महापालिकेने पुढील आर्थिक वर्षांसाठी ७७७ कोटी ३४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक बुधवारी सादर केले. यात शहरातील ६ रस्ते आदर्श करण्याचा मनोदय व्यक्त केला असून, त्यासाठी ६ कोटींची तरतूद केली. अंदाजपत्रकात मालमत्ता करातून या वर्षी तब्बल २३० कोटी रुपये मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे शहरातील केवळ २२ टक्के मालमत्तांना कर लावला गेला आहे. अंदाजपत्रकात मालमत्ता करातून अधिक वसुली दाखवली असली, तरी ती वसूल करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कशी असेल, हे मात्र नमूद केले नाही.
आदर्श रस्ते निर्मिती, तसेच महिला-बालकल्याण विभागात तरतूद केलेल्या ५ कोटी रुपये रकमेतून महापालिकेच्या शाळेतील मुलींना सॅनेटरी नॅपकीन देण्याचाही निर्णय घेतला आहे. या साठी प्रत्येक वॉर्डात ६ मशीनही घेतल्या जाणार आहेत. तसेच या नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लागावी म्हणून २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. छोटय़ा जेटिंग मशीनसाठी दीड कोटीचा निधी ठेवण्यात आला. मालमत्ता करातून २३० कोटी, तसेच महापालिकेचे व्यापारी संकुल, रंगमंदिर, सामाजिक सभागृह व मंगल कार्यालयाच्या माध्यमातून १० कोटींचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे नमूद केले आहे.
नगररचना विभागाकडून ७० कोटी रुपये मिळतील, असे अपेक्षित उत्पन्न गृहीत धरत आणि गेल्या वर्षीच्या योजनेचा स्पील गृहीत धरून केलेल्या अर्थसंकल्पात काही नवीन योजना प्रस्तावित आहेत. रस्त्यावरील विद्युत खांबांचे नवीनीकरण, दुभाजक व फुटपाथ विकसित करणे, शहर विकास निधीतून रस्ते यासह नवीन १२ ठिकाणी सिग्नलही प्रस्तावित केले आहेत. वैद्यकीय तपासण्यांसाठी होणारा खर्च शहरात आवाक्याबाहेर चालल्याने या साठी पॅथोलॉजिकल लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाख तरतूद करण्यात आली आहे.
अंदाजपत्रक शिलकी असले तरी गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता वसुली कशी होणार, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. अंदाजपत्रक स्वप्न दाखवणारे असले तरी गेल्या वर्षभरात १५ लाखांचे कामसुद्धा नगरसेवकांना करता आले नाही, असे नगरसेवक गजानन बारवाल यांनी चर्चेदरम्यान सांगितले. शहरातील हॅरिटेज वास्तुच्या संरक्षणासाठीही ५ कोटी १० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.