Malavya Rajyoga 2025: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती आणि त्यांचे परिवर्तन माणसाच्या आयुष्यावर थेट परिणाम घडवतात. काही वेळा या ग्रहयोगांमुळे अनपेक्षित यश, कीर्ती, संपत्ती व भाग्याचा वरदहस्त लाभतो. असाच एक शुभ आणि प्रभावशाली मालव्य राजयोग या नोव्हेंबरमध्ये बनत आहे.
कधी आणि कसा बनतो हा राजयोग?
२ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह आपल्या उच्च राशी तूळमध्ये प्रवेश करणार आहे. ज्योतिषीय गणनेनुसार, जेव्हा शुक्र स्वतःच्या राशीत (वृषभ किंवा तूळ) किंवा मीन राशीच्या केंद्रस्थानात (प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम भावात) विराजमान होतो, तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. पंचमहापुरुष योगांपैकी हा एक अत्यंत शक्तिशाली योग मानला जातो. या योगामुळे व्यक्तीला रूप, सौंदर्य, वैभव, समाजात प्रतिष्ठा आणि आर्थिक सुख-समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता असते, असा उल्लेख प्राचीन ज्योतिष ग्रंथांमध्ये आढळतो.
या तीन राशींवर विशेष कृपा होण्याची शक्यता :
१. वृषभ (Taurus)
हा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ मानला जातो. सध्या ग्रहस्थिती अनुकूल होत असून, अडकलेली कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळ चालत असलेली आर्थिक अडचण दूर होऊ शकते. या काळात नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात. करिअरमध्ये उंच भरारी घेण्याचे संकेत आहेत. वैवाहिक जीवनात सौख्य आणि कुटुंबातील सौहार्दता वाढू शकते. काहींना प्रेमसंबंधांमध्येही सकारात्मक बदल जाणवू शकतो.
२. तूळ (Libra)
शुक्र आपल्या स्वतःच्या राशीत असल्याने तूळ राशीच्या लोकांवर या राजयोगाचा थेट परिणाम होऊ शकतो. नोकरी, व्यवसाय, कला किंवा ग्लॅमरसमय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ उल्लेखनीय ठरू शकतो. बढती, नवीन जबाबदाऱ्या किंवा उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जुने प्रलंबित निर्णय आता फलदायी ठरू शकतात. काहींना गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. समाजात सन्मान, प्रतिष्ठा व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्याचे संकेत आहेत.
३. धनू (Sagittarius)
मालव्य राजयोग धनू राशीच्या लोकांसाठी सामाजिक ओळख आणि प्रगतीचा काळ घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. काहींना परदेश प्रवासाची किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळू शकते. दीर्घकाळापासून येत असलेले अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो; तर नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या आणि मान्यता मिळण्याचे संकेत आहेत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
