सन २०२१चे नवेपण हळूहळू अंगवळणी पडत असताना, या वर्षांत येणाऱ्या नव्या पुस्तकांची माहितीही आता सर्वच महत्त्वाच्या प्रकाशकांनी आपापल्या संकेतस्थळांवर दिलेली आहे आणि माध्यमांतूनही ती प्रसृत होते आहे. त्या याद्या वाचवाचून बोध होतो तो इतकाच की, जुन्या- म्हणजे सुपरिचित वगैरे- लेखकांची कोणती पुस्तके यंदा येणार, यावरच माध्यमांचे लक्ष असते आणि प्रकाशकही, या परिचित किंवा ‘लोकप्रिय’ लेखकांच्याच पुस्तकांची माहिती प्राधान्याने देऊ करतात.. त्याखेरीजही काही नव्या विषयांची, अपरिचित लेखकांनी लिहिलेली पुस्तके असणार हे उघड आहे. पण ‘जुन्यांची नवलाई’ अशी काहीशी स्थिती, वर्षभरातील आगामी पुस्तकांबद्दल झालेली दिसते खरी!

उदाहरणार्थ यंदा कादंबऱ्या कोणत्या येणार, हे सांगताना बहुतेक इंग्रजी दैनिकांनी झुम्पा लाहिरी (व्हेअरअबाउट्स)व  चित्रा बॅनर्जी दिवाकरूनी (द लास्ट क्वीन) ही नावे पहिल्याप्रथम  सांगितली आहेत. किंवा, ‘साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले आफ्रिकी लेखक’ म्हणून ख्याती असलेले वोल सोयिन्का आणि ‘तुर्कस्तानात राहणारे पहिलेच साहित्य-नोबेल मानकरी’ ओऱ्हान पामुक यांच्या नव्या पुस्तकांची माहिती ठळकपणे दिली आहे. सोयिन्का ४८ वर्षांनी कादंबरी लिहिताहेत आणि ती आफिकेतील सत्ताधारी वर्गाच्या अंगी बाणलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आहे, तर पामुक यांचे ‘नाइट ऑफ प्लेग’ हे करोनाकाळाची नस पकडणारे ठरेल. सलमान रश्दी यांचे ‘लँग्वेजेस ऑफ ट्रथ’ हे निबंध-पुस्तकही चर्चेत प्रामुख्याने आणले जाते आहे.

वास्तविक, इंग्रजीमध्ये यंदा येणारी आणि ‘लक्षणीय’ वगैरे ठरवली गेलेली अनेक पुस्तके अन्य भाषांमधून आधीच आलेली आहेत! मग त्यांचे कौतुक का? तर ती इंग्रजीत प्रथमच येणार आहेत म्हणून! उदाहरणार्थ झुम्पा लाहिरी यांची ‘व्हेअरबाउट्स’ ही कादंबरीसुद्धा – लाहिरी यांनीच प्रथम इटालियन भाषेत ‘डोव्ह मी ट्रोव्हो’ (शब्दश: भाषांतर : कुठेय मी?/व्हेअर अ‍ॅम आय?) या नावाने लिहिली आणि २०१८ सालीच तिथे ती प्रकाशितही झाली. लाहिरी आजकाल इटालियन लेखिका बनल्या आहेत, हे त्यांच्या ‘इन अदर वर्ड्स’ या मूळ इटालियन-मग इंग्रजी पुस्तकापासून वाचकांना माहीतच असेल. गिरीश कार्नाड यांचे ‘आडडता आयुष्या’ हे मूळ कन्नड आत्मचरित्र मराठीतही कधीच ‘खेळता खेळता आयुष्य’ या नावाने आले होते, ते इंग्रजीत मात्र या वर्षीच येणार आहे. ‘धिस लाइफ अ‍ॅट प्ले’ हे त्याचे नाव. ‘सरहद्द गांधी’ अर्थात खान अब्दुल गफारखान यांचे मूळ पुश्तू भाषेतील चरित्रही यंदा इंग्रजीत येते आहे. नागालॅडमधील कथांचा संग्रह अविनुओ किरे यांच्या अनुवाद-संपादनामुळे यंदा इंग्रजीत येतो आहे. खेरीज , मूळच्या नागालॅण्डच्या आणि ‘आओ’ जमातीच्या भाषेसह इंग्रजीतही लिहिणाऱ्या कवयित्री टेम्सुला आओ यांच्याही कथांचे पुस्तक यंदा येत आहे. असमिया भाषेतील बंडखोर, संवेदनशील लेखिका इंदिरा गोस्वामी यांच्या पाच कादंबरिका आता यंदाच इंग्रजीत येतील. तर बंगाली लेखिका अनिता अग्निहोत्री यांची ‘महानदी’ ही कादंबरीही इंग्रजीत यंदा अवतरेल.

जुन्या-जाणत्या लेखकांविषयी असलेल्या आकर्षणाचा फायदा प्रकाशक अर्थातच घेत असतात. यंदा रस्किन बॉण्ड यांची चार पुस्तके , तीही दोन प्रकाशनगृहांकडून- येत आहेत, त्यापैकी नवी किती असणार याविषयीच्या शंका रास्तच ठरतील. शिवाय शशी थरूर यांच्या निवडक लिखाणाचा संग्रह ‘प्राइड, प्रेज्युडिस अ‍ॅण्ड पण्डिट्री- द इसेन्शिअल शशी थरूर’ या नावाने ‘अलेफ’ सारख्या गंभीर प्रकाशनातर्फे येतो आहे. आशीष नंदी  हे थरूर यांच्यासारखे ‘लोकप्रिय’ वगैरे नव्हेत, पण विचारवंत. ‘ब्रेकफास्ट विथ एव्हिल अ‍ॅण्ड अदर रिस्की व्हेन्चर्स- द नॉनइसेन्शिअल आशीस नंदी’ हे त्यांचे पुस्तक ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस’ काढते आहे!

चरित्र आणि आत्मचरित्रांमध्ये पुन्हा बडय़ा नावांनाच प्राधान्य मिळणार, हे उघडच आहे. पण त्यातही लक्ष राहील ते ‘बाय मेनी अ हॅपी अ‍ॅक्सिडेंट : रीलेक्शन्स ऑफ अ लाइफ’ अशा लांबलचक नावाचे आत्मपर पुस्तक. त्याचे लेखक हमीद अन्सारी हे माजी उपराष्ट्रपती. देशातील २०१४ च्या सत्तांतराचा काळ त्यांनी अनुभवलेला. दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हल्लीच आलेल्या आत्मपर पुस्तकाशी हमीद अन्सारींचे पुस्तक ताडून पाहाता येईल.

हारुकी मुराकामी, काझुओ इशिगुरो, बिल गेट्स ही बडी नावे यंदाही पुस्तकरूपाने अवतरणार आहेत आणि ती पुस्तके कशी खूपविक्रीची ठरली याच्याही बातम्या २०२१ मध्ये येणार आहेत. पण काश्मीर प्रश्न, आसामातली आणि हिंदीपट्टय़ातली भाजप राजवट, यांसारख्या ‘अवघड’ विषयांवरील पुस्तकेही येत्या काही महिन्यांत प्रकाशित होतील! नव्यांच्या चर्चेतील बडय़ांची नवलाई तोवर, यंदापुरती का होईना, संपलेली असेल.