इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांचे आत्मचरित्र रोचक झाले आहे ते, त्यांनी अनेक वादांबाबत आपली बाजू मांडल्यामुळे तसेच अडचणींवर मात कशी केली हे सांगितल्यामुळे. राधाकृष्णन यांचा मंगळयानमोहिमेपर्यंतचा त्यांचा प्रवास व संगीताचा छंदही इथे उलगडतो..

इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन यांनी भारताची मंगळ मोहीम यशस्वी करून दाखवली. हे सोपे काम मुळीच नव्हते. त्यामुळे ‘नेचर’ या नियतकालिकाने त्यांना २०१४ मध्ये ‘जगातील पहिल्या दहा वैज्ञानिकां’त स्थान दिले. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय वैज्ञानिक. इस्रो २०१८ मध्ये चंद्रावर रोव्हर गाडी सोडणार आहे तीही राधाकृष्णन यांचीच कल्पना. राधाकृष्णन यांनी १९८० पासून, म्हणजे जेव्हा एसएलव्ही ३ प्रकल्प सुरू होता तेव्हापासून विक्रम साराभाई, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम, प्रा. सतीश धवन व वाय. एस. राजन यांच्या समवेत बराच अनुभव घेतलेला होता, त्यांच्या या आव्हानात्मक कारकीर्दीचा लेखाजोखा त्यांनी माय ओडिसी या आठवणीपर पुस्तकात मांडला आहे. त्यांचे इस्रोतील सहकारी निलंजन राथ यांच्या सहकार्याने त्यांनी या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. भारतीय अवकाश कार्यक्रमात यशापयशाचे चढउतार कसे येत गेले याचे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे.

‘इस्रोच्या संस्कृतीत मंदिरे व विज्ञान हे विरोधाभासी नाहीत – किंबहुना तेथील सांस्कृतिक संदर्भातच त्याची गुंफण आहे. कारण इस्रोचे अभियंते प्रत्येक उपग्रह उड्डाणाच्या वेळी मंदिरे व चर्चमध्ये जातात किंबहुना उपग्रहाची प्रतिकृती तिरुपती बालाजीला अर्पण केली जाते.’ हेही या पुस्तकातून लक्षात येते. बालाजीदर्शनास गेल्यामुळे राधाकृष्णन वादग्रस्त ठरले होते, तो वाद मिटविण्याचा प्रयत्न पुस्तकात अशा प्रकारे येतो. भारताचा अवकाश कार्यक्रम जेव्हा तयार केला गेला तेव्हा तो अमेरिका व रशियाची नक्कल असणार नाही याची काळजी घेतली गेली होती. अतिशय कमी साधनात इस्रोने त्यांचा हा पसारा उभा केला आहे हे या पुस्तकातूनही लक्षात येते. इस्रोने गेली काही दशके केवळ प्रत्येक अवकाश मोहिमेतून केवळ यशापयश जाहीर केले, पण २००८ मध्ये चांद्रयान १ मोहिमेपासून इस्रोने सोशल मीडियाचा वापर सुरू केला व नंतर मंगळ मोहिमेत ट्विटर हँडलही सुरू केले, त्यावेळी मंगळ मोहीम खर्चीक आहे या प्रचाराला उत्तर देण्यासाठी ट्विटरचा चांगला उपयोग झाला असे राधाकृष्णन सांगतात. त्याच वेळी इस्रोच्या अँट्रिक्स या व्यावसायिक शाखेवर आरोप केले जात होते त्यांनी मूल्यवान स्पेक्ट्रम देवास मल्टिमीडिया या खासगी कंपनीला लिलावात दिले होते. त्याबाबत आरोप झाले. त्यांची चौकशी सुरू आहे. या ‘अँट्रिक्स घोटाळ्या’त तत्कालीन अध्यक्ष माधवन नायर यांचा हात असल्याचा संशय असल्याने नंतर त्यांना कुठलेही सरकारी पद स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. नायर यांच्यानंतर राधाकृष्णन अध्यक्ष झाले. नायर यांनी राधाकृष्णन यांच्यावरच, अँट्रिक्स प्रकरण चिघळवल्याचा आरोप केला. राधाकृष्णन यांनी त्यांच्या माय ओडिसी या पुस्तकात या वादाबाबत काही स्पष्टपणे सांगितलेले नाही. यात राधाकृष्णन एवढेच सांगतात की, तो आव्हानात्मक काळ होता व देशहितासाठी आपण काम केले तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिलो. राधाकृष्णन यांनी नायर यांचा उल्लेख पुस्तकात अनेकदा केला आहे, पण तो सकारात्मक व त्यांचे गुरू या दृष्टिकोनातूनच आहे.

राधाकृष्णन यांच्या काळात त्यांच्या काही निर्णयांवर टीका झाली होती, पण नंतर त्यांनी प्रसारमाध्यमातून मुलाखती देऊन काही स्पष्टीकरणे दिली. नंतर त्यांना माध्यमांना कसे हाताळायचे याची कलाही अवगत झाली याचा प्रत्यय पुस्तकातून येतो. डिसेंबर २०१४ मध्ये निवृत्त झाल्यानंतर माय ओडिसी हे पुस्तक लगेच त्यांनी लिहिले. त्यामुळे या वादांची पडछाया लिखाणावर असणे साहजिकही आहे.

राधाकृष्णन यांच्या रूपाने केरळातील इरिनाजलकुडा या गावचा एक साधारण मुलगा देशाच्या अवकाश संस्थेचा प्रमुख बनला त्याची सगळी कहाणी या पुस्तकात आहे. विद्युत अभियांत्रिकीत पदवी घेतल्यानंतर ते आयबीएममध्ये नोकरी करणार होते, पण अभियंता झाल्यानंतर त्यांच्यापुढे आणखीही काही पर्याय होते त्यात इस्रोचा एक होता. त्रिचूर सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयातील त्यांचे शिक्षक एम. एस.नारायण पोट्टी यांनी त्यांना इस्रोत काम करण्याचा सल्ला दिला. तू इस्रोत जा त्यांना उपग्रह प्रक्षेपक यान तयार करायचे आहे, तो प्रक्षेपक करणे जमले तर देशासाठी ती अभिमानास्पद कामगिरी असणार आहे असा सल्ला पोट्टीसरांनी दिल्यानंतर राधाकृष्णन इस्रोत आले. कालांतराने त्यांनी एमबीए केले व डॉक्टरेट पदवीही मिळवली.

त्यांच्या या पुस्तकातून त्यांचे अनेक पलू उघड होतात त्यांच्या कामाचा परिचय होतानाच त्यांचे व्यक्तिगत आयुष्यही उलगडत जाते, त्यांना असलेली डोशाची आवड, त्यांचा विवाह, देवाधर्मावर त्यांचा विश्वास या सगळ्या गोष्टी दिसतात. या पुस्तकातील वर्णन हे साहित्यिक शैली असलेले नाही त्यामुळे ते फार रसाळ वाटत नाही, पण निष्पक्षपणे त्यांनी स्वत:च्या कामगिरीबाबत केलेले कथन महत्त्वाचे ठरते. इस्रोचे एक वास्तव चित्र त्यांनी यात उभे केले आहेच. त्याचबरोबर त्यांची महत्त्वाकांक्षी कारकीर्द उलगडली आहे. प्रक्षेपकातील आवश्यक बदल, उपग्रह बांधणी व सहकाऱ्यांबरोबर संघभावनेने काम करण्याची वृत्ती यातून ते वरिष्ठांच्या नजरेत भरत गेले. एमबीएची पदवी घेऊन तुम्ही इस्रोत कसे पुढे गेलात, असा प्रश्न त्यांना वारंवार विचारला गेला त्यावर त्यांचे म्हणणे , ‘व्यवस्थापनातील पदवी असणे हे संस्थात्मक पातळीवरील शिडय़ा चढण्यासाठी एक बलस्थान आहे. आपण जन्मताच नेतृत्व गुण घेऊन येत नाही त्यासाठी प्रशिक्षण लागते.’

त्यांचे आणखी एक गुरू व इस्रोचे माजी अध्यक्ष सतीश धवन यांनी त्यांना जे शिकवले त्यातून ते एकच मंत्र शिकले – ‘जे तुम्हाला करायचे नाही किंवा करावेसे वाटत नाही त्याच्या वाटेला कधीच जाऊ नका’. राधाकृष्णन यांच्या काळात अनेकदा प्रक्षेपकांचे स्फोट झाले, जीएसएलव्हीची मोहीम अनेकदा फसली; पण नाउमेद न होता त्यांनी सहकाऱ्यांना पाठबळ दिले. स्वत: प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यात ते कुठेही भावनेच्या आहारी जात नाहीत, तसा त्यांचा स्वभावही नसल्याचे पुस्तकात नमूद आहे.. पण एकदा त्यांना अपेक्षित बढती नाकारली गेली तेव्हा मात्र ते एकांतात रडले होते, अशी कबुलीही आहे!

त्यांचे जीवन केवळ इस्रोपुरते मर्यादित नव्हते व तसे ते कुणाचेही नसावे. त्यांना छंद आहेत. ते उत्तम कथकली नर्तक आहेत व शास्त्रीय संगीतातही त्यांना चांगली गती आहे. त्यांनी अनेक मंदिरे, सार्वजनिक कार्यक्रम यांत कला सादर केली आहे, त्यामुळे त्यांना इस्रोसारख्या मोठय़ा संस्थेचा पसारा सांभाळतानाही कधी ताण आला नाही. निवृत्तीच्या एक दिवस आधी त्यांची पत्नी मिनी जेवणाच्या टेबलवर त्यांना सांगते उद्या किती तारीख आहे माहीत आहे का.. त्यावर राधाकृष्णन म्हणतात हो उद्या माझा निवृत्तीचा दिवस आहे.. उद्यापासून काय करणार अशी त्यांच्या पत्नीची खरी शंका होती, पण राधाकृष्णन यांना गायन व नर्तन असे छंद असल्याने त्यांना निवृत्तीनंतर काय करायचे याची कधीच चिंता नव्हती, असे संपन्न निवृत्त जीवन फार थोडय़ा लोकांना जमते. अजूनही ते केरळातील मंदिरातून संगीत मफली करतात. इस्रोव्यतिरिक्त त्यांनी नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉम्रेटिक सíव्हसेस या संस्थेत काम करताना भारताच्या सुनामी इशारा यंत्रणेत मोठी भूमिका पार पाडली होती.

जीएसएलव्ही उड्डाणांमधील अपयशाची कारणे त्यांनी दिली आहेत. तरी त्यांच्याच काळात जीएसएलव्हीचे उड्डाण अखेर यशस्वी झाले होते. भारताच्या अवकाश कार्यक्रमात तंत्रज्ञान र्निबध, मर्यादित निधी व राजकीय दबाव यांना कशा प्रकारे तोंड दिले हे या पुस्तकात सांगितलेले नाही. राधाकृष्णन यांनी अनेक आंतरराष्ट्रीय मंचावर काम केले असले तरी त्यांनी अमेरिका, रशिया, चीन व फ्रान्स हे देश भारतीय अवकाश कार्यक्रमाकडे कशा पद्धतीने बघतात हे सांगितलेले नाही. १९९२ मध्ये अमेरिकेने रशियाच्या ग्लावकॉसमॉस व इस्रो यांच्यावर क्षेपणास्त्र नियंत्रण तंत्रज्ञान नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल र्निबध लादले. रशियाने दिलेल्या सात क्रायोजेनिक इंजिनांवर आपण काही उड्डाणे यशस्वी केली व नंतर २०१४ मध्ये जीएसएलव्हीची चाचणी यशस्वी केली. या प्रक्षेपकात क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केलेला असतो. राजकारण आणि विज्ञान यांचाही जवळून संबंध असतो. यूपीएच्या काळातील पंतप्रधान मनमोहन सिंग व आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या मोहिमात सारखाच रस दाखवला, वैज्ञानिकांच्या परिश्रमाला जी शाबासकीची थाप हवी असते ती दोघांच्याही काळात मिळाली हे खरेच. २६ मार्च २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरला भेट देऊन वैज्ञानिकांशी चर्चा केली होती. मोदी व मनमोहन सिंग वैज्ञानिकांशी चर्चा करतानाचे बोलके छायाचित्र यात आहे. मोदींच्या चेहऱ्यावरचे भाव कुतूहलाचे आहेत.

मंगळयानाची मोहीम कशी उभी केली गेली याची माहिती या पुस्तकात आहे. या मोहिमेवर खर्चाच्या दृष्टिकोनातून टीका झाली होती; पण ती किती चुकीची आहे हे प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांतून पटवून देण्याची वेळ आली होती. केवळ ४५० कोटी रुपयांत आपण मंगळयान मोहीम कमी कालावधीत तयारी करूनही यशस्वी केली हे खरोखर मोठे यश होते. त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष म्हणून राधाकृष्णन यांनी मोठी कामगिरी केली यात शंकाच नाही. तंत्रसहायक पदावर इस्रोत १९७१ मध्ये काम सुरू केलेल्या राधाकृष्णन यांची अध्यक्षपदापर्यंतची वाटचाल स्तिमित करणारी आहे. २००९ मध्ये ते इस्रोचे अध्यक्ष झाले. एकूणच या पुस्तकात त्यांचा इस्रोतील प्रवास व व्यक्तिगत जीवनातील काही भाग यांची गुंफण छान पद्धतीने साकारली आहे. कुठल्या कामासाठी कुठली माणसे निवडावीत, वरिष्ठांच्या संपर्कात कसे राहावे हे एमबीए झालेले असल्याने त्यांना जास्त चांगले कळत होते व टीम वर्कच्या माध्यमातून त्यांनी फार मोठे यश मिळवले असा एक अर्थ या पुस्तकातून जाणवतो. राधाकृष्णन हे वैज्ञानिकापेक्षा व्यवस्थापक जास्त होते हे यातून दिसून येते.

माय ओडेसी

लेखक : के. राधाकृष्णन

प्रकाशक : पेंग्विन रँडम हाउस,

पृष्ठे : ३३८, किंमत : २९५ रुपये

 

राजेंद्र येवलेकर

rajendra.yeolekar@expressindia.com