Chanakya Niti On Unsuccessful People : आचार्य चाणक्य हे महान मुत्सुद्दी होते. त्यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य असेही म्हटले जात होते. मौर्य साम्राज्याच्या विस्तारात आचार्य चाणक्य यांनी फार महत्वाची भूमिका निभावली होती, तसेच चाणक्य यांचे अखंड भारताच्या उभारणीतही मोलाचे योगदान होते. विशेष म्हणजे त्यांचे विचार आजच्या परिस्थितीला तितकेच समर्पक आहेत. त्यांच्या नीतीशास्त्राचे पालन करून कोणतीही व्यक्ती जीवनात यशस्वी होऊ शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते, चार प्रकारचे लोक आयुष्यभर दु:खी राहतात. असे लोक आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत. त्यामुळे या चार प्रकारच्या लोकांबद्दल सविस्तर जाणून घेऊ या-
१) कर्जबाजारी वडील
आचार्य चाणक्य त्यांच्या नीतीशास्त्रानुसार, कर्जबाजारी वडील हे आपल्या मुलाचे शत्रू असतात. कर्जामुळे अशी व्यक्ती आयुष्यात कधीही श्रीमंत होत नाही आणि नेहमी दुःखीच राहते. तो व्यक्ती वडिलांच्या कर्जाखाली दबला जातो. त्यामुळे मुलाची आर्थिक परिस्थितीही हलाखीची राहते. कारण वडिलांचे कर्ज मुलाला फेडावे लागते.
२) असभ्य आई
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्या आईचे वर्तन खूप वाईट असते, ती देखील आपल्या मुलाची शत्रू असते. कारण आईचे विचार आणि वागणुकीचा कुटुंबाच्या सन्मानावर आणि प्रतिष्ठेवर विपरित परिणाम होत असतो. अनेक प्रसंगी पिता-पुत्रांनाही कलंकाला सामोरे जावे लागते. असे लोकही आयुष्यभर दुःखी राहतात.
३) सुंदर पत्नी
आचार्य चाणक्य यांच्या मते, सुंदर पत्नीदेखील शत्रूसारखी असते. माता जानकी अत्यंत सुंदर असल्याने तिचे अपहरण करण्यात आले. यासाठी भगवान श्रीरामांना वनवासात वियोग सहन करावा लागला. जे लोक सुंदर बायका करतात (अनेक प्रसंगी) ते आयुष्यभर दुःखी राहतात.
४) नालायक मुलगा
आचार्य चाणक्य यांच्या मते, एक नालायक मुलगा म्हणजेच मूल हा आपल्या आई-वडिलांचा शत्रू असतो. तो स्वतः त्याच्या कृत्याने त्रासलेला असतो, पण तो त्याच्या वागण्यामुळे आपल्या पालकांनाही आयुष्यभर दु:खी करतो. असे लोक आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत.