Dhanteras Buying Tips: धनत्रयोदशी हा सण दरवर्षी कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान धन्वंतरि आणि कुबेर यांची पूजा करण्याला विशेष महत्त्व असते. असे मानले जाते की या दिवशी नवी वस्तू खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि धन वाढते. पण ज्योतिष शास्त्रानुसार काही वस्तू अशा असतात की त्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास शनीदेव नाराज होतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आर्थिक अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. म्हणूनच पाहूया अशा ५ वस्तू कोणत्या आहेत ज्या या दिवशी खरेदी करू नयेत.
लोखंडाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू जसे की भांडी, साधनं किंवा फर्निचर वगैरे खरेदी करणे अशुभ मानले जाते. ज्योतिषानुसार लोखंड हे शनी ग्रहाचे धातू आहे आणि या दिवशी ते खरेदी केल्यास शनीदेव रागावू शकतात. त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा, विलंब आणि अडथळे निर्माण होऊ शकतात.
काळ्या रंगाचे कपडे
धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे किंवा कोणतीही काळ्या रंगाची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही. काळा रंग शनीदेवाशी संबंधित आहे आणि या दिवशी या रंगाच्या वस्तू घेतल्यास शनीदेव रागावू शकतात. त्याऐवजी लाल, पिवळा किंवा सोनेरी रंगाच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
काच किंवा तुटलेल्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काच, आरसा किंवा कोणतीही तुटकी वस्तू खरेदी करणे टाळावे असे मानले जाते. अशा वस्तूंमुळे घरात नकारात्मकता आणि दारिद्र्य येते असे मानले जाते. यामुळे शनीदेवांसोबतच देवी लक्ष्मीही नाराज होऊ शकतात.
झाडू किंवा जुनं सामान
या दिवशी नवीन झाडू किंवा जुनी वस्तू खरेदी-विक्री करणे टाळावे. झाडूचा संबंध घराची स्वच्छता आणि लक्ष्मीच्या आगमनाशी जोडला जातो, पण धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी झाडू खरेदी केल्यास शुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. आणि ते अशुभ मानले जाते. त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता वाढते. याऐवजी दिवसा झाडू खरेदी करावी. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात झाडू मारणे टाळा, कारण असे केल्याने लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते.
अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी
धनत्रयोदशीच्या दिवशी चांदी, तांबे किंवा पितळेची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते, पण अॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी खरेदी करणे टाळावे. या धातूंचा संबंध शनी ग्रहाशी मानला जातो आणि त्यांची खरेदी केल्यास शनीचा प्रतिकूल परिणाम वाढू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)