गेल्या आहेत त्यांना घराबाहेर पडून मी अनुभवणार आहे. माझ्या मुलांच्या जोडीने पतंग आणि फुलपाखरांमधला फरक माहीत करून घेऊन फुलपाखरांचं आयुष्य निरखणार आहे. कुठे फुलपाखरांची अंडी बघ, तर कुठे कोष बघ असं करत, कुठे मुंग्यांचा माग काढणार तर कुठे गांडुळं, कुठे खेकडा पकडून पाहाणार आहे. कारण मला निसर्गातल्या लहानातल्या लहान घटकाशी जोडलं जायचंय. जंगलातल्या जायंट वुड स्पायडर नामक कोळ्याला जाळं विणताना मी निरखणार आहे. रानातल्या शांत पाणवठय़ावर अचानक समोर दिसलेल्या गोगलगायीच्या चमकत्या रेषेला शोधत मी मोकळ्या माळरानावर रंगीत नाकतोडय़ांच्या जोडीने उडय़ा मारत फिरणार आहे तर कुठे प्रार्थना किडय़ासारखं चिमुकले पंख उभारून झेप घेऊन बघणार आहे. हे सगळं मला माझ्या घरात बसून अनुभवायला मिळणार नाहीये म्हणूनच घराबाहेर पडणार आहे आणि रानोमाळ भटकणार आहे.  माझ्या नमित्तिक खरेदीमध्ये निसर्गविषयक पुस्तकं, सिडीज यांचा समावेश तर करणार आहेच, पण सोबत मुलांना जंगल कंपास, सचित्र फिल्ड गाइड्सही मी अधुनमधून गिफ्ट्स म्हणून देणार आहे. नुसतं या गिफ्ट्स देऊन थांबणार नाही तर त्यांचा वापर करायला शिकवून निसर्गातलं जीवशास्त्र आनंदशास्त्र कसं होईल हेही  मी नक्की पाहाणार आहे. निसर्गातली भौगोलिक, स्थानिक जैविक वैविधता अभ्यासायला सुरुवात केली की साहजिकच आपली पर्यावरणाशी नाळ जुळलेली राहाते. एकदा का नाळ जुळलेली असली की, या जीवशास्त्राला जाणून घेण्याची, जगवण्याची आणि त्याचा हिस्सा होण्याची तगमग सुरू होते. या तगमगीतूनच आसमंतात नवनवीन गोष्टी अनुभवायला, शिकायला मिळतात. गरज आहे एका संकल्पाची आणि तो पूर्ण करायला घराबाहेर पडण्याची.

आश्चर्यवत पश्यतिकश्चिदेनं आश्चर्यवत वदतितथव चान्य:।

आश्चर्यवत चनमन्य: शृणोति श्रृत्वाप्येनं वेद न चव कश्चित्।

अर्थात निसर्गाचा हा आश्चर्यकारक खजिना पाहताना क्वचितच कुणी आढळतं, असा विचार मनात येतो जेव्हा जाणवतं की निसर्गाच्या अद्भुत जाळ्यात प्रत्येकाचं एकमेंकांशी सरपटणारं, धावणारं उडणारं आणि रुजणारं घट्ट नातं विणलेलं असतं. अशा वैविध्यपूर्ण विणीने आसमंत समृद्ध झालेला असतो. झाडं, पानं, फुलं, फळं, पक्षी, प्राणी, कीटक, जीवजंतूंशी आपण आश्चर्यकारकरीत्या जोडले गेलो आहोत. हे जीवो जीवस्य जीवनम् सांगणारं आश्चर्यकारक सृष्टीभांडार समजून घेण्यासाठी आसमंत खुणावतोय. गरज आहे नवीन वर्षांत दृढ संकल्पाची आणि तो नेटाने पार पाडायची. आसमंतातून सगळ्यांना नवीन वर्षांच्या हार्दकि शुभेच्छा. मित्रानो, आसमंतात भेटत राहूच, निसर्गास्ते पंथान: संतु.

(समाप्त)

रूपाली पारखे देशिंगकर response.lokprabha@expressindia.com