What Your Sleeping Position Says: झोप म्हणजे केवळ शरीराला विश्रांती देणं नाही, तर ती आपल्या मन, स्वभाव आणि विचारांचंही प्रतिबिंब असते असं मानलं जातं. प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची एक वेगळी स्टाइल असते. कोणीतरी बाजूला वळून झोपतो, तर कोणीतरी हात-पाय पसरून. पण, तुम्हाला माहीत आहे का, सामुद्रिक शास्त्रानुसार (Samudrik Shastra) झोपण्याची पद्धतही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि भविष्याबद्दल बरेच काही सांगते? चला तर जाणून घेऊया, तुमची झोप सांगतेय काही खास गोष्टी तुमच्याबद्दल…
झोपण्याच्या ‘या’ ५ पद्धती सांगतात तुमचा स्वभाव
झोपताना बाजूला वळणे
सामुद्रिक शास्त्रानुसार जे लोक झोपताना बाजूला वळून झोपतात ते शनी आणि शुक्र ग्रहांच्या प्रभावाखाली असतात असं म्हटलं जातं. असे लोक मनातलं फारसं कुणाशी शेअर करत नाहीत. त्यांना स्वतःच्या भावना आणि विचार स्वतःजवळ ठेवायला आवडतं. हे लोक महत्त्वाकांक्षी असतात आणि मेहनती स्वभावाचे असतात. आयुष्यात प्रगती करायची जिद्द त्यांच्यात असते. प्रवास, नवे अनुभव आणि सुंदर वस्तू यांचं त्यांना आकर्षण असतं. मात्र, हे लोक पैसे खर्च करताना खूप विचार करतात आणि बचतीकडे त्यांचा कल जास्त असतो.
हात-पाय पसरून झोपणारे
जे लोक पलंगावर पूर्णपणे पसरून झोपतात, त्यांच्यावर मंगळ किंवा सूर्याचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. अशा लोकांना नशिबाची साथ कमी मिळते, त्यामुळे त्यांना जीवनात संघर्ष करावा लागतो. कधी कधी हे लोक रागीट आणि थोडे हट्टी स्वभावाचेही असतात. स्वातंत्र्य त्यांना फार प्रिय असतं आणि कुणाचं बंधन त्यांना मान्य नसतं. काही वेळा हे लोक आळशी असू शकतात, पण जेव्हा ते एखादं ध्येय ठरवतात, तेव्हा ते पूर्ण ताकदीने त्याच्या मागे लागतात.
पोटावर झोपणारे
पोटावर झोपणारे लोक साधारणपणे स्वतःच्या विश्वात रममाण असतात. त्यांना कोणीही टोचणं, टीका करणं अजिबात आवडत नाही. ते लाजाळू नसतात. ते इतरांना आपल्या खाजगी आयुष्यात किंवा निर्णयांमध्ये जास्त हस्तक्षेप करू देत नाहीत. हे लोक बाहेरून शांत, पण आतून प्रचंड विचारशील आणि क्रिएटिव्ह असतात. त्यांना एकटं राहून स्वतःचा वेळ एन्जॉय करणं आवडतं.
सरळ झोपणारे
जे लोक पाठ सरळ करून झोपतात, ते शिस्तप्रिय आणि वेळेचे पक्के असतात. सामुद्रिक शास्त्र सांगतं की अशा लोकांवर सूर्य आणि शनीचा मिश्र प्रभाव असतो. हे लोक काम वेळेवर पूर्ण करण्यावर विश्वास ठेवतात आणि नियमांचं काटेकोर पालन करतात. नातेसंबंधात ते प्रामाणिक आणि विश्वासू असतात. दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करण्याची भावना त्यांच्यात असते. समाजात हे लोक जबाबदार आणि आदर्श म्हणून पाहिले जातात.
भरपूर झोप घेणारे लोक
काही लोकांना भरपूर झोप घेण्याची सवय असते. हे लोक सहज, शांत आणि मनमोकळे असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार अशा लोकांवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याचं मानलं जातं. हे लोक सौंदर्यप्रेमी असतात आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवतात. मात्र, कधी कधी हे लोक थोडेसे आळशी होऊ शकतात आणि जबाबदारी टाळतात. पण, त्यांच्या मनात द्वेष किंवा इर्ष्या नसते, ते जितके साधे दिसतात तितकेच मनानेही निर्मळ असतात.
झोपण्याची पद्धत ही केवळ सवय नसून ती आपल्या मनातील शांतता, विचार आणि ग्रह-प्रभावांचे प्रतिबिंब मानली जाते. सामुद्रिक शास्त्र यामागे काही रोचक निरीक्षणं मांडतं, मात्र या गोष्टींकडे केवळ विश्वास नव्हे तर उत्सुकतेने पाहण्यास हरकत नाही. तुमची झोप तुमच्याबद्दल काय सांगते हे जाणून घेणं म्हणजे स्वतःकडे एक नवा दृष्टिकोन घेऊन पाहणं होय.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
