उदयराज साने

Thackeray Brothers Horoscope Astrology : जवळपास २० वर्षांनंतर ५ जुलै २०२५ रोजी मुंबईच्या वरळी डोममध्ये मराठी भाषेचा विजयी मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याचनिमित्त महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सर्वाधिक प्रभावी असणारे ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. सत्ताधारी भाजपा, शिवसेना शिंदे गटाने टीका केलेली असली तरीही शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसेचे असंख्य कार्यकर्ते आणि मूळ शिवसेनेचे जुने शिवसैनिक यांच्यासाठी हा प्रसंग प्रचंड उत्साहाचा ठरला. मेळाव्यातील ठाकरे बंधूंच्या एकजुटीनंतर आता आगामी काळात महापालिका निवडणुकीत पुन्हा ही युती प्रत्यक्ष राजकारणात पाहायला मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर राज व उद्धव ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र आले. साहजिकच जेव्हा राजकारणात लहान व मोठा पक्ष एकत्र येतात. तेव्हा अनेक प्रश्नांची उत्तरे ते नव्याने शोधू लागतात. मनसे आणि शिवसेना (उबाठा) एकत्र आल्याने महाविकास आघाडीने प्रारंभी जरी मोठी प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसली तरीही महाविकास आघाडीच्या लोकांच्या (पक्षाच्या) पोटात दुखू लागले आहे. पण, खुद्द उद्धव यांनाच महाविकास आघाडीत राहणे अशक्य झाले होते, असा एक सूर लावला जातो, तो चुकीचा नाही ; असं त्यांच्या कुंडलीतून लक्षात येते.

कारण- महाराष्ट्रात आगामी काळात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांना एकत्र येऊन निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. या दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे रवी मंगळावरून होणाऱ्या गुरुभ्रमणाची प्रचिती राज ठाकरे यांच्या कुंडलीतून जशी मिळाली, तशी प्रचिती उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीतून मिळत नाही. शनी-मंगळ षडाष्टक आणि मंगळ-केतू युतीच्या पार्श्वभूमी वर हे एकीकरण झाल्याने उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीपासून थोडे लांब राहायला हवे होते, तसेच घडविण्यासाठी हा खेळ त्यांनी मांडला असावा.

तळागाळातून पक्ष निवडून आणण्यासाठी कमालीची मेहनत करावी लागणार आहे. महाविकास आघाडीला लोकसभेला चांगले यश मिळाले तरी विधानसभेला भीषण अशा पराभवाला सामोरे जावे लागेल. या झालेल्या मतदानोत्तर विश्लेषणातून एक गोष्ट समोर आली की, हिंदू मतांचे एकत्रीकरण या गोष्टीचा दबाव कदाचित ठाकरे बंधूंवर पडलेला असावा. त्यातूनच महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंची घुसमट होत असल्याचे दिसून येऊ लागले होते. आजचे चित्र हेच आहे की, मुस्लीम मतदार त्यांच्या पक्षाला किती मतदान करतील हा प्रश्नच आहे. कारण- महाराष्ट्राच्या कुंडलीतील चतुर्थात आलेल्या शनी-नेपच्यूनसारख्या महाप्रतापी ग्रहांची जोडी हे एक संदेश घेऊनच आले आहेत की, महाराष्ट्रात कोणा एकाची चलती (पक्षाची) चालणार नाही. कारण- जनतेचीसुद्धा द्विधा मनस्थिती झालेली आहे. या संभाव्य निवडणूका आता डिसेंबरमध्ये होतील, असे सांगितले जात असले तरीही त्या आणखीन थोड्या लांबण्याची शक्यता दिसून येते.

या सर्व आघाडीवर खटपट करत जास्तीत जागा आपल्याच पक्षाच्या माध्यमातून निवडून आणणे ही प्राथमिक गरज दोन्ही पक्षांची असेल. एका मोठ्या शिस्तीच्या कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ असलेल्या पक्षाविरुद्ध अर्थात भाजपाविरोधात ही मोठी लढाई होणार असणार आहे. निदान एक वेगळा विचार घेऊन येण्याच्या प्रयत्नात निवडणुकीत सामोरे गेल्यास सेना- मनसे या पक्षांत नवे चैतन्य दिसून येईल. ही खूणगाठ बांधूनच राज-उद्धव ठाकरे यांच्या एकीकरणाने हिंदूंचा आवाज बुलंद करण्यात मनसे -शिवसेना (उबाठा) ) पक्षाला यश मिळेल, अशी शक्यता आहे. पण, त्यांना सप्टेंबरचा उंबरा ओलांडावा लागणार आहे. मंगळभ्रमण, चंद्रभ्रमण, रवीभ्रमण हे ओलांडले, तरच पुढील विचार करणे शक्य आहे. त्यांच्या एकत्र येण्यामुळे सर्वच पक्षांत चलबिचल खूपच वाढलेली असल्याने आपण नेमकी काय भूमिका घ्यायची हे महाविकास आघाडीला ठरवावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकहिताची तळमळ नेमकी कोणत्या पक्षाकडे याचा विचार राज्यातील जनता निवडणुकीच्या काळात करेल, असे चित्र आहे. लोकहिताची तळमळ, जनतेच्या मनातील भावना यांना शनी-नेपच्यून, मंगळ कौल देतील. आज मात्र हेच दिसून येत आहे की, महाराष्ट्रात या नगरपालिकांच्या निवडणुकीपूर्वी राजकारणातील नव्या कोलांटउड्या पाहावयास मिळणार आहेत. तसेच याचनिमित्ताने राजकारणाचा एक नवा रंग स्पष्ट दिसून येईल.