प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कधी ना कधी अडचणींचा काळ येतो, यावेळी खचून न जाता काही जण आपल्या परीने संकटांना सामोरे जातात. बरेच लोक अगदी सहज ही संकटं हाताळतात; पण बरेच जण घाबरतात. पण जे लोक संकटांचा सामना करू शकत नाहीत आणि संकटांना सामोरे जाण्यास जे असमर्थ ठरतात, त्यांच्यासाठी आचार्य चाणक्य यांच्या पाच गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

आयुष्यात अचानक संकटं आली तर विवेकबुद्धी काम करीत नाही, या कारणामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. त्यावर आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत; ज्या प्रत्येक व्यक्तीला कठीण काळात उपयोगी पडतात. व्यक्तीने संकटाच्या वेळी काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, याची माहिती जाणून घेऊ …

ठोस धोरण तयार करा

कोणतीही व्यक्ती जेव्हा संकटाच्या फेऱ्यात अडकते तेव्हा त्या व्यक्तीला ठोस धोरण ठरवण्याची गरज असते. कारण- जेव्हा तुमच्याकडे संकटातून बाहेर पडण्यासाठी ठोस धोरण तयार असते तेव्हा तो काळ अगदी सहज हाताळला जातो. यावेळी व्यक्ती टप्प्याटप्प्याने काम करते.

पूर्वतयारी ठेवा

आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अचानक संकटं येतात तेव्हा खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण- संकटाच्या वेळी काही लोकांना आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पुरेशा संधी किंवा कोणतेही साधन नसते. म्हणून तुम्ही कोणत्याही संकटाच्या आधी पूर्वतयारी ठेवली पाहिजे. कारण- तुमच्या एका चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे संकटांसाठी आगाऊ काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

संयम ठेवा

चाणक्य यांच्या मते, व्यक्तीने प्रतिकूल परिस्थितीत कधीही संयम बाळगावा आणि आपली विचारसरणी नेहमी सकारात्मक ठेवली पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे परिस्थिती कशीही असो; अशा वेळी संयम न सोडता शांतपणे तुमची चांगली वेळ येण्याची वाट पाहा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या

चाणक्य नीतीनुसार, संकटसमयी कुटुंबाप्रति जबाबदारी पार पाडणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती ओढवते तेव्हा तेव्हा सर्वप्रथम आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या. संकटाच्या वेळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना आधार द्यावा.

पैशांची बचत करण्याचा प्रयत्न करा

व्यक्तीने नेहमी पैशाची बचत केली पाहिजे. संकटकाळात पैसा हा तुम्हाला कामाला येतो. ज्या व्यक्तीला संकटाच्या वेळी पैशांची कमतरता भासते, त्याला संकटातून बाहेर पडणे खूप कठीण होऊन बसते.