scorecardresearch

Premium

Aries Yearly Horoscope 2023: मेष राशीला धनलाभ कधी होणार? सोनल चितळेंकडून जाणून घ्या १२ महिन्यांचे राशीभविष्य

Mesh Rashi Bhavishya 2023: १७ जानेवारीला शनी आपल्या लाभ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचे हे महत्वपूर्ण राशी संक्रमण आपल्याला लाभदायक ठरेल.

Aries Yearly Horoscope 2023 in Marathi
मेष वार्षिक राशीभविष्य २०२३ (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Aries Yearly Horoscope 2023 Predictions in Marathi: सर्व वाचकांना २०२३ या नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! हे नवे वर्ष 12 राशींना कसे असेल, काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या प्रकारची कामे मार्गी लागतील, महत्वाचे निर्णय घेण्यासाठी वर्षातला कोणता काळ योग्य असेल या सगळ्या बाबतची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. ज्योतिष शास्त्रातील पारंपरिक अभ्यास पद्धतीनुसार आपल्या जन्मवेळी आकाशातील चंद्र ज्या राशीत असतो ती आपली ‘चंद्ररास’ किंवा ‘रास’ असते. अशा १२ राशींना पुढील वर्ष २०२३ कसे असेल ते पाहूया.

मेष वार्षिक राशिभविष्य (Aries Yearly Horoscope 2023)

मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे. मंगळ हा भरपूर ऊर्जा असलेला ग्रह आहे. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये देखील खूप ऊर्जा असते, उत्साह असतो. कामे रेंगाळत करण्यापेक्षा झटपट उरकणे त्यांना आवडते. मनात असेल ते स्पष्टपणे बोलणे त्यांना सहज जमते. मनाविरुद्ध तडजोड करताना मात्र त्यांना फारच त्रास होतो, ते त्यांना अवघड जाते. नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची त्यांची कायम तयारी असते. कामातला तोच तोच पणा त्यांना अगदी कंटाळवाणा वाटतो. अशा या मेष राशीच्या मंडळींना २०२३ हे वर्ष कसे असेल ते पाहू.

Pitru Paksh Ashtami Sarvarth Siddhi Shiv Yog On 6th and 8th october Mahalakshmi To Give Five Rashi More Money Health Astro
पितृपक्ष अष्टमीला सर्वार्थ सिद्धी योग! ‘या’ 5 राशींना लाभणार पूर्वजांची कृपा; प्रचंड श्रीमंतीसह दार ठोठावणार लक्ष्मी
swara bhaskar
“माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण काम…”; स्वरा भास्करने शेअर केला प्रसूतीदरम्यानचा अनुभव; म्हणाली, “पिढ्यान् पिढ्या बायका..”
Daily Horoscope 2 october 2023
Daily Horoscope: आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘या’ राशीच्या व्यक्तींना जोडीदाराचा सहवास लाभणार, पाहा तुमचे भविष्य
Akshara Mangalsutra
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये रंगणार राजेशाही विवाह सोहळा, अक्षराने घातलेल्या मंगळसूत्राच्या डिझाईनने वेधलं लक्ष

यंदा संपूर्ण वर्षभर हर्षल आपल्या मेष राशीतच आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत* हर्षलसह राहू देखील आपल्या राशीत स्थित असणार आहे. बरेचसे निर्णय शांत डोक्याने घ्यावे लागतील. एखाद्या गोष्टीचा पुनर्विचार देखील करावा लागेल. २१ एप्रिलपर्यंत* गुरू मीन राशीत आहे. तोपर्यंत आपणास गुरुबल कमजोर असेल. या कालावधीत धाडसी निर्णय घेऊ नये. २१ एप्रिलला* गुरू मेष राशीत प्रवेश करेल. तेव्हा आपल्याला गुरूबल प्राप्त होईल. अडलेली कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. प्रयत्नांना यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. 17 जानेवारीपासून* शनी आपल्या लाभ स्थानातील कुंभ राशीतून भ्रमण करणार आहे. तत्परतेसोबत सबुरी आवश्यक आहे याचे धडे मिळतील, अधीरता टाळावी. धीराने घ्यावे. या अशा महत्वाच्या ग्रह बदलांसह इतर सर्व ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता एकंदरीत मेष राशीचे वार्षिक ग्रहफल असे आहे…

जानेवारी :

गुरू, शुक्राच्या लाभ योगामुळे मेहनत घेतल्यास आणि चिकाटी ठेवल्यास महत्त्वाच्या कामात यश मिळेल. प्रगतीपथावर आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. १७ जानेवारीला शनी आपल्या लाभ स्थानातील कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनीचे हे महत्वपूर्ण राशी संक्रमण आपल्याला लाभदायक ठरेल. भाग्यातील आणि दशम स्थानातील रवी आपल्या कर्तृत्वाची पोचपावती देईल. नवे संकल्प तडीस नेण्यासाठी आरंभशूरपणा कामी येणार नाही. सातत्य राखणे फार गरजेचे ठरेल. वरिष्ठ मंडळींशी संवाद साधताना शब्द सांभाळून वापरावेत.

फेब्रुवारी :

व्यायाम आणि आहार याकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासेल. विद्यार्थीवर्गाला अभ्यासक्रमातील कठीण भाग तज्ज्ञांकडून समजून घ्यावा लागेल. कंबर कसून अभ्यासाला लागावे. व्ययस्थानातील उच्चीचा शुक्र खर्चाचे प्रमाण वाढेल. रवी मंगळाचा शुभ योग नोकरी व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. कामातील अडचणींवर मात करण्यासाठी वरिष्ठांची साथ मिळेल. सातत्यपूर्ण प्रयत्न महत्वाचे ! शिक्षण वा कामानिमित्त प्रवास योग येतील. मित्र मंडळी नातेवाईक यांची मदत कराल.

मार्च :

व्यवसाय, उद्योगात कोणालाही शब्द देताना विचारपूर्वक द्यावा. न झेपणारे वायदे करू नका. ताण तणाव वाढेल. तृतीय स्थानातील मंगळाचे भ्रमण आत्मविश्वास वाढवेल. कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर मात्र करू नका. मेष राशीतील शुक्र प्रलोभनांना बळी पाडू शकतो. सावधान!, अभ्यासावर लक्ष ठेवा. पचन सांभाळा. हवामानातील बदलाचा परिमाण आरोग्यावर दिसून येईल. रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवावे. कामाच्या ठिकाणी नव्या संकल्पना आणण्याचा विचार कराल.

एप्रिल :

२१ एप्रिलला गुरू आपल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. स्पर्धा परीक्षा देण्याची तयारी करत असाल तर २१ एप्रिलनंतर यश मिळण्याच्या शक्यता अधिक दाट होत आहेत. शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा योग चांगला आहे. संबंधित कामे मार्गी लागतील. शनी आणि गुरू या ग्रहांची साथ चांगली मिळेल. अधिक मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करावी. कामाच्या ठिकाणी आपला प्रामाणिकपणा आणि मेहनत यामुळे अडचणीतून मार्ग निघेल. अन्याय निदर्शनास आणून द्याल. कामाची पोचपावती नक्की मिळेल. आर्थिकदृष्टय़ा उत्कर्ष होईल.

मे :

रवी आपल्या मेष राशीत उच्च स्थितीत आहे. परंतु रावीसह राहू आणि हर्षलदेखील असल्याने कोणताही निर्णय घेताना दोन वेळा विचार करावा. नीच राशीचा मंगळ चतुर्थात आहे. मानसिक स्थिती दोलायमान होईल. शुक्र शनीच्या शुभ योगामुळे कामानिमित्त प्रवास कराल. कामातील नव्या संकल्पना राबवण्यापूर्वी मार्केट संशोधन उपयोगी ठरेल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधू-वर संशोधन मनावर घ्यावे. योग्य जोडीदाराची निवड करण्यास चांगले ग्रहबल मिळेल. रक्तदाब सांभाळावा. उष्माघातामुळे चक्कर येणे, ग्लानी येणे संभवते.

जून :

रवी शनीच्या शुभ योगामुळे मेहनत फळास येईल. प्रसिद्धी मिळेल. आपले विचार इतरांपुढे प्रभावीपणे मांडाल. कुटुंबात प्रेमाचे ,सलोख्याचे संबंध निर्माण होतील. जुने वाद संपुष्टात येतील. आर्थिक नियोजन करताना भविष्य काळातील तरतुदीचा देखील विचार करावा. अल्प काळात भरपूर पैसा मिळवण्याच्या पाठी लागू नका. जोडीदारासह जुळवून घेण्याची जबाबदारी आपली असेल. पडझड होणे , मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांना गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल.

जुलै :

शनी मंगळाचा प्रतियोग धरसोड वृत्तीला खतपाणी घालणारा योग आहे. परंतु यामुळे हातची संधी हुकवून चालणार नाही. विचारांना शिस्त लावावी. वेळेचा अपव्यय महागात पडेल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणे एकाग्रतेने काम करावे. अतिरिक्त आत्मविश्वास उपयोगाचा नाही. संतान प्राप्तीसाठी जरूर प्रयत्न करावेत. वैद्यकीय सल्ला आणि उपाय कामी येतील. महत्वाच्या कागदपत्रांची विशेष काळजी घ्यावी. हलगर्जीपणा नको. कोर्टकचेरीची कामे हळूहळू मार्गी लागतील. पण पाठपुरावा सोडू नका.

ऑगस्ट :

मुलांसबंधी कामे मार्गी लागतील. कामातील उत्साह वाढेल. जोडीदाराच्या साथीने नवे नातेसंबंध जपाल. संभाव्य जोखीम पत्करूनच आर्थिक गुंतवणूक करावी. मोठी झेप नको. शिक्षणासाठी परदेशगमन योग येईल. त्यासाठीच्या कार्यालयीन आवश्यक गोष्टी वेळेवर पूर्ण होतील. अडचणी दूर करत पुढे जाल. पित्त होणे, पोट बिघडणे असे त्रास वरचेवर होण्याच्या शक्यता आहेत. सद्यस्थिती स्वीकारून पुढील निर्णय घ्यावेत. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना त्याचा भविष्यात किती लाभ होईल किंवा नाही याचा विचार आधीच करावा.

सप्टेंबर :

वाहन खरेदीचे चांगले योग आहेत. वैयक्तिक आवडीनिवडी जपण्यासाठी खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरी व्यवसायात मनाविरुद्ध घटना घडतील. त्रागा न करता त्यामागची कारणमीमांसा जाणून घ्यावी. सतत तणावाखाली राहणे आरोग्यदृष्ट्या चांगले नाही. रक्तदाबावर नियंत्रण ठेवावे. संततीप्राप्तीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. विवाह जमण्यास अनुकूल कालावधी आहे. परदेशासंबंधित करार होतील. गृहसौख्य मिळेल. प्रियजनांच्या भेटीगाठी झाल्याने उत्साह वाढेल. वरिष्ठांकडून साहाय्य मिळेल. नव्या संलग्न क्षेत्रातही काम करण्याचा विचार कराल.

ऑक्टोबर :

विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांच्या न पटणाऱ्या मुद्द्यांवर वाद टाळावा. काही ‘गोष्टी जशा आहेत तशा’ स्वीकारणे लाभकारक ठरेल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीचे फळ चांगले मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी व्यवसायाशी निगडीत कामांना प्राधान्य दिल्याने प्रगतीचा वेग वाढेल. नव्या ओळखीतून फायदा होईल. उच्चपद भूषवाल. जबाबदाऱ्या पार पाडताना हलगर्जीपणा नसावा. श्वसन आणि रक्ताभिसरण या संबंधात त्रास उदभवण्याची शक्यता आहे. प्राणायामाचा सराव उपयोगी पडेल.

नोव्हेंबर :

नातेवाईक , भावंडे , मित्र मंडळी यांची मदत करण्याची संधी मिळेल. सप्तमतील रवी, मंगळ, केतू विचारांमध्ये चंचलता आणतील. एखादा निर्णय पक्का करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. डोकं शांत ठेवावे. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने विशेष सावधगिरी बाळगावी. प्रतिस्पर्धी परिस्थितीचा लाभ उठवतील. प्रवास करताना मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात. मुलांच्या समस्या सोडवताना त्यांच्या भावनिक स्थितीचा विचार करावा. सगळेच प्रश्न झटपट सुटत नाहीत हे ध्यानात असावे. उत्सर्जन संस्थेची काळजी घ्यावी.

डिसेंबर :

विवाहीत दाम्पत्यांना वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. एकमेकांना समजून घ्याल. दोघांनी एकमेकांचे स्वातंत्र्य जपावे. जी अपेक्षा दुसऱ्याकडून करतो तीच आणि तशी अपेक्षा दुसरा देखील आपल्याकडून करत असेल असा विचार करावा. आपल्या राशीतील गुरू हर्षल अविचाराने पाऊल पुढे टाकण्यास भर घालतील परंतु शनीच्या योगामुळे संयम बाळगू शकाल. संतानप्राप्तीसाठीचे प्रयत्न यशस्वी ठरतील. वैद्यकीय उपचार वा सल्ला लाभदायक ठरेल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील.

२०२३ या वर्षात आपल्या मित्रांच्या भेटीगाठी वा संपर्क होत राहील. त्यांना आपण या ना त्या स्वरूपात मदत करू शकाल. विविध क्षेत्रातील ओळखीच्या लोकांकडून मित्रपरिवाराला फायदा करून द्याल. त्याच प्रमाणे आपल्या गरजेला मित्र-मैत्रिणी धावून येतील. नातेवाईक तसेच भावंडांची मदत करताना मानसिक समाधान मिळेल. न पटणाऱ्या गोष्टीत आपण फारसा रस दाखवणार नाही. राहत्या घरापासून लांब किंवा गावच्या ठिकाणी जागेमध्ये पैसे गुंतवाल. कागदपत्रांची शहानिशा आणि खातरजमा करणे फार गरजेचे आहे. २१ एप्रिलच्या आत हे योग येतील. आर्थिक गुंतवणुकीच्या दृष्टीने हे वर्ष मध्यम असेल. लाभाचा आलेख मे, जून, जुलै मध्ये उच्च पातळीवर जाईल. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये नीच पातळीवर जाईल. संभाव्य जोखीम पत्करावी लागेलच. शिक्षण वा कामकाजनिमित्त परदेशगमन योग देणारे हे वर्ष आहे. गप्प बसणे हा आपला पिंड नसला तरी गृहसौख्य आणि गृहशांती राखण्यासाठी स्वभावास मुरड घालावी. आरोग्याच्या दृष्टीने एकंदरीत वर्ष चांगले जाईल. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार टाळलात , डोकं शांत ठेवलेत तर हे वर्ष आपल्यासाठी सुखकर असेल.

-सोनल चितळे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aries yearly horoscope 2023 predictions mesh rashi bhavishya in marathi svs

First published on: 10-01-2023 at 09:59 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×