शारदीय नवरात्र २०२५: हिंदू धर्मात नवरात्र हा सण मोठ्या श्रद्धेने, भक्तीभावाने साजरा केला जातो. वर्षभरात एकूण चार नवरात्र असतात. त्यापैकी शारदीय नवरात्र सर्वात महत्त्वाची मानली जाते. हिंदू कॅलेंडरनुसार, यावर्षी शारदीय नवरात्र २२ सप्टेंबर म्हणजेच येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. महत्त्वाचं म्हणजे चतुर्थी तिथी वाढल्यामुळे नवरात्र नऊऐवजी १० दिवस साजरी केली जाईल. दरम्यान, देवीच्या आगमन आणि प्रस्थानाचे वाहन हे दरवर्षी वेगवेगळे असते आणि प्रत्येकाचे महत्त्वही आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी देवी माता हत्तीवर स्वार होऊन येणार आहे. तर या वाहनाचे महत्त्व, त्याचे शुभ संकेत, नवरात्रीच्या तारखा आणि घटस्थापनेचा शुभ काळ जाणून घेऊया…
देवी आईचे वाहन
देवी पुराणात उल्लेख आहे की नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी देवीचे वाहन निश्चित होते. देवी पुराणातील एका श्लोकात म्हटले आहे की, “शशी सूर्य गज्रुधा शनिभूमै तुरंगमे” म्हणजेच जर नवरात्र रविवार किंवा सोमवारी सुरू झाली तर देवी हत्तीवर स्वार होऊन येते. यावर्षी शारदीय नवरात्र सोमवारी सुरू होत आहे, त्यामुळे देवी आई हत्तीवर स्वार होऊन पृथ्वीवर येईल.
हत्तीवर आगमनाचे शुभ संकेत
धार्मिक श्रद्धेनुसार, हत्तीवर स्वार होऊन देवी आईचे आगमन अत्यंत शुभ मानले जाते. हे वर्षभर चांगला पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना भरपूर पीक मिळेल असे दर्शवते. तसंच देशात आणि जगात स्थिरता आणि शाती राहील. राजकीय अस्थिरता कमी होईल आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. हत्तीवर स्वार होऊन आलेल्या देवी आईचे आगमन तिच्या भक्तांना आनंद, समृद्धी आणि यश प्राप्त करून देते.
शारदीय नवरात्री घटस्थापना मुहूर्त २०२५
शारदीय नवरात्र अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला सुरू होते. यावेळी प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होईल आणि २३ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत चालेल. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी ६ वाजून ९ मिनिटे ते ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत असेल. त्याचवेळी कलश स्थापनाचा शुभ मुहूर्त सकाळी ९ वाजून ११ मिनिटांनी ते १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत आहे. शिवाय, घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल.