Gudhi padwa sadetin muhurt : कोणतेही शुभ काम करायचे असेल तर आपण प्रथम मुहूर्त पाहतो. हिंदू धर्मामध्ये मुहूर्त पाहणे आणि कोणतेही काम त्या शुभ मुहूर्तांवर करण्यास खूप महत्त्व दिले जाते. अगदी घर, गाडी, सोने यांसारख्या महागड्या वस्तूंची खरेदी करणे असेल किंवा साखरपुडा, लग्न, पूजा यांसारखी मोठी आणि अत्यंत महत्त्वाची अशी शुभ कार्य असली की सगळ्यात मुहूर्त पाहिले जातात. त्या मुहूर्तांमध्ये जो सर्वात शुभ असतो, त्याची आपण निवड करतो. मात्र, काही दिवस असे असतात, ज्यासाठी मुहूर्त पाहण्याची अजिबात गरज नसते.

त्या दिवशी तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकतात असे दिवस हे साडेतीन मुहूर्तांमध्ये मोडतात. यंदाचा गुढीपाडवा हा ९ एप्रिलला आहे. या दिवशी अनेक जण सोने खरेदी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करतात. घरात पूजा करतात. मात्र, त्या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. याचे कारण म्हणजे, गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकीच एक आहे. मात्र, गुढीपाडवा सोडल्यास अजून मुहूर्त कोणते ते पाहू.

हेही वाचा : ८ एप्रिल पंचांग: सूर्यग्रहणाला तुमच्या राशीच्या कुंडलीत आनंद की निराशा, १२ राशींना वर्षाचा शेवटचा दिवस कसा जाईल?

तर यामध्ये गुढीपाडव्यासह, १० मे रोजी येणारी अक्षय्य तृतीया, १२ ऑक्टोबर रोजी येणारा दसरा, आणि २ नोव्हेंबर रोजी येणारा दिवाळी पाडवा / बलिप्रतिपदा हे सर्व दिवस साडेतीन मुहूर्तांमध्ये गणले जातात. खरंतर आपण कायम यांना साडेतीन मुहूर्त असे म्हणत असलो तरीही ते एकूण चार आहेत.

या एकूण चार मुहूर्तांपैकी आपल्यापैकी काही जण अक्षय्य तृतीयेला अर्धा मुहूर्त मानतात, तर काही जण दिवाळी पाडव्याला अर्धा मुहूर्त मानतात. असे असले तरीही दिवाळी पाडव्याला नवीन संवत् सुरू होत असल्याने त्याला पूर्ण मुहूर्त मानून अक्षय्य तृतीयेला अर्धा मुहूर्त मानणं योग्य ठरतं, अशी माहिती दा. कृ. सोमण यांनी लोकसत्ताला दिलेल्या एका जुन्या माहितीवरून समजते.