बिपिन देशपांडे, लोकसत्ता
औरंगाबाद : करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील टाळेबंदीकाळात राज्यातील बस स्थानकातील जवळपास ५०० गाळेधारकांना आपला व्यवसाय बंद करावा लागलेला आहे. प्रवाशांअभावी व्यवसाय थांबलाय, दुसरीकडे भाडे द्यायचे चुकेना आणि व्यवसाय थांबवून अनामत रक्कम मागितली तर त्यालाही राज्य परिवहन महामंडळाकडून आर्थिक स्थितीचे कारण देत नकारघंटा वाजवली जात आहे. या हतबलतेमुळे राज्यातील हे गाळेधारक पुरते हैराण झाले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकात उपाहारगृह, वर्तमानपत्रं-पुस्तक, फळ विक्रेत्यांसह इतरही लहान-मोठी दुकाने असतात. या दुकानांची जागा भाडे तत्त्वावर देण्यासाठी महामंडळाकडून निविदा काढली जाते. साधारणपणे १४ वर्षांच्या करारान्वये निविदा भरणाऱ्यांना दुकानांसाठी जागा दिली जाते. ५ हजारांपासून ते ३०  हजार रुपये प्रतिमाहपर्यंतचे भाडे यासाठी आकारले जाते. वर्षभराचे जेवढे भाडे होते तेवढी रक्कम अनामत ठेव म्हणून महामंडळाच्या आस्थापना विभागाकडे जमा केली जाते. दर पाच वर्षांनी भाडय़ामध्ये ५ टक्के वाढ ठरलेली असते.

गतवर्षी करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत राज्यभर टाळेबंदी लागू करण्यात आलेली होती. या काळात एसटीचीही चाके थांबल्यामुळे टाळेबंदी काळात बसस्थानकावरील व्यवहारही ठप्प झाले होते. या काळातील दुकानदारांचे भाडेही सुरूच राहिले होते. हे भाडे माफ करावे, अशी काही निवेदने काही दुकानदारांनी राज्य परिवहन महामंडळांच्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिली आहेत. मात्र, अजूनही त्यावर महामंडळाकडून कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय दुकानदारांची अनामत रक्कमही परत केलेली नाही. जालना जिल्ह्य़ातील एका दुकानदाराने सांगितले,की आपली दोन लाख रुपये अनामत रक्कम अजूनही महामंडळाकडे अडकून पडली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्य़ातील एका दुकानदाराने सव्वा लाख रुपये ऑगस्ट २०२० पासून मिळवण्यासाठी महामंडळाची कार्यालयांमध्ये हलपाटे मारून थकलो आहोत. अद्यापही रक्कम मिळालेली नाही.

टाळेबंदी काळात एसटीचे उत्पन्न पूर्णपणे बुडाले. व्यवहार अजूनही पूर्णपणे सुस्थितीत सुरू झालेले नाहीत. इंधनाचे दरही भडकलेले आहेत. त्यातुलनेत भाडेवाढीचाही निर्णय झालेला नाही. परिणामी एसटी तोटय़ातच चालत आहे. त्यामुळे तूर्त आमच्याकडे अनामत रक्कम परत करण्याएवढा पैसा नाही, असे कारण महामंडळाकडे बंद केलेल्या दुकानदारांना सांगितले जात आहे. राज्यातील बसस्थानकातील बंद पडलेल्या दुकानदारांची संख्या ५०० च्या आसपास असल्याचेही सांगितले जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील बस स्थानकातील बंद पडलेल्या दुकानदारांच्या अनामत रकमेचा प्रश्न प्रलंबित नाही. अपवाद एका दुकानदाराचा आहे. तोही तांत्रिक मुद्दा आहे. टाळेबंदीकाळात एसटीसह बसस्थानकातील व्यवहार थांबलेले होते. या काळातील भाडे माफ करावे, अशी निवेदने काही दुकानदारांनी आमच्याकडे दिलेली आहेत. मात्र, यासंदर्भातील निर्णयाचे अधिकार वरिष्ठ पातळीवरील आहेत.

– अरुण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद.