Shardiya Navratri 2025: यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून, संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते, तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते.

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या पूजा-आराधनेसह काही नियमांचे पालन करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यापाठी राहील.

नवरात्रीत ‘या’ चुका टाळा

घर बंद ठेऊ नये

नवरात्रीच्या दिवसांत तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेऊ नका, घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवे.

लहान मुलींवर चिडू नका

हिंदू धर्मामध्ये लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे नवरात्रीच्या काळात लहान मुलींचे मन दुखवू नका. शिवाय फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा.

कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये

नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये, कारण यामुळे मनामध्ये तामसिक विचार येतात, जे देवीच्या पूजा-आराधनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.

केस आणि नखे कापू नये

नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये असे म्हटले जाते.

वादविवादापासून दूर राहा

नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये, कारण जिथे सतत कलह असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.