Navratri Third Day: आज २४ सप्टेंबर २०२५ शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा-आराधना केली जाते. असं म्हटलं जात की, देवी चंद्रघंटाच्या पूजेने साधकाला साहस आणि शक्तीची प्राप्ती होते. नवदुर्गेच्या या रूपाने साधकाच्या जन्म-जन्मांतरीचे पाप नष्ट होतात. देवीचे हे स्वरूप शांतिदायक आणि कल्याणकारी मानले जाते.

देवी चंद्रघंटाचे महत्व

देवी चंद्रघंटाच्या माथ्यावर अर्धचंद्र आहे. त्यामुळे देवीला चंद्रघंटा म्हटलं जातं. देवी चंद्रघंटाच्या हातामध्ये अस्त्र-शस्त्र आहे. देवी चंद्रघंटाची पूजा करणारा व्यक्ति पराक्रमी आणि निर्भय होतो. तसेच या देवीची आराधना केल्यास कुटुंबात सुख-समृद्धी प्राप्त होते, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होते. ज्योतिष शास्त्रानुसार, देवी चंद्रघंटाचा संबंध मंगळ ग्रहाशी जोडला गेला आहे. त्यामुळे देवीच्या आराधनेने मंगळ ग्रह मजबूत होतो.

देवी चंद्रघंटाची पूजा कशी करावी?

या दिवशी लाल वस्त्र धारण करून देवी चंद्रघंटाची पूजा करणं उत्तम मानले जाते. कारण, चंद्रघंटा देवीला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. पूजेत देवीला लाल फूल, रक्त चंदन आणि लाल चुनरी समर्पित करा. तसेच यावेळी देवीच्या ॐ देवी चन्द्रघण्टायै नमः॥ या मंत्राचा जप करा. देवीला फळांचा, मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. धूप-दीप दाखवून देवीची कर्पूर आरती करा.