22 September 2020

News Flash

उद्योगाचे चाक फिरते, पण गती मंदावलेलीच

घरातून काम करणाऱ्यांची संख्या दोन लाखांवर

संग्रहित छायाचित्र

सुहास सरदेशमुख

१३ लाख कर्मचारी उत्पादनात गुंतलेले; घरातून काम करणाऱ्यांची संख्या दोन लाखांवर

टाळेबंदीनंतर आता उद्योगाचे चाक फिरत असले तरी त्याला फारशी गती मिळत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील उद्योगांमध्ये १३ लाख ७८ हजार ४२८ जण काम करीत असून त्यातील दोन लाख ६६ हजार ७५० जण घरातून कार्यरत असल्याची आकडेवारी आहे.

उद्योग जरी सुरू होत असले तरी बाजारपेठेत अजूनही पुरेशी मागणी नसल्याने अर्थकारण आक्रसलेलेच आहे. जिल्हास्तरावर टाळेबंदीचे अधिकार दिल्यानंतर दररोज नवनव्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

३० टक्के कंपन्यांची स्थिती मेटाकुटीला आली असून अन्य कंपन्यांचे उत्पादन तीस टक्क्यांनी घटले आहे. टाळेबंदीची अनिश्चितता जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत गती येणार नाही, असे उद्योजक सांगत आहेत. एप्रिल महिन्यानंतर उद्योगाचे चाक किमान हलते राहते आहे की नाही याची तपासणी दररोज केली जात असून जेथे प्रादुर्भाव अधिक तेथे घरातून काम करणाऱ्यांची संख्या जास्त असे चित्र अजूनही आहे.

राज्यातील विविध औद्योगिक वसाहतींमध्ये २५ हजार ३१० उद्योग सुरू आहेत, तर औद्योगिक वसाहतीच्या बाहेर ३३ हजार ६६८ उद्योगांतून उत्पादन सुरू झाले आहे; पण कमी कर्मचारी संख्येत सुरू असणाऱ्या प्रकल्पातून पुरेसे उत्पादन निघत नाही. परिणामी सारे गणित बिघडलेले असल्याचे उद्योजक सांगतात. मात्र, किमान उद्योग सुरू केल्यावर टाळेबंदीमुळे तो वारंवार बंद करावा लागू नये याची काळजी घ्यायला हवी. दुसरीकडे उद्योगांमध्ये करोना विषाणू पसरणार नाही, याचीही काळजी घ्यायला हवी. औरंगाबाद शहरात बजाज दुचाकी बनविण्याच्या कारखान्यात मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव असेल. ५३६ हून अधिक रुग्ण आढळून आल्याने प्रशासनही हैराण झाले होते. मात्र, आता औरंगाबाद शहरातील उद्योजकांनी त्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्यांच्या प्रतिजन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे या चाचणीसाठी लागणाऱ्या किटचा खर्च उद्योजकच करणार आहेत. अशा चाचण्या करण्याचे काम सुरू झाले आहे. खरे तर अन्य औद्योगिक वसाहतीमध्येही असेच प्रयोग हाती घेऊन उद्योगाचे चाक अधिक गतीने फिरवायला हवे. मात्र, केवळ उत्पादनाला गती देऊन भागणार नाही तर बाजारपेठ सुरू राहावी आणि त्यासाठी लोकांच्या हातात रक्कम मिळावी, अशी सोय करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान उद्योगाचे चाक अधिक गतिमान होत असल्याची आकडेवारी उद्योग विभागाकडून दिली जात आहे.

पुण्यात मोठय़ा प्रमाणात रुग्ण आहेत. या शहरात घरातून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या या शहरात एक लाख ९३ हजार ३०७ असल्याची आकडेवारी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे आहे. दरम्यान छोटय़ा शहरातील छोटय़ा उद्योगांवर अधिक परिणाम दिसून येत आहे.

जळगावमध्ये १५७७ उद्योग टाळेबंदीपूर्वी सुरू होते. तेथे आता एक हजार उद्योग सुरू आहेत, तर लातूरसारख्या शहरातील ९०० पैकी ५०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, जिल्हा पातळीवर होणाऱ्या टाळेबंदीमुळे नवनव्या अडचणींना उद्योगांना सामोरे जावे लागत आहे. वाहने उपलब्ध न होणे किंवा दुचाकी वाहन वापरण्यावर मर्यादा घातल्याचेही परिणाम दिसून येत आहेत.

‘दोन महिन्यांत वातावरण बदलेल’

उद्योग सुरू झाले असले आणि त्यातील कर्मचाऱ्यांची संख्याही ७५ टक्के असल्याची आकडेवारी आहे. येत्या दोन महिन्यांत हे वातावरण आणखी सुधारेल अशी उद्योगजगताला आशा आहे. औरंगाबादमध्ये सीआयआय या उद्योग संघटनांनी चीनमधील उद्योजकांशी चर्चा केली होती. तेथील उद्योजकांचा अनुभव लक्षात घेता ऑनलाइन व्यवहार वाढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. जुलैच्या मध्यापासून हे व्यवहार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

उद्योगाचे सध्याचे चित्र ३०:३० असे करता येईल. म्हणजे एकूण टाळेबंदी, बाजारपेठेत कमी झालेली मागणी याचा परिणाम म्हणून औद्योगिक वसाहतीमधील ३० टक्के उद्योग टिकतील का, याविषयी शंका आहेत आणि जे उद्योग सुरू आहेत त्यांना ३० टक्के फटका बसला आहे. छोटय़ा शहरातील ज्या उद्योगाचे उत्पादन केवळ त्याच गावात विकले जाते अशा उद्योगांना फटका मोठा आहे; पण ग्राहकांची अधिक व्याप्ती असणारे उद्योग सुरू आहेत; पण त्यांना नुकसान सहन करावे लागते आहे.

– मुकुंद कुलकर्णी, अध्यक्ष सीआयआय

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:20 am

Web Title: 13 lakh employees engaged in production the number of domestic workers is over two lakh abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 सणासुदीत खाद्यतेलाची दरवाढ!
2 लोकसंख्येच्या प्रमाणात चाचण्यांमध्ये औरंगाबाद राज्यात अव्वल
3 ‘कोविड सेंटर’मधील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
Just Now!
X