Kitchen Vastu Dosh : स्वयंपाकघर हे घराचे हृदय मानले जाते, जिथून सकारात्मक ऊर्जा घरात पसरते. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, टापटीप ठेवणं गरजेचं असते. अन्यथा वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरात केलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळे नकारात्मकतेला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कुटुंबातील आनंद, आर्थिक सुबत्ता यांवर परिणाम होतो. घरात वादविवाद निर्माण होतात. त्यामुळे वास्तुशास्त्रातील नियमांनुसार स्वयंपाकघरात नेमक्या कोणत्या चुका टाळाव्यात ते जाणून घेऊ…
१) नळातून टपकणारे पाणी
वास्तुशास्त्रात गळणारा नळ अशुभ मानला जातो. त्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नाही, तर संपत्ती, सकारात्मक ऊर्जेवरही त्याचा परिणाम होतो. स्वयंपाकघरातील गळणारा नळ कुटुंबात आर्थिक समस्या आणि तणाव वाढवू शकतो. अशा वेळी नळ ताबडतोब दुरुस्त करून घ्या.
२) उलटी भांडी
स्वयंपाकघरात उलट्या ठेवलेल्या भांड्यांमुळे वास्तुदोष निर्माण होतो. कुटुंबात अशांतता, भांडणं आणि मानसिक ताण वाढू शकतो. वास्तुनियमानुसार, स्वयंपाकघरात जेवणाची भांडी नेहमी सरळ आणि व्यवस्थित ठेवावीत. वास्तुदोष टाळण्यासाठी स्वयंपाकघरात खूप पसारा करून
ठेवू नका.
३) घाण, अस्वच्छता
स्वयंपाकघरात कचरा किंवा घाण साचल्याने किंवा ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. त्यामुळे नकारात्मकता वाढते आणि कुटुंबाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. घाणेरड्या स्वयंपाकघरामुळे आर्थिक नुकसानदेखील होते. त्यामुळे वास्तुदोष टाळण्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ आणि हवेशीर ठेवा.
४) चुकीच्या दिशेने गॅस
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघरातील गॅस हे अग्नी तत्त्वाचे प्रतीक आहे. तो चुकीच्या दिशेने (ईशान्येकडे) ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे कुटुंबात ताण आणि आरोग्य समस्या येऊ शकतात. त्यामुळे गॅस नेहमी आग्नेय दिशेला ठेवा.
५) तुटलेली भांडी
तुटलेली किंवा फुटलेली भांडी वापरल्याने वास्तुदोष वाढू शकतो. त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते. घरातील सुख-समृद्धीत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे स्वयंपाकघरातून फुटलेली भांडी ताबडतोब काढून टाका आणि फक्त चांगली, स्वच्छ व मजबूत भांडी वापरा.
अशा प्रकारे तुम्ही वास्तुशास्त्रातील काही नियम पाळून तुमचे स्वयंपाकघर सकारात्मक ऊर्जेचे केंद्र बनवू शकता.