‘मनमोहन सिंग यांनी भारत-अमेरिका संबंधांची जी नव्याने पायाभरणी केली, तिच्या परिणामी यापुढे भारताला अधिक वाव मिळू शकतो’ ही पाकव्याप्त काश्मिरात भारतीय सैन्याने केलेल्या ‘लक्ष्यभेदी कारवाई’नंतरची ट्विप्पणी कुणा काँग्रेसनिष्ठाची नाही.. ज्येष्ठ ब्रिटिश-अमेरिकी पत्रकार मायरा मॅकडोनाल्ड यांनी या कारवाईनंतर, व्यूहात्मक संबंधांचे विश्लेषक सदानंद धुमे यांना दिलेल्या उत्तरातलं हे वाक्य आहे. मायरा या काही ‘काँग्रेसधार्जिण्या’वगैरे म्हणून कधी ओळखल्या गेल्या नव्हत्या. त्यांना विशेषणच लावायचं तर ‘भारताच्या सामर्थ्यांची बूज ठेवणाऱ्या विदेशी पत्रकार’ असं म्हणावं लागेल. सातत्यपूर्ण विश्लेषणातून त्यांनी ‘पाकिस्तानची हार (आणि भारताचा विजय) निश्चित’ हेच निरीक्षण मांडलं आहे. त्यासाठी मनमोहन सिंग यांच्या  कारकीर्दीचा अभ्यास त्यांना मुद्दामहून करावा न लागता, ‘‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेच्या भारत-पाकिस्तानातील ज्येष्ठ पत्रकार’ म्हणून गेल्या १५ वर्षांत तो आपसूक  झाला आहे आणि  नव्या , आगामी पुस्तकात त्यांनी तो मांडलाही आहे. बातमी अशी की, या पुस्तकाचं अखेरचं प्रकरण अगदी परवाच्या गुरुवारपासूनच, मायरा यांनी पुन्हा लिहायला घेतलं आहे. उरीच्या शल्याचा सूड भारतानं कसा घेतला आणि त्याचे परिणाम काय, याविषयीचं त्यांचं तटस्थ विश्लेषण या पुस्तकाच्या अखेरीस वाचायला मिळणार आहे..

untitled-18

या आगामी पुस्तकाचं नाव ‘डिफीट इज अ‍ॅन ऑर्फन’ असलं, तरी त्याचं उपशीर्षक अधिक महत्त्वाचं आहे.. ‘हाउ पाकिस्तान लॉस्ट द ग्रेट साउथ एशियन वॉर’! पुस्तकाची जगजाहीर झालेली रूपरेषा अशी की, १९९८ मध्ये भारताकडून ‘पोखरण-२’ भूमिगत अणुस्फोट चाचण्या झाल्यावर पाकिस्ताननेही अशाच चाचण्या घडवल्या, तेव्हापासून या दोघा देशांतील तेढ नव्या पातळीला पोहोचली होती.  मात्र भारताने आंतरराष्ट्रीय संबंध महत्त्वाचे मानले आणि पाकिस्तानने भारतविरोधी कारवायांवरच लक्ष केंद्रित ठेवले. त्यापुढल्या काळात खरे तर काश्मीरविषयी जागतिक जनमत तयार करण्याची संधी पाकिस्तानलाही होती. पण तसे झाले नाही. होऊ शकले नाही.  भारताच्या आर्थिक विकासामुळे अनेक देशांशी संबंधवृद्धी शक्य  होत असतानाच, पाकिस्तान मात्र अमेरिकेच्याही नजरेत ‘दहशतवादय़ांना आश्रय देणारा देश’ ठरू लागला होता. इथून पुढे पाकिस्तानचे एकटे पडणे सुरू झाले, ते आजतागायत.

ही मांडणी आपण भारतीय सहज करू शकतोच; कारण हा ताजा इतिहास घडवणारे आपणही आहोत! पण अमेरिकी हितसंबंध, जागतिक व्यूहात्मक संबंधांत गेल्या १५ वर्षांत दिसू लागलेले बदल यांचा पक्का अदमास असलेल्या मायरा भारत-पाकिस्तानबद्दल काय म्हणतात, याकडे जगभरच्या तज्ज्ञांचंही लक्ष आहे. मायरा यांनी याआधी लिहिलेलं पुस्तक  सियाचेनबद्दल होतं  आणि (तिथल्या जवान आणि अधिकाऱ्यांचा खडतर दिनक्रम पुरेपूर माहीत असूनही) त्याचं नाव ‘हाइट ऑफ मॅडनेस’ असं होतं, हे काही वाचकांना आठवतही असेल. दक्षिण आशियाई समस्येकडे इत्थंभूत माहिती असतानाही अंतर राखूनच कसं पाहावं, याचा नमुना म्हणजे ते पुस्तक. पण नव्या पुस्तकात राजनैतिक, राजकीय, व्यूहात्मक व थेट लष्करी अशा सर्वच बाजूंचा आवाका येणार आहे.

पाकिस्तानी अणुचाचणीनंतर तेव्हाचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी सियाचेनकडे जाणाऱ्या खिंडी अडवून ठेवण्यासाठी पाक फौजांना कूच करण्याचा आदेश दिला, ‘यातूनच मुशर्रफ यांची काश्मीर प्रश्नाची समज किती कमी होती, हे दिसून येते’ असं मायरा यांनी याआधी  (जानेवारी २०१६ मधील लेख) म्हटलं आहे. त्याच वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी मात्र नवाझ शरीफ यांच्याशी  ‘जनसंबंधांची मुत्सद्देगिरी’ ( पीपल टु पीपल डिप्लोमसी) ठरलेली बोलणी सुरू ठेवली होती, दिल्ली-लाहोर बस त्यातूनच सुरू झाली होती, याची आठवणही मायरा देतात. याच वेळी वाजपेयी यांनी, भारताशी संबंध तोडू पाहणाऱ्या देशांनाही भारतीय शांतताप्रियतेचीच ग्वाही दिली होती.

पुढे मनमोहन सिंग यांच्या सरकारने ती कायम ठेवलीच, परंतु अमेरिकेशी अणुऊर्जा करार करून अनेक पावले पुढे जाण्याचे धैर्यही दाखविले. हा इतिहास  केवळ भारतीय अंगानेच लिहिला जाता, तर भाजपने हाच अणुकरार हाणून पाडण्यासाठी स्वतच्या खासदारांना खोटे पाडण्याचा आत्मघाती ‘बंडल’बाजीचा मार्गही कसा पत्करला होता, हेही कुणी उगाळेल.. त्यापेक्षा हा इतिहास दुरूनच लिहिला जातो आहे, हे अर्थात कितीतरी स्वागतार्ह ठरावे.