June 2025 Monthly Horoscope In Marathi : उद्यापासून जून महिन्याला सुरुवात होते आहे. करिअर, कौटुंबिक जीवन, आर्थिक असो किंवा सामाजिक बाबतीत आपला नवीन महिना कसा जाईल याबद्दल अनेकांना चिंता असते. यामुळे नवीन नोकरी, नवीन व्यवसाय, जोडीदाराबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी अनेक जण ज्योतिषशास्त्राची मदत घेत असतात. तर थोडक्यात जून महिन्यावर कोणाचे प्रभुत्व असणार? याशिवाय अन्य ग्रहांच्या गोचरासह तुमच्या राशीवर नेमका काय व कसा प्रभाव होऊ शकतो हे आता आपण जाणून घेणार आहोत. तर प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांनी सांगितलेली मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे राशी भविष्य जाणून घेऊया…
मासिक राशिभविष्य, जून २०२५ (June 2025 Monthly Horoscope)
मेष मासिक राशिभविष्य जून (Aries Monthly Horoscope for June 2025)
तंत्रज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांचा उपयोग अतिशय उत्तमरित्या कराल. विशेष वाचन आणि लेखन कराल. मनाजोगते शिक्षणक्षेत्र निवडता येईल. नोकरी व्यवसायात आपले मत प्रभावीपणे मांडाल. अतिरीक्त खर्चांवर नियंत्रण येईल. विवाह योग जुळून येतील. मनपसंत जोडीदार मिळेल. वटपौर्णिमा शुभ वार्ता घेऊन येईल. संतान प्राप्तीसाठीच्या प्रयत्नांना यश मिळेल. स्थावर इस्टेट याबाबतचे प्रश्न सुटण्यासाठी हालचाल कराल. सुरक्षित गुंतवणूक करावी. मोठी जोखीम पत्करू नका. कामातील सातत्य आणि ध्येय प्राप्तीची आस यामुळे चांगली उंची गाठाल. आतड्याला सूज येणे, इन्फेकॅशन होणे या आरोग्य समस्या जाणवू शकतात…
वृषभ मासिक राशिभविष्य जून (Taurus Monthly Horoscope for June 2025)
ऋतुबदलाचा परिणाम तब्येतीवर दिसेल. स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरेल. कामाची आखणी करताना जोडीदाराच्या व्यस्ततेचाही विचार करावा लागेल. वैचारिक देवाणघेवाण लाभकारक ठरेल. विद्यार्थ्यांना मनाजोगते शिक्षण घेण्याची संधी मिळेल. पण, संधीचे सोने करणे फक्त तुमच्या हाती आहे. नोकरी व्यवसायात कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता आहे. घर, प्रॉपर्टी बाबतचे निर्णय तडकाफडकी घेऊ नका. वटपौर्णिमेच्या सुमारास नव्या करारावर सही कराल. गुरुबल चांगले आहे. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम न घेता सुरक्षिततेकडे अधिक भर द्यावा. हव्यास टाळावा. जुन्या ओळखीच्या व्यक्तींना भेटाल. संतती प्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी होतील. मिश्र हवामानामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवेल.
मिथुन मासिक राशिभविष्य जून (Gemini Monthly Horoscope for June 2025)
बुध, गुरू या ग्रहांच्या पाठबळावर मोठा पल्ला गाठाल. बुद्धी आणि ज्ञानाचा व्यवहारात योग्य उपयोग कराल. विद्यार्थी वर्ग शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच सतर्क राहतील. धरसोड करण्यापेक्षा सातत्य राखणे अधिक उपयोगी ठरेल. नोकरी व्यवसायात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवाल. होतकरू मुलामुलींना योग्य मार्ग दाखवाल. विवाहोत्सुकांना चांगले गुरुबल लाभेल. जुन्या ओळखीच्या व्यक्ती, मित्र-मैत्रिणी नव्याने भेटतील. विवाहित दाम्पत्यांना जोडीदाराच्या सहवासाचे सुख लाभेल. वटपौर्णिमेच्या दरम्यान आर्थिकदृष्ट्या उन्नती होईल. गुंतवणूकदारांचा आलेख उंचावेल. पोकळ व भासमान दरवाढीला भुलू नका. प्रॉपर्टीच्या बाबतीत तज्ज्ञांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. अपचन, पित्त व वाताचा विकार होण्याची शक्यता आहे.
कर्क मासिक राशिभविष्य जून (Cancer Monthly Horoscope for June 2025)
गुरुबल कमजोर असल्याने साध्या सरळ गोष्टी देखील उशिरा पूर्ण होतील. पण भाग्यातील शनी साह्यकारी ठरेल. विद्यार्थिवर्गाने कसून मेहनत घ्यायची तयारी ठेवावी. नोकरी-व्यवसायात स्वतःला सिद्ध करावे लागेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांना आपली योग्यता दाखवून द्याल. वटपौर्णिमेच्या आसपास आशेचे किरण दिसतील. विवाहितांनी जोडीदाराच्या विचारांचा मान राखावा. घर, प्रॉपर्टी, जमीन यांबाबतची कागदपत्रे तयार ठेवावीत. अतिशय धीम्या गतीने या गोष्टी पुढे सरकतील. मित्रमंडळी आणि भावंडांना मदत कराल. तुम्हाला अडचणीच्या वेळी दिलेला शाब्दिक आधारदेखील लाखमोलाचा वाटेल. गुंतवणूकदारांनी मोठी जोखीम घेऊ नये. कान, नाक, घसा यांचे विकार जाणवतील. त्यामुळे वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे लागतील.
सिंह मासिक राशिभविष्य जून (Leo Monthly Horoscope for June 2025)
ऋतुबदलाचे वेध लागतील. गुडघे, पोटऱ्या व तळपाय यांच्या समस्या जाणवतील. वटपौर्णिमेच्या सुमारास मन अधिक चंचल होईल. विद्यार्थी वर्गाला खूपच सावधगिरी बाळगावी लागेल. शैक्षणिक वर्षाची सुरुवात चांगली होणे जरुरीचे आहे. परदेशी शिक्षणाचा मानस असल्यास तो पूर्ण होईल. नोकरी व्यवसायात ग्रहमान उत्तम पाठिंबा देईल. स्वतःची अशी नवी ओळख निर्माण कराल. विवाहोत्सुक मंडळींना मनाजोगता जोडीदार मिळेल. विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटेल. संतती प्राप्तीचे बलवान योग आहेत. घर, इस्टेटीचे व्यवहार लांबतील. कागदपत्रांची पूर्तता काळजीपूर्वक करावी. गुंतवणूकदारांना धोक्याची सूचना तर मोठी जोखीम पत्करणे त्रासदायक ठरू शकते.
कन्या मासिक राशिभविष्य जून (Virgo Monthly Horoscope for June 2025)
नवनवीन उपक्रम राबवणारा आणि खूप नव्या गोष्टींना वाव देणारा असा हा महिना असेल. तुमच्यातील चांगले गुण इतरांना उपयुक्त ठरतील. विद्यार्थी वर्ग नव्या शैक्षणिक वर्षाचा पुढचा प्रवास उत्साहात सुरू करतील. नोकरी-व्यवसायात मित्रांची साथ मिळेल. त्यांच्या अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकता येतील. विवाहोत्सुक मुलामुलींना योग्य जोडीदार मिळेल. ओळखीतून स्थळ मिळेल. विवाहित दाम्पत्यांमध्ये वाद निर्माण होतील. रुसवे-फुगवे होतील. वटपौर्णिमा आपल्यातील वाद मिटवण्यास उपयोगी ठरेल. कायदेशीर कार्यवाही करताना नियम पाळाल. न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागेल. गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी. उत्सर्जन संस्थेची समस्या उद्भवेल.
तूळ मासिक राशिभविष्य जून (Libra Monthly Horoscope for June 2025)
नव्या जोमाने नवी सुरुवात करणारा, आशेचे किरण घेऊन येणारा असा हा महिना असेल. विद्यार्थी वर्गाच्या मेहनतीला उत्तम यश मिळेल. अपेक्षित क्षेत्रात पुढील शिक्षणाची संधी मिळेल. नोकरी व्यवसायात बऱ्याच गोष्टी स्थिरस्थावर होतील. व्यवस्थापक मंडळ आपल्या कामाची, कामाच्या पद्धतीची आदर करतील. वटपौर्णिमा आर्थिक लाभ देणारी बातमी आणेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. विवाहित मंडळींना संतान प्राप्तीचे योग आहेत. वैद्यकीय सल्ला घ्यावा. वाहन योग चांगला आहे. प्रवाससुद्धा सुखकर होईल. घराचे व्यवहार लांबणीवर पडतील. गुंतवणूकदारांना लाभकारक ग्रहमान आहे. सर्दी आणि वाताचे विकार यांनी त्रस्त व्हाल. पित्ताचा जोर वाढेल.
वृश्चिक मासिक राशिभविष्य जून (Scorpio Monthly Horoscope for June 2025)
लोकांना आपले विचार पटवून देताना आपली अधिकाधिक ऊर्जा खर्ची घालावी लागेल. यादरम्यान चिडचिड आणि राग येईल. विद्यार्थी वर्गाने सुरुवातीपासूनच भरपूर कष्ट घेण्याची मनाची तयारी करावी. वटपौर्णिमेच्या आसपास मनस्थिती सुधारेल. परिस्थितीचा स्वीकार करणे हीच मोठी गोष्ट आहे. नोकरी व्यवसायात झगडून आपले हक्क, अधिकार मिळवाल. गुरुबल कमजोर असल्याने विवाहोत्सुकांचे योग लांबणीवर जातील. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक गुंतवणूक करावी. खर्चावर आळा घालाल. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतलेत तर ते दोघांच्याही हिताचे ठरेल. नातेवाईकांमध्ये गैरसमज पसरतील. उष्णतेचा उत्सर्जन संस्थेवर परिणाम होईल. मूत्रविकार त्रासदायक ठरेल.
धनू मासिक राशिभविष्य जून (Sagittarius Monthly Horoscope for June 2025)
मागील महिन्यातील गुरु व राहू, केतूचा राशी बदल या महिन्यात चांगले फळ देईल. कष्टाचे चीज झाल्यावर होणारा आनंद अनोखा असेल. विद्यार्थी वर्ग आपल्यातील गुण विकसित करतील. अभ्यासासह इतर पूरक गोष्टींमध्ये सहभागी होतील. विवाहोत्सुकांचे विवाह जमण्यास वटपौर्णिमा साहाय्यकारी ठरेल. विवाहित मंडळींना कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे गरजेचे ठरेल. नोकरी व्यवसायात येणारे अडथळे आणि नव्या समस्या शांत डोक्याने, विचारपूर्वक पार कराल. जमीनजुमला, घर, प्रॉपर्टीचे कागदपत्र व्यवहारापूर्वीच तज्ज्ञांकडून तपासून घ्यावेत. गुंतवणूक करताना सर्वसमावेशक विचार केल्याने नफा झाला नाही तरी तोटासुद्धा अगदी कमीतकमी सहन करावा लागेल. शिरा, नसा ताठर झाल्यास त्रास वाढेल.
मकर मासिक राशिभविष्य जून (Capricorn Monthly Horoscope for June 2025)
मेहनत, चिकाटी आणि जिद्द या त्रिसूत्रीचा या महिन्यात अतिशय लाभ होणार आहे. विद्यार्थी वर्गाला देखील हा फॉर्म्युला लागू पडेल. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मन लावून एकाग्रतेने अभ्यास कराल. एखाद्या विषयाची आवड निर्माण करण्यास शिक्षक तयारी दाखवतील. नोकरी व्यवसायात बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळतील. विवाहित दाम्पत्यांसाठी वटपौर्णिमा विशेष फलदायी ठरेल. प्रेमबंध अधिक दृढ होतील. घर, जमीन, प्रॉपर्टीचे कामे रखडतील. संबंधीतांमध्ये एकवाक्यता नसल्याने चर्चा फिस्कटेल. पण, तुम्ही धीर सोडू नका. गुंतवणूकदार आपला पैसा आणि व्यवहारज्ञान यांची सांगड घालतील. मोठी जोखीम नको. ताप, खोकला त्रास देईल. शरीरातील उष्णतेच्या असंतुलनामुळे जीवाची घालमेल असह्य होईल.
कुंभ मासिक राशिभविष्य जून (Aquarius Monthly Horoscope for June 2025)
नियोजित कामे मनाजोगती पूर्ण कराल. नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक अशा अनेकांचे सहाय्य मिळेल. विद्यार्थी वर्ग नव्या क्षेत्रात पदार्पण करेल. उत्साहाने नवे विषय आत्मसात कराल. गुरुबल चांगले आहे. नोकरी व्यवसायात आपल्या मतांना मान मिळेल. त्याबद्दल विचारविनिमय, चर्चा होऊन ती अमलात आणली जातील. वटपौर्णिमा लाभकारक वार्ता घेऊन येईल. विवाहोत्सुकांनी जोडीदार शोधणे मनावर घ्यावे. विवाहित दाम्पत्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडतील. नातीगोती जपणे आणि संबंध वृद्धिंगत करणे यासाठी ग्रहमान सहाय्यकरी आहे. जमिनीच्या व्यवहारात कोणत्याही प्रकारची हयगय वा हलगर्जीपणा नको. थोडा अधिक वेळ लागला तरी चालेल. गुंतवणूकदारांच्या नफ्याचा आलेख वरवर जाईल. कामाच्या व्यापामुळे मानसिक तणाव जाणवेल.
मीन मासिक राशिभविष्य जून (Pisces Monthly Horoscope for June 2025)
अनुभव हा आपला सर्वोत्तम गुरू असतो या न्यायाने हा महिना आपणास अनेक धडे देणार आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतील. भोवतालची प्रलोभने अधिक प्रभावी ठरतील. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे एकाग्रता वाढवाल. नोकरी व्यवसायात महत्त्वाचे बदल घडतील. सहकारी वर्गाकडून फारशा सहकार्याची अपेक्षा ठेवू नका. स्वतःहून घेतलेली जबाबदारी हिमतीने पूर्ण करून दाखवाल. वटपौर्णिमा भाग्यकारक बातमी देईल. संधीचे सोने करणे आपल्या हातात असेल. घर, इस्टेट यांबाबत निर्णय घेताना ठाम राहणे गरजेचे आहे. मनाची द्विधा स्थिती होऊन चालणार नाही. गुंतवणूकदारांनी आधीच्या अनुभवातून शहाणे व्हावे. न झेपणारी जोखीम टाळा. संमिश्र हवामान व वायुप्रदूषणामुळे उष्णतेचे, श्वसनाचे त्रास बळावतील.
तर १२ राशींचा जून महिना असा असणार आहे…