राज्यातील २५ हजार कलाशिक्षकांना करोनाचा ‘फटकारा’

औरंगाबाद : करोनाच्या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षणाचे धोरण ठरल्यानंतर त्यामध्ये प्राधान्याने शिकवण्यात येणाऱ्या विषयांमधून चित्रकला बाद ठरली. त्याचा ‘फटकारा’ कुंचल्यातून रसरंग जीवनाचे दर्शन घडवणाऱ्या २५ हजार कलाशिक्षकांना बसला असून त्यांच्यावर वर्षभरापूर्वीच बेरोजगाराची कु ऱ्हाड कोसळली. पण दुसऱ्यांदा लागू झालेल्या टाळेबंदीचा घाव मात्र त्यांच्या वर्मी लागला आहे. उदरनिर्वाहासाठी मिळवलेले शाळा आदींचे रंगरंगोटीचेही काम थांबल्यामुळे जगण्याचाच प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

पूर्वी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांमध्ये कलाशिक्षकांची पदे भरली जायची. नंतर मात्र कलाशिक्षक हे पदच भरणे बंद झाले. न्यायालयीन लढाईनंतर कलाशिक्षक पद भरण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. शाळांमध्ये इंटरमिजिएट व एलिमेंट्री या परीक्षांसाठी मुलांना चित्रकलेचे विविध विषय कलाशिक्षक शिकवतात. या परीक्षांचे गुणही विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षांमध्ये मिळायचे. मात्र, करोनामुळे या परीक्षाही झाल्या नाहीत. गुण देण्याबाबतही ठोस निर्णय होत नाही.

इंटरमिजिएट व एलिमेंट्री परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थी खासगी कलाशिक्षकांकडे शिकवणी लावायचे. मात्र त्याही शिक्षकांना घेता आल्या नाहीत. परिणामी त्यांच्यावर बेरोजगार राहण्याची वेळ आली. मध्यंतरी करोनामुळे बंद असलेल्या शाळांची रंगरंगोटी करण्याचे काम काही कलाशिक्षकांनी मिळवले. मात्र, आता तेही काम टाळेबंदीमुळे थांबणार असून जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.

औरंगाबाद शहरात सहाशेंवर खासगी शाळा असून बहुतांश इंग्रजी शाळांमध्ये चित्रकला शिक्षक कार्यरत होते. मात्र, ऑनलाईन शिक्षण पद्धतीत चित्रकला हा विषय शिकवता येत नसल्यामुळे त्यांना शाळा व्यवस्थापनाने घरीच बसवले. शाळेत काम सुरू झाले तरच पगार मिळेल, असेही त्यांना सांगण्यात आले.

पूर्वी जिल्हा परिषद, खासगी अनुदानित शाळांमध्ये कलाशिक्षकांची पदे भरली जायची. इंग्रजी शाळांचे वलय आले. पण त्यांनी तुटपुंज्या वेतनावर का होईना कलाशिक्षकांची पदे भरली. आता वर्षभरापासून ऑनलाईन शैक्षणिक धोरणातील प्राधान्यक्रम विषयांतून चित्रकलेला वगळण्यात आल्यामुळे कामाअभावी कलाशिक्षकांचा पगारही थांबला आहे. अनेकांची नोकरी गेली आहे. २५ हजारांवर कलाशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. न्यायालयाचे आदेश असतानाही कलाशिक्षकांची भरती होत नाही.  – प्रल्हाद शिंदे, राज्य उपाध्यक्ष, म. रा. कलाशिक्षक महासंघ.

वर्षभरापासून कलाशिक्षक आणि चित्रकला शिकवणाऱ्यांच्या हाताला काम नाही. उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न भेडसावतो आहे. कलाशिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडायला हवेत. जगणे ही शिक्षा वाटावी, असे जीवन झाले आहे.

कल्याण तारे, कलाकार.