Hartalika Vrat 2025 Date Time Shubha Muhurat Puja Vidhi: हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात. असं म्हणतात की, या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती. त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा-आराधना करतात. यंदा २६ ऑगस्ट २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाईल. चला तर मग जाणून घेऊया हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी.
हरतालिका तिथी
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होणार असून, ही तिथी २६ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असेल. उदय तिथीनुसार, मंगळवारी, २६ ऑगस्ट २०२५ रोजी हे व्रत साजरे केले जाईल.
हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त
पहाटे ५ वाजून ५६ मिनिटांपासून ते सकाळी ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कालावधी दोन तास ३५ मिनिटांचा असेल.
हरतालिकेची पूजा कशी करावी?
या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान केले जाते. घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवांची पूजा केली जाते. त्यानंतर हरतालिकेच्या मूर्तीची आणि शिवलिंगाचीदेखील पूजा केली जाते. तसेच हरितालिका कथेचे पठण केले जाते आणि गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।। या मंत्राचा जप केला जातो.
हरतालिका व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावेत, अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते. पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला. ‘हर’ म्हणजे अपहरण करणे आणि ‘तालिका’ म्हणजे सखी, देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून, त्यांना जंगलामध्ये नेले होते, जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले. त्यामुळे या व्रताला ‘हरतालिका’, असे म्हटले जाते.
हे व्रत केल्याने विवाहित महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो, असे म्हटले जाते. हरतालिकेचे व्रत फक्त फळे खाऊन केले जाते. तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते. व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते.