Mars Mercury Conjunction 2025: आजचा दिवस काही राशींकरिता खास ठरण्याची शक्यता आहे. कारण- मंगळ आणि बुध या दोन ग्रहांची युती आजपासून वृश्चिक राशीत सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही एक महत्त्वाची ग्रहस्थिती मानली जाते. कारण- त्यामुळे ‘रुचक राजयोग’ तयार होतो. हा योग त्या वेळी निर्माण होतो, जेव्हा मंगळ आपल्या स्वतःच्या राशीत म्हणजेच वृश्चिक राशीत प्रवेश करतो. त्याच वेळी बुधही वृश्चिक राशीत स्थिरावलेला असल्याने दोन्ही ग्रहांची एकत्रित ऊर्जा निर्माण होणार आहे.
मंगळ हा ग्रह ऊर्जा, पराक्रम व जोश यांचा कारक मानला जातो; तर बुध बुद्धिमत्ता, संवादकौशल्य b विवेक यांचा अधिपती आहे. त्यामुळे या दोघांच्या युतीमुळे शक्ती आणि बुद्धी यांचा अदभुत संगम घडणार आहे. काही राशींना याचा परिणाम पुढील काही आठवड्यांत सकारात्मक दिशेने जाणवू शकतो. या युतीचा प्रभाव २३ नोव्हेंबरपर्यंत राहणार असल्याचं ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. चला जाणून घेऊया, कोणत्या राशींना या काळात अनुकूल ग्रहस्थिती मिळू शकते.
वृषभ (Taurus)
हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी ठरू शकतो. गेल्या काही काळापासून जी मेहनत घेतली होती, तिचं फळ आता मिळू शकतं. ऑफिसमध्ये तुमच्या निर्णयशक्तीला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प किंवा काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे. करिअरमध्ये उंची गाठण्याचे संकेत दिसू शकतात. व्यावसायिकांना नवीन संधी मिळू शकते. कुटुंबासोबतचे संबंध अधिक जिव्हाळ्याचे होतील आणि आत्मविश्वास वाढेल, असा अंदाज आहे.
मिथुन (Gemini)
मंगळ-बुध युती मिथुन राशीच्या मंडळींसाठी नवा उत्साह घेऊन येऊ शकते. या काळात तुमच्या विचारशक्ती आणि निर्णयक्षमतेत वाढ झाल्याचे जाणवू शकते. कामातील वेग आणि लक्ष्यावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. नेतृत्वगुणांना उजाळा मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा सहकार्यभाव आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठी हा काळ नवीन ‘डील्स’ मिळविण्याचा असू शकतो. वैवाहिक जीवनातही मधुरता वाढण्याची शक्यता दिसते.
धनू (Sagittarius)
ही युती धनू राशीसाठी ऊर्जादायी ठरू शकते. कार्यक्षेत्रात काही नवे बदल, नवी जबाबदारी किंवा नवा प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. ही अतिरिक्त जबाबदारी पुढे जाऊन तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते. या काळात तुमच्या योजनांमुळे इतरांनाही फायदा होऊ शकतो. नोकरीत बदल किंवा बदली होण्याची शक्यता दिसते. व्यवसाय करणाऱ्यांना नफा वाढण्याची संधी मिळू शकते. काही जणांना गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचीही शक्यता आहे.
एकंदरीत पाहता, मंगळ-बुध युतीमुळे अनेकांची ऊर्जा, आत्मविश्वास व निर्णयशक्ती वाढण्याची शक्यता आहे. काहींसाठी हा करिअरमधील प्रगतीचा काळ असू शकतो; तर काहींना वैयक्तिक आयुष्यात आनंद मिळू शकतो. मात्र, या काळात उतावळेपणा न करता, विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल.
ज्योतिषशास्त्र सांगते की, ग्रहांची हालचाल ही फक्त शक्यता दाखवते; निश्चित परिणाम नाही. त्यामुळे स्वतःचे प्रयत्न आणि योग्य निर्णय यांवरच यश अवलंबून आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
