Navratri Fifth Day 2025: आज शारदीय नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. नवरात्रीच्या पाचव्या दिवशी
देवी स्कंदमातेची पूजा-आराधना केली जाते. देवी स्कंदमाता कमळावर विराजमान असून तिच्या मांडीवर सहा मुख असलेले स्कंदकुमार विराजीत आहेत. देवी स्कंदमातेची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती होते, तसेच देवीची उपासना करणाऱ्या व्यक्तींच्या शत्रूंचा विनाश होतो, अशी मान्यता आहे.
देवी स्कंदमातेच्या उपासनेने मिळतो मोक्ष
देवी स्कंदमातेला चार हात असून, तिच्या मांडीवर स्कंदकुमार विराजमान आहेत. देवी स्कंदमाता कमळावर किंवा सिंहावर विराजमान असते, त्यामुळे तिला पद्मासना म्हणूनदेखील ओळखले जाते. देवी स्कंदमाता आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होते. देवीच्या उपासनेने मोक्ष प्राप्ती होते असे म्हटले जाते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमी का साजरी केली जाते?
भारतातील अनेक राज्यांमध्ये नवरात्रीच्या पाचव्या दिवशी ललिता पंचमीदेखील साजरी केली जाते. देवी ललिता त्रिपुरा सुंदरी, षोड्शी आणि राजेश्वरी या नावांनीही ओळखली जाते. तिला सौंदर्य, शक्ती आणि सौभाग्याची देवी मानले जाते. पौराणिक कथेनुसार, कामदेवाच्या शरीराच्या राखेतून देवी ललिता प्रकट झाली आणि भांड राक्षसाचा वध केला. या दिवशी तिची पूजा केल्याने भक्तांची सर्व दुःखं दूर होतात. हे व्रत नवविवाहित महिलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी विशेषतः फायदेशीर मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत पाळल्याने बुद्धी, सौभाग्य, दीर्घायुष्य आणि समृद्धी मिळते.
पूजेचा शुभ मुहूर्त
पंचमी तिथी सुरुवात : २६ सप्टेंबर सकाळी ९ वाजून ३३ मिनिटांपासून.
पंचमी तिथी समाप्त : २७ सप्टेंबर दुपारी १२ वाजून ०३ मिनिटांपर्यंत.
अभिजात मुहूर्त: दुपारी ११ वाजून ४८ मिनिटांपासून ते १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल.
अशा प्रकारे करा देवीची पूजा
नवरात्रीचा पाचवा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित केलेला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळे स्वच्छ वस्त्र धारण करून एका पाटावर पिवळे वस्त्र टाकून त्यावर देवीचा फोटो ठेवा. नंतर देवीला हळद-कुंकू, अक्षता, फुले समर्पित करा. पिवळी मिठाई अर्पण करा.
देवीच्या समोर तुपाचा दिवा आणि धूप लावा. देवीची मनोभावे प्रार्थना करा आणि देवीची आरती करून घ्या. त्यानंतर देवीच्या ‘या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।’ या स्कंदमाता मंत्राचा जप करा.