Kojagiri Purnima 2025 Importance: हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे खास महत्व आहे. अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हंटले जाते. धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने या पौर्णिमेला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते. कोजागरी पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असल्याने त्याची प्रकाश किरणं समस्त जीवसृष्टीकरता लाभदायक असल्याचे मानले जाते. तर कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. त्यामुळे यादिवशी चंद्रासह देवी लक्ष्मीची पूजा-आराधना करणं अत्यंत खास मानले जाते.

यंदा कोजागिरी पौर्णिमा कधी?

कोजागिरी पौर्णिमा तिथी प्रारंभ: ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून २४ मिनिटांनी सुरू होणार असून

कोजागिरी पौर्णिमा तिथी समाप्ती: ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांपर्यंत असेल.

६ ऑक्टोबर रोजी दिवसभर पौर्णिमा तिथी असल्याने या दिवशी कोजागिरी साजरी केली जाईल तसेच ६ ऑक्टोबरच्या रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा-देखील केली जाईल.

कोजागिरी पूजेचा शुभ मुहूर्त

कोजागिरीच्या रात्री ११ वाजून ४५ मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत लक्ष्मीचे पूजन करण्याचा शुभ मुहूर्त आहे. या शुभ मुहूर्तावर देवी नारयण आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर तूपाचा दिवा लावून श्रीसुक्ताचे पठण करावे. त्यानंतर चंद्राच्या प्रकाशात ठेवलेल्या दूधाचा नैवेद्य दाखवून त्या दूधाचे सेवन करावे.

कोजागिरी पौर्णिमेला चंद्रासह लक्ष्मीची पूजा का करावी?

कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून लक्ष्मी देवीचे पूजन करण्याच्या प्रथेमुळे याला कोजागरी पौर्णिमा असेही संबोधले जाते. काही ठिकाणी याला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कोजागरीला लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर उतरून ‘को जागर्ती’? असा प्रश्न विचारते, असे मानले जाते. त्यामुळे या पौर्णिमेला कोजागरी असे म्हणतात. भारतातील बहुतांश ठिकाणी शरद पौर्णिमेला लक्ष्मी नारायणाचे पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. या दिवशी देवी नारायणांसह गरुडावर आरुढ होऊन पृथ्वीतलावर येते. लक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक देवता स्वर्गातून पृथ्वी येतात. तसेच या दिवशी रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा प्रचलित आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)