Govardhan Puja 2025: पाच दिवसाच्या दीपावली महापर्वात चौथ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या तिथीला गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे. या तिथीला अन्नकूट नावानेही ओळखले जाते. कारण त्या दिवशी अन्नकूटाचा नैवेद्य दाखवला जातो.
गोवर्धन पूजा लक्ष्मीपूजनानंतर केली जाते. ही निसर्गाची पूजा असते. तिची सुरूवात भगवान श्रीकृष्णांनी केली होती. या दिवशी समाजाचा आधार अशा रूपात गाईची पूजा केली जाते. या पूजेची सुरूवात ब्रजमध्ये झाली होत आणि हळूहळू संपूर्ण भारतात पसरली. हा सण मथुरा, वृदांवन, गुजरात आणि राजस्थानमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. गोवर्धन पर्वत भगवान श्री कृष्णांनी आपल्या करंगळीवर उचलून इंद्रदेवाचा अहंकार दूर केला होता. गोवर्धन पूजेला अन्नकूट असेही म्हटले जाते. कारण या दिवशी देवाला छप्पन नैवेद्य किंवा मसूर, तांदूळ, मिठाई, फळे आणि भाज्या असे ५६ प्रकारचे पदार्थ अर्पण केले जातात. हे नैवेद्य देवाबद्दल कृतज्ञता आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. यावर्षी हा सण २२ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरा केला जाईल.
कधी आहे गोवर्धन पूजा?
पंचांगानुसार, गोवर्धन पूजेची प्रतिपदा तिथी २१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांनी सुरू होईल आणि ती तिथी २२ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी संपेल.
दृक पंचांगानुसार, गोवर्धन पूजेचा पहिला शुभ मुहूर्त २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून २६ मिनिटांपासून ते ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. दुसरा शुभ मुहूर्त दुपारी ३ वाजून २९ मिनिटांपासून सुरू होईल आणि ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी ३:२९ ते ५:४४ पर्यंत असेल.
गोवर्धन पूजा कशी करावी?
या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचे घर आणि अंगण स्वच्छ करा. नंतर शेण वापरून गोवर्धन पर्वतासारखा एक छोटा पर्वत तयार करा किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही धान्य वापरूनदेखील एक पर्वत तयार करू शकता. त्याभोवती वासरू आणि दुधाळाच्या मूर्ती ठेवा. तसंच दिवे, फुले आणि अन्न अर्पण करा. पूजा केल्यानंतर गोवर्धनाच्या प्रदक्षिणा घाला.
या दिवशी गाई आणि वासरांचीही पूजा केली जाते. त्यांना गूळ आणि चारा खाऊ घाला. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी येते तसंच मुलांचे वर्तन सुधारते. नैराश्य किंवा चिंताग्रस्त लोकांसाठी गाईची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. पूजा केल्यानंतर देवतेला छप्पन नैवेद्य अर्पण करा आणि ते ब्राम्हण, गरीब आणि तुम्ही कुटुंबियांमध्ये वाटा. यामुळे घरात समृद्धी वाढते. तसंच या दिवशी दिवे लावा.
गोवर्धन पूजेमागे पौराणिक कथा
विष्णू पुराणात गोवर्धन पूजेचे महत्त्व वर्णन केले आहे. देवांचा राजा इंद्र आपल्या शक्तींचा अभिमान बाळगू लागला होता आणि भगवान श्री कृष्णाने इंद्राचा अहंकार मोडून काढण्यासाठी एक दैवी कृती केली. या कथेनुसार, एकदा गोकुळात लोक विविध पदार्थ बनवत होते आणि आनंदाने गाणी गात होते. हे पाहून तरूण कृष्णाने आई यशोदेला विचारले की, “ते कोणत्या सणाची तयारी करत आहेत”. आई यशोदा म्हणाली की, “आम्ही देवांचा राजा इंद्रांची पूजा करत आहोत”. हे ऐकून कृष्णाने पुन्हा विचारले की, “आपण इंद्राची पूजा का करतो”. तेव्हा यशोदा म्हणाली की, “इंद्राच्या कृपेमुळेच चांगला पाऊस पडतो, अन्न तयार होते आणि आपल्या गाईंना चारा मिळतो”. यशोदेचे शब्द ऐकून कृष्ण म्हणाला, “जर असं असेल तर आपण गोवर्धन पर्वताची पूजा करावी. कारण आपल्या गायी तिथे चरतात आणि तिथली झाडे, वनस्पती पाऊस पाडतात”. श्री कृष्णाच्या सल्ल्यानुसार, गोकुळातील सर्व रहिवासी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.
हे पाहून इंद्र संतापले आणि त्यांनी या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुसळधार पाऊस पाडला. गोकुळातील रहिवासी या महाप्रलयाने घाबरले. या काळात कृष्णाने आपल्या दैवी शक्तींचे प्रदर्शन केले आणि गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीच्या बोटावर उचलले, मग सर्व गावकऱ्यांना त्या पर्वताखाली बोलावले. हे पाहून इंद्राने पाऊस वाढवला, मात्र सात दिवस सतत मुसळधार पाऊस पडत असूनही गोकुळात रहिवासी सुरक्षित राहिले. त्यानंतर इंद्राला समजले की, त्याला आव्हान देणारा व्यक्ती सामान्य असू शकत नाही. आपण भगवान श्री कृष्णांच्या समोर आहोत हे लक्षात आल्यावर इंद्राने भगवान श्री कृष्णांची माफी मागितली. त्यानंतर त्यांची पूजाही केली. या पौराणिक घटनेने गोवर्धन पूजेच्या प्रथेची सुरूवात झाली.