देव दिवाळी २०२५: देव दिवाळीचे पर्व खूपच खास असते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या तिथीला देव दिवाळी साजरी केली जाते. आख्यायिकेनुसार, कार्तिक पौर्णिमेला सर्व देवी-देवता शिवनगरी असलेल्या काशीमध्ये गंगेच्या काठावर येतात अशी मान्यता आहे. गंगेत स्नान केल्यानंतर ते शिवाची पूजा करतात आणि दिवे लावण्याची परंपरा आहे. म्हणूनच दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला प्रदोष काळात काशीमध्ये गंगेच्या काठावर दिवे लावण्याची परंपरा आजही आहे. गंगा किनाऱ्यासह देशभरात सर्वत्र देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी गंगेत स्नान करतात, शंकराची पूजा करतात आणि दिवे लावतात, त्यामुळे सर्व दु:ख, आजार यापासून मुक्तता मिळते.

देव दिवाळीला कोणत्या देव-देवतांची पूजा केली जाते?

हा दिवस देवतांच्या दिवाळीच्या रूपात साजरा केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की देव दिवाळीला नेमकी कोणत्या देवांची पूजा केली जाते?

पौराणिक कथांनुसार, कार्तिक पौर्णिमाला सर्व देव-देवता शंकराच्या नगरात गंगा घाटावर येतात. गंगेत स्नान केल्यानंतर शंकराची पूजा करतात आणि दिवे लावतात.

त्रिपुरारी पौर्णिमा

या दिवसाला शास्त्रांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. कारण या दिवशी भगवान विष्णुंसह महादेवाचीही पूजा केली जाते.

महाकार्तिक

या सणाचं महत्त्व आणखी वाढतं जेव्हा तो कृत्तिका नक्षत्रात येतो. त्यामुळेच याला महाकार्तिक असंही म्हटलं जातं.

देव दिवाळीचा शुभ मुहूर्त ५ नोव्हेंबर रोजी ब्रम्ह मुहूर्त पहाटे ४.५२ ते ५.४४ पर्यंत असणार आहे. त्या दिवशी अभिजीत मुहूर्त नसणार आहे. या दिवशी प्रदेष काळात दिवे लावले जातात. दिवे लावण्याचा शुभ काळ ५.१५ ते ७.५० पर्यंत असून त्या दिवशी देव दिवाळीचा शुभ काळ २ तास ३५ मिनिटं असणार आहे.

देव दिवाळीला नदीच्या काठावर ११,२१,५१ किंवा १०८ दिवे लावावे.

देव दिवाळीचे महत्त्व

पौराणिक कथेनुसार, त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा अत्याचार तिन्ही लोकांमध्ये वाढला होता. देव, देवी आणि मानव सर्वजण दु:खी झाले होते. त्यानंतर भगवान शंकराने त्रुपरासूराचा नाश केला आणि तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण झाला. त्या दिवशी काशीमध्ये गंगेच्या काठावर देव-देवता एकत्र आल्या. त्यांनी गंगेत स्नान केले, प्रदोष काळात शंकराची पूजा केली आणि दिवे लावले. आजकाल, काशी, प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि इतर धार्मिक स्थळांवर दिवे लावून देव दिवाळी साजरी केली जाते.